Tarun Bharat

तेविसावा गुरु कोळी भाग 1

Advertisements

अध्याय नववा

अवधुतानी योग्याने एकटे राहणे कसे उपयुक्त आहे हे मनावर ठसवण्यासाठी सर्पाला गुरु केले. सर्प कोणतेही घरदार न करता मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळात जाऊन राहतो तसेच योग्यानेही घरदार करण्याच्या खटाटोपात राहू नये. पुढे अवधुत राजाला म्हणाले, तू आता असे विचारशील की योग्याने घरदार करायचे नाही तर त्याला आधार कुणाचा? याचे उत्तर म्हणजे योग्याला निःसंशय ईश्वराचा आधार असतो. तोच जगाचा नियंता आहे हे ओळखण्यासाठी मी कोळय़ाकडून ईश्वराने सृष्टी कशी रचली असेल, कशापासून उत्पन्न झाली असेल हे शिकलो. म्हणून मी कोळय़ाला तेविसावा गुरु केले.

 प्रथम सृष्टीनिर्मिती विषयी सांगतो. नारा म्हणजे जग आणि ईश्वर या जगाचे आश्रयस्थान, म्हणूनच त्याला ‘नारायण’ असे म्हणतात. तोच नारायण सर्वांचा स्वामी होय. कोणतीही बाह्य सामुग्री न घेता या विश्वाची नारायणाने उत्पत्ती केली. कोणत्याही सामुग्रीशिवाय एकटय़ानेच सारे जग आपल्याच मायेला जागृत करून निर्माण केले. त्या मायेच्या पोटामध्ये जीवसमुदायाच्या असंख्य कोटी भरलेल्या असतात. त्या मायेचे त्याने दृष्टीने अवलोकन केले.

या अवलोकनालाच ‘काळ’ असे म्हणतात. काळ हीही ईश्वराचीच निर्मिती असल्याने काळावर त्याचीच सत्ता चालते. ईश्वराने आपल्या मायेकडे पाहिले आणि तिला आपल्या अंगाखांद्यावर खेळू दिले पण आपल्या अंगाला लागू दिले नाही. इतक्मया अलिप्ततेने खेळ कसा करायचा हे तोच एक जाणे. आकाशामध्ये धुके भरते. परंतु आकाश काही धुक्मयाला स्पर्श करत नाही. त्याप्रमाणे तो आपल्या अंगाने मायेला वाढवतो पण तिच्याशी अलिप्तपणेच वागतो. कमळाचेही तसेच आहे. कमळ पाण्यातच मोठे होते पण कमळ आपल्या पानावर पाणी म्हणून ठरून देत नाही. ईश्वरी सत्ता ही सत्-चित्-आनंद स्वरूप असते. माया त्यापैकी आनंदाला आवरण घालते. ईश्वरी आनंदावर मायेचे आवरण असल्याने मनुष्याला खऱया आनंदाची जाणीव होत नाही म्हणून तो वस्तू, व्यक्ती व परिस्थिती यातून आनंद हुडकण्याचा प्रयत्न करतो पण हा आनंद तात्पुरता असतो आणि खरा व कायम टिकणारा आनंद मायेने आवरण घालून बंदिस्त केलेला असतो. असे जरी असले तरी सत् आणि चित्-सत्ता ही मोकळीच असते. त्यामुळे पवित्र आणि कायम टिकणारी ईश्वरी सत्ता सत् आणि चित् स्वरूपात मायेवर अंमल गाजवते. ईश्वर हाच मायेचा आधार असतो आणि ती त्याच्या कायम बरोबर असते आणि तो सांगेल तसे वागते म्हणून नारायणाला मायेचा नियंता असे म्हणतात.

आता सृष्टीनिर्मिती व संहार या गोष्टी कशा घडतात ते पाहू. ईश्वरनिर्मित माया सत्त्व, रज आणि तमगुण युक्त असते. रजोगुण सृष्टीला उत्पन्न करतो. सत्त्वगुण तिचा प्रतिपाळ करतो आणि तमोगुण कल्पांताच्या वेळी क्षुब्ध होऊन काळाच्या रूपाने तिचा संहार करतो.

त्रिगुणांमुळे मायेकडे वर सांगितलेल्या शक्ती असतात पण मायेचे नियंत्रण नारायणाच्या हातात असते. म्हणून अंतिम सर्व काही ठरवणारा म्हणजे नियत करणारा ईश्वरच असतो. म्हणून सृष्टी आणि तिची निर्मिती करणारी माया व त्रिगुण नाहीसे केल्यानंतर एकटा एक अद्वितीय परिपूर्ण असा नारायणच शिल्लक राहतो. म्हणून हे सर्व विश्व ईश्वरव्याप्त आहे असे म्हणतात व इतर काही असलेच तर त्याची इच्छा असेल तेवढय़ापुरते अस्तित्वात असते. परमात्म्यात-आत्मा, जीव व जगत्-असे विविध भेद नाहीत. असा जो खरोखर अभेद आहे तोच प्रकृतिपुरुषांचा ईश्वर होय. तोच सर्वांचा श्रे÷ नियंता व ‘पर’ आणि ‘अवर’ आहे. त्याचाही निर्णय ऐक.

ब्रह्मदेवादिक देव ‘पर’ आणि मनूपासून स्थावरापर्यंत सर्व जीव ते ‘अवर’ होत. यांचा नियंता व चालक तोच होय. ज्याच्या आज्ञेबाहेर वायुसुद्धा पाऊल टाकीत नाही. समुद्र आपल्या मर्यादेत राहतो आणि सूर्य दिनमान चालवितो. असा सर्वशक्तिमान ईश्वर विश्वनिर्मिती कशी करत असेल ते कोळय़ाच्या माध्यमातून समजून घेऊयात पुढील भागात.

Related Stories

स्मरण स्वातंत्र्यशलाकांचे

Patil_p

लग्नाला जातो मी…

Patil_p

त्यासि स्यमंतक कोठोनि प्राप्त?

Patil_p

शतधन्वयाची भेदली मति

Patil_p

सन 2030 ची कृषी-व्यवस्था

Patil_p

निश्चयपूर्वक वर्तन एक कौशल्य

Patil_p
error: Content is protected !!