अनेक ठिकाणी घरांची छप्परे, पत्रे उडून नुकसान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा रविवारी किनारपट्टी भागासह संपूर्ण रत्नागिरी जिल्हय़ाला बसला. मुसळधार पावसासह आलेल्या वादळाच्या तीव्रतेमुळे जिल्हय़ातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. बेफाम वाऱयासह घोंगावत आलेल्या या वादळाने जिल्हय़ात ठिकठिकाणी घरांसह झाडांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली. अनेक ठिकाणच्या घरांची छप्परे, पत्रे व रस्त्यावरील बॅनर्स उडून नुकसान झाले. तसेच महावितरणचे वीजखांब कोसळून जिल्हय़ातील काही भाग अंधारात गेला होता. या वादळाचा सर्वाधिक फटका रत्नागिरीसह राजापुरातील किनारपट्टी भागाला जास्त बसला.


तौक्ते चक्रीवादळामुळे जिह्यात शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत होता. रविवारी वादळी वाऱयामुळे पडझडीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या आहेत. अनेक घरांची पडझड होऊन छप्परे उडून गेली आहेत. विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाडे रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाल्याच्या घटना महामार्गावर घडल्या. समुद्रकिनारी असणाऱया धोकादायक घरातील लोकांना वेळीच स्थलांतरित केल्याने जीवितहानी झालेली नाही.
राजापुरात दुपारी तौक्ते दाखल
स्वतः जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रविवारी किनारपट्टी भागात फिरून पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनीही पोलीस सुरक्षा ठिकठिकाणी तैनात केली होती. जिह्यात रविवारी दुपारी 3 च्या सुमारास राजापूरमध्ये चक्रीवादळ दाखल झाले होते. वादळी वाऱयांचा वेग तासी 77 किमी इतका होता. समुद्र खवळल्याने मोठय़ा लाटा किनाऱयावर धडकल्या. रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे बौद्धविहारावरील पत्रे उचकटून बाजूला पडले. सह्याद्रीनगर नाचणे रोड येथे नांदगावकर यांच्या आवारातील आंब्याचे झाड कोसळले. तसेच शेजारचे नातू यांचा माडही दुसऱया घराच्या पडवीवर कोसळून मोठे नुकसान झाले. तसेच शहरातील अनेक भागात पत्रे, बॅनर्स उडाले. एका रिक्षावर झाड कोसळून नुकसान झाले. रत्नागिरी शहरातील दुतर्फा रस्त्यावर अनेक पत्र्यांचे तुकडे, लाकडे, फांद्या पडल्या होत्या. जैतापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. नाटे-जैतापुरात वाऱयामुळे घरांची पडझड झाली आहे.
प्रादेशिक बंदर अधिकाऱयांकडून आढावा
बंदरावर शेकडो बोटी सुरक्षित लावण्यात आल्याने येथे कोणतीही घटना घडू नये, यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी पॅप्टन संजय उगलमुगले हे आपल्या टीमसह उपस्थित होते. सगळ्य़ा बंदरांचा त्यांनी आढावा घेऊन सर्वांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही त्यांनी स्थानिकांना केल्या होत्या. तसेच मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, तहसीलदार शशिकांत जाधव, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनीही मच्छीमार यांची भेट घेऊन योग्य त्या सूचना केल्या आणि पाहणी केली.
जिल्हा प्रशासनाकडून योग्य खबरदारी
चक्रीवादळ आल्यानंतर अडचणीत सापडल्यास अथवा कोणती मदत लागल्यास नियंत्रण कक्ष नंबर आणि पोलीस हेल्पलाईन नंबर देण्यात आले होते. सर्व यंत्रणेला मदतीला घेऊन योग्य खबरदारी प्रशासनाने घेतली होती. ग्रामपंचायत स्तरावरही गावात चांगली मदत झाली. त्यामुळे जिह्यात चक्रीवादळाचा मोठा फटका बसला नाही वा जीवितहानी झालेली नाही.
आजही नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई
शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. रत्नागिरी जिल्हय़ात रविवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून 17 मे या कालावधीतही जिल्हय़ांच्या किनारपट्टीवर वादळी वाऱयाची शक्यता असल्याने यावेळी कोणत्याही नागरिकाला त्यांच्या अत्यावश्यक सेवाविषयक बाबींसाठी (वैद्यकीय बाब वगळून) बाहेर पडता येणार नाही. प्रतिबंध आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
राजापूरमध्ये 17 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यात 17 मे रोजी रात्री 11 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती काळात आवश्यक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कार्यरत असणाऱया जिल्हय़ातील शासकीय यंत्रणा यांना हे आदेश लागू राहणार नाहीत. या कालावधीत मदतीसाठी (02352226248, 2222333) या क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हय़ातील 365 नागरिकांचे स्थलांतर
रविवारी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील 365 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली व मंडणगड तालुक्यांना धोका निर्माण झाला आहे. या पाच तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून किनारपट्टीवर धोकादायक क्षेत्रातील नागरिकांचेही स्थलांतर करण्यात आले. राजापूर व गुहागर तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील 85 कच्च्या घरातील 365 नागरिकांचे परिसरातील आजूबाजूच्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे.
राजापुरात अनेक ठिकाणी घरांची पडझड
तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका राजापूर तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांना बसला. वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने किनारपट्टीवरील गावांमध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पडझड झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांच्या पडझडीचे तसेच घरांवरही झाडे कोसळून नुकसानीच्या घटना घडल्या. तसेच काही ठिकाणी रस्त्याव्ंारही झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडले. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासनाने डेंजर झोनमधील कुटुंबांचे वेळेत स्थलांतर केल्याने जीवितहानी झाली नाही.
गुहागरात मत्स्य व्यवसाय विभागाचे आवाहन
तौक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱयावर कोणताही जलचर प्राणी वाहून आल्याचे दिसल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळय़ांचे नुकसान झाल्यास मत्स्य व्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱयांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे.
गुहागरात 222 कुटुंबे सुरक्षितस्थळी
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुहागर प्रशासनाने समुद्रकिनारपट्टीवरील 35 गावातील 222 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. यासाठी सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारीवर्ग कार्यरत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लांजात 38 वीजखांब कोसळले
रविवारी लांजा तालुक्यात 38 विद्युत खांब कोसळल्याने पालू गावासह परिसर अंधारात गेला. वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. शनिवारपासून रविवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस पडत होता. शनिवार दुपारपासून खेरवसे, आसगे, वाडगाव, गोविळ, विवली, वेरवली, भांबेड व इतर गावांमध्ये 2 दिवस वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर लांजा-वेरवली मार्ग, लांजा, खेरवसे, देवधे, कोचरी, शिपोशी गावात झाडे उन्मळून कोसळली. मुंबई महामार्गाचे काम सुरू असल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी भरले तर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. तालुक्यातील कोचरी बेंद्रेवाडी येथे दोन घरांवर झाडे पडली तर एका घरावरील पत्रे उडून गेल्याने घरमालकांचे मोठे नुकसान झाले.
संगमेश्वरात जाखमाता मंदिरावर झाड कोसळले
तौक्ते वादळामुळे सर्वाधिक फटका संगमेश्वर तालुक्यातील घरांना बसला असून यामध्ये घरांचे लाखोंचे नुकसान झाले. संगमेश्वरजवळच्या मुंबई-गोवा महामार्गावरील पुरातन जाखमाता मंदिरावर झाड कोसळले असून यात जुन्या मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका बसलेल्या नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा महसूल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
चिपळुणात दिवसभर वीजपुरवठा खंडित
शनिवारी दुपारपासून चिपळुणात जोरदार वाऱयासह मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या. सांयकाळी 5 नंतर वाऱयाचा वेग आणखीच वाढला. त्यामुळे शहरातील अनेक इमारतींवरील पत्रे उडून गेले. काही भागात झाडाच्या फांद्याही तुटून रस्त्यावर पडल्या. अनेक ठिकाणी वीजखांब आडवे झाले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते.
दापोलीत प्रशासनाची दक्षता
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील पाजपंढरी, फत्तेगड तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. दापोलीमध्ये 11 गावांमधून 2 हजार 300 नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम रविवारी दुपारपर्यंत सुरू होते.
खेडमध्ये वादळी वाऱयासह पर्जन्यवृष्टी
चक्रीवादळासह आलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील खोपी-रामजीवाडी येथील लक्ष्मण बर्गे यांचे घर कोसळून मोठे नुकसान झाले. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास वादळी पावसाने सुरूवात केली. यामुळे शहर परिसरासह ग्रामीण भागामधील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. दुपारच्या सुमारास वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याने ग्रामस्थांचे नुकसान झाले.