ऑनलाईन टीम
तेलंगणामध्ये ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे या मृताची ओळख पटवण्यात आली आहे. या फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे. तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. यातील ३० वर्षीय संशयित आरोपी हा पीडितेचा शेजारी होता. पिडीत चिमुकली घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी तब्बल नऊ विशेष टीम तयार करुन फरार आरोपीचा शोध घेत होते.
विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करण्यात येईल असे तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तेलंगणच्या पोलीस प्रमुखांनी आरोपीच्या मृत्यूची माहिती दिली.
१० लाखांचं बक्षिस..
हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं होतं. यासंबंधी बुधवारी एक निवेदनही जाहीर करण्यात आले होते.


previous post