Tarun Bharat

तेजीचा ‘सप्तसूर’

Advertisements

भारतीय शेअर बाजारांनी सलग सहा आठवडे तेजीच्या दिशेने झेपावला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील नोंदीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य 23 मार्च 2020 ला 1.3 लाख कोटी डॉलर या नीचांकावर आले होते;  यात आतापर्यंत 91 टक्के वाढ झाली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजार कमालीचा आकर्षक वाटत आहे. त्यामुळे या आठवडय़ातही विक्रमी पातळी ओलांडून तेजीचा सप्तसूर निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच आठवडय़ांपासून सलग दिसणारा तेजीचा सूर गतसप्ताहात म्हणजेच सहाव्या आठवडय़ातही कायम राहिला.  गेल्या आठवडय़ात सेन्सेक्स 1109.46  अंशांनी तर निफ्टी 255.30  अंशांनी वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण दिसून आले. शुक्रवारी शेअर बाजारात थोडी फार नफेखोरी झाली; पण त्यानंतर  पुन्हा खरेदीचा दबाव वाढला आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 139 अंकांनी वाढून पुन्हा 46 हजारांच्या पुढे म्हणजे 46,019 अंकांव बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 35 अंकांनी वाढून 13,513 अंकांवर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, टायटन, बजाज ऑटो या कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले; तर ऍक्सिस बँक, महिंद्रा, टेक महिंद्रा, एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांचे समभाग घसरले.

कोरोना लशींच्या आगमन वार्तेमुळे जगभरात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. अमेरिकेनेही आपत्कालीन वापरासाठी फायजरच्या लसीला तत्काळ परवानगी दिली आहे. ब्रिटनमधील लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. जगातील विकसित देशांच्या केंद्रीय मध्यवर्ती बँकांनी आगामी कालखंडात व्याजदर कमी ठेवण्याचे संकेत दिले आहेत. विकसित देशांमध्ये  कमी व्याजदरावर मोठय़ा प्रमाणात भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजार कमालीचा आकर्षक वाटत आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेल्या समभाग खरेदीमुळे नोव्हेंबरपासून सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात 20 टक्क्यांनी म्हणजेच जवळपास (440 अब्ज डॉलरची वाढ झाली. कंपन्यांचे बाजारमूल्य 23 मार्च 2020 ला 1.3 लाख कोटी डॉलर या नीचांकावर आले होते. त्या नीचांकापासून बाजारमूल्यात आतापर्यंत 91 टक्के वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत एकूण विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय भांडवली बाजाराने लक्षणीय वृद्धीदर राखला आहे. गेल्या आठ महिन्यांत भारतीय बाजाराचे मूल्यांकन उंचावले असून मार्चच्या तुलनेत सध्या बाजाराच्या मूल्यांकनात दुप्पटीने वाढ झाली आहे.

दुसऱया बाजूला भारतीय उद्योगजगतातील कंपन्यांचे दुसऱया तिमाहीतील ताळेबंद आशादायक दिसून आले होते. आता तिसऱया आणि चौथ्या तिमाहाचे ताळेबंदही लवकरच जाहीर करण्यात येणार असून तेदेखील   उत्साहवर्धक असतील अशी गुंतवणूकदारांना आहे. त्यामुळेच शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी उंचीवर पोहोचूनही गुंतवणूकदारांकडून होणारा खरेदीचा ओघ कायम आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 6.6 टक्के वाढले आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव परत वाढत चालले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांच्या समभागात आगामी काळात तेजी दिसून येऊ शकते. चालू आठवडय़ात ज्युबिलंट फूडवर्कस्, डिश टीव्ही, आयनॉक्स वाईंड, रेलविकास निगम, जिंदाल सॉ, एनटीपीसी, वेलस्पून इंडिया, रिलायन्स पॉवर, ऑईल इंडिया, सद्भाव इंजिनिअरींग, केपीआर मिल, डेल्टा कॉर्प, डीसीबी बँक या समभागांची खरेदी योग्य वेळ पाहून करणे फायद्याचे ठरेल.  शेअर बाजार विक्रमी पातळीवर असताना पोर्टफोलियोमध्ये बदल करण्याचा पर्याय खुला असतो. आपण यापूर्वी घेतलेले समभाग चांगल्या पातळीवर जात वधारल्यानंतर ते विकून टाकून नव्या समभागांची खरेदी करणे हिताचे ठरते. यामध्ये स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांचाही विचार करता येईल. भारतगिअरसारख्या कंपनीचा समभाग 7 डिसेंबर रोजी 62.90 रुपयांवर होता; पण आज तो 83.90 रुपयांवर पोहोचला आहे. अशा कमी गुंतवणुकीच्या समभागांवर आणि त्यांच्या मूल्यावर लक्ष ठेवून अचूक वेळी संधी साधणे आवश्यक असते. यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. स्पाईस जेट या कंपनीच्या समभागाची किंमत 12 नोव्हेंबर रोजी 55 रुपये होती; पण आज हा समभाग 105 रुपयांवर पोहोचला आहे. कोरोना लसीच्या वाहतुकीच्या मुद्याने या समभागांना बळकटी दिली. नुकताच स्पाईस जेटने लसवाहतुकीसाठी ओम लॉजिस्टिक्ससोबत करार केला आहे. दुसऱया काळात या समभागात आणखी वाढ दिसून येऊ शकते. भारतीय खाद्यमंत्रालयाने साखर उत्पादक कंपन्यांना साखर निर्यातीसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या समभागात तेजी दिसून येऊ शकते. बीएसईने शेतकऱयांसाठी ई-ऍग्रीकल्चर  मार्केटचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे बीएसईचे समभाग निश्चितच उंचावलेले दिसतील.

याखेरीज दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीही काही समभाग निवडून ठेवावेत. आयओसीचा 93.95 रुपये किमतीचा समभाग 110 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. एसबीआय लाईफचा समभाग 849 रुपयांवर  असून तो 6 महिन्यात 1100चा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. नेल्कोचा समभाग 209 रुपयांवरुन साधारण महिन्याभरात 240 पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस् हा समभाग  727.55 रुपयांना 1 वर्षाच्या मुदतीसाठी 1015 चे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. यासह रिलायन्सने 5 जीची घोषणा केल्यामुळे या समभागातही तेजी दिसून येईल. भारतीय अर्थव्यवस्थेसह जगभरात उत्साहाचे वातावरण असले तरी काही नकारात्मक घटना-घटक-घडामोडी बाजारावर भारी पडतात. कोरोनाचे अमेरिकेतील वाढते मृत्यू, लसींबाबत आलेल्या तक्रारी, एचडीएफसीला आरबीआयने ठोठावलेला दंड यांसारख्या घटनांचे नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येऊ शकतात. त्यामुळे सजग राहून खरेदी करणे  अत्यंत आवश्यक आहे.

– संदीप पाटील

Related Stories

वैयक्तिक 2,000 कर्ज ऍप्सवर निर्बंध

Patil_p

सप्ताहाच्या अंतिम दिवशी बाजार सावरला

Patil_p

जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात तेजी

Patil_p

10 हजार कोटींच्या व्यवहारावर टाटा-बिगबास्केटची सहमती

Omkar B

‘मारुती’ची 18,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना

Patil_p

ऍपल 16 ते 22 टक्के वाढीच्या दिशेने

Patil_p
error: Content is protected !!