Tarun Bharat

त्यांना काळजी आपल्या चिमण्या-पाखरांची

कोरोना संकटामुळे परदेशी असलेल्या आपल्या चिमण्या-पाखरांसाठी पालकांचा जीव तीळतीळ तुटतोय

गिरीष कल्लेद / बेळगाव

आपला मुलगा-मुलगी परदेशात आहेत. शिक्षण आणि नोकरी निमित्ताने ते  घरापासून दूर, सातासमुद्रापार राहत आहेत, ही अभिमानाची बाब खरी. मात्र सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे परदेशी असलेल्या आपल्या चिमण्या-पाखरांसाठी पालकांचा जीव तीळतीळ तुटतो आहे. आपल्या मुलांच्या काळजीने व्याकुळ झालेली पालकमंडळी याच चिंतेत आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या भावनांचा पट उलगडला…

योहान रॉयस्टन जेम्स- ऑस्ट्रेलिया

कॅम्प येथील योहान रॉयस्टन जेम्स ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न शहरात गेल्या आठ वर्षांपासून स्थायिक आहेत. तेथील रामसे ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर आहेत. या ग्रुपतर्फे 30 हॉस्पिटलचे कामकाज पाहिले जाते. मुलगा योहानसह सून गौरीसुद्धा मेलबर्न येथेच राहते. सध्या कोरोनामुळे या दोघांचीही काळजी वाटत आहे. मात्र देवावर विश्वास ठेवून आहोत. सर्व काही चांगले होईल, असा विश्वास योहानची आई संध्या जेम्स यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. सून गौरी इंजिनिअर असून आयटी कंपनीत आहे. सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे. ती गरोदर असून मे महिन्यात तिची प्रसूती होणार आहे. मात्र, अशावेळी त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार नसल्याने थोडी काळजीही वाटत असल्याचे संध्या जेम्स यांनी सांगितले.

दर रविवारी फोनद्वारे दोघांशीही बोलणे होत असते. यावेळी ‘स्वत:ची काळजी घ्या’ असा सल्ला योहानकडूनच आम्हाला देण्यात येत आहे. तेथील त्याची मित्रमंडळी चांगली असल्याने आम्हाला काळजी कमी आहे. येथील सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये योहानचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर वसंतराव पोतदारमधून डिप्लोमा अभ्यासक्रम झाल्यानंतर बेंगळूर येथील रामय्या इन्स्टिटय़ूटमधून बायोमेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया येथील लॅट्रॉब युनिव्हर्सिटीची त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियात आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे योहानने फोनद्वारे कळविले आहे. येत्या ऑगस्टमध्ये आपण ऑस्ट्रेलियाला जाणार होतो. मात्र कोरोनामुळे पुढील सहा महिन्यांपर्यंत ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त अन्य देशांतील नागरिकांना प्रवेशबंदी असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे आपला ऑस्ट्रेलिया दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे संध्या आणि रॉयस्टन जेम्स यांनी सांगितले.

भाऊ ज्ञानेश खोत (अभियंते) हा सुद्धा गेल्या 20 वर्षांपासून टेक्सास (अमेरिका) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याच्यासह पत्नी गौरी व मुली रिशी व रिया यासुद्धा त्यांच्या सोबतच आहेत. कोरोनामुळे घरातूनच ऑनलाईनद्वारे त्याचे काम सुरू आहे. त्याच्याशीही फोनद्वारे बोलणे होत आहे. तोसुद्धा स्वत:ची काळजी घेण्याबाबत आम्हाला सांगत असतो, असे संध्या जेम्स यांनी सांगितले.

यश अमृत लाड-ऐंटेडॅम-नेदरलँड

ऐंटेडॅम-नेदरलँड येथे गेल्यावषी ऑगस्टमध्ये लॉजिस्टिक ईन ऑपरेशन्स मॅनेजमेंटमध्ये एम.एस. करण्यासाठी गेलेल्या यश अमृत लाड यांच्या पालकांचीही परिस्थिती वेगळी नाही. कॅम्प येथे राहणाऱया अमृत व स्वाती लाड यांनीही आपल्या मुलाबद्दलची काळजी बोलून दाखविली. मुलाशी व्हाट्सऍपद्वारे बोलणे होत आहे. यावेळी त्याला आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहोत. नेदरलँडमध्ये सध्या तरी तशी परिस्थिती गंभीर नसली तरी आई म्हणून काळजी वाटत आहे. मात्र यश आम्हालाच काळजी घेण्यास सांगत असतो. मुलगा एकुलता असल्याने आई-वडिलांना काळजीही होणारच! आमचे कुटुंब चिन्मय मिशन परिवाराचे सदस्य आहे, तर भारतीय संस्कृती, संस्कार, कुटुंब पद्धती याला प्राधान्य देणारे आहे. मुलावरही हे संस्कार झाले आहेत. नेदरलँडमध्ये परिस्थिती तेवढी गंभीर नसल्याचे त्याने कळविले आहे. यामुळे थोडा धीर आला आहे, असे स्वाती लाड यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

यश हा राष्ट्रीयस्तरीय बॅडमिंटनपटू असून येथील सेंट पॉल्स शाळेत त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर आरएलएसमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रामय्या इन्स्टिटय़ूट (बेंगळूर) मधून त्याने इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले. स्पोर्ट्स कोटय़ातून त्याची या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. गेल्यावषी ऑगस्टमध्ये त्याने नेदरलँडला प्रयाण केले होते. सप्टेंबरपासून त्याचा अभ्यासक्रम सुरू झाला.

  प्रसाद राजेंद्र केकरे-स्वीडन

स्वीडन येथील अव्वल असणाऱया लुंड युनिव्हर्सिटी येथे प्रॉडक्शन ऍण्ड मशिनरीमध्ये एम.एस. करत असणाऱया प्रसाद राजेंद केकरे याने मागील वषी जुलैमध्ये स्वीडन गाठले. तेथील मालमो शहरात त्याचे वास्तव्य आहे. सध्या स्वीडनसह नॉर्वे आणि युरोपियन शहरात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. यामुळे मुलाबाबत काळजी वाटत असल्याचे वडील राजेंद्र आणि आई सुमेधा यांनी सांगितले. सराफ कॉलनी, टिळकवाडी येथील केकरे यांचे सध्या पुणे येथे वास्तव्य आहे.

प्रसादशी दररोज वेब कॅमेऱयाद्वारे संपर्क साधून बोलणे होत आहे. स्वत:ची काळजी तसेच खबरदारी घेण्याबाबत त्याला सांगत आहोत. स्वीडनची सीमा बंद करण्यात आली असून पूर्व खबरदारी घेण्यात आली आहे. नियमांचे या ठिकाणी काटेकोरपणे पालन होत असते. स्वीडन तसेच मालमो सिटी स्वच्छ व निटनेटकी आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

स्वीडनमधील लुंड युनिव्हर्सिटी ही जगातील 8 हजारपैकी 90 वी रँकिंग असणारी युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये बीई पूर्ण झालेल्यांनाच एमएस साठी प्रवेश दिला जातो. मात्र प्रसादने 26 वा रँक मिळवून मेरीटवर प्रवेश मिळविला आहे. गेल्यावषी जुलैमध्येच अभ्यासक्रमाला सुरुवात झाली असून एकूण 4 वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. मुलाच्या कामगिरीबद्दल आम्हाला निश्चित अभिमान वाटतो. मात्र सद्यस्थितीबाबत काहीशी काळजीही वाटत आहे, असे राजेंद्र बाळकृष्ण केकरे यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सध्या केकरे यांचे वास्तव्य पुणे येथे असून फोनद्वारेच त्यांनी ही माहिती दिली.

कौशिक रामचंद गैंडळकर-फ्रान्स

अन्य देशांप्रमाणे फ्रान्समध्येही कोरोनाचा फैलाव वाढला आहे. यामुळे फ्रान्समध्ये शिक्षण घेत असणाऱया आपल्या मुलाबाबत चिंता वाटत आहे. मुलाच्या काळजीने जीवाची घालमेल सुरू आहे. फ्रान्स येथील लेमान्स युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असणाऱया कौशिक रामचंद्र गैंडळकर याची आई सुप्रिया यांनी आपली ही घालमेल तरुण भारतशी बोलताना सांगितली. मात्र कौशिकने चिन्मय मिशनच्या शिबिरात लहानपणी भाग घेतला होता. यामुळे अध्यात्म, भारतीय संस्कृती याचे संस्कार त्याच्यावर आहेत. तो दररोज प्राणायाम करत असल्याने तसेच संकटांना समर्थपणे सामोरे जाण्याचे त्याच्यात धैर्य आहे. त्याला संगीताचीही आवड असून समजुतदारही आहे. यामुळे अशा संकटसमयी तो खंबीर असल्याचे सुप्रिया गौंडळकर यांनी म्हटले. भोज गल्ली, शहापूर येथे त्यांचे वास्तव्य आहे.

कौशिकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील प्रेशियस ब्लॉसम शाळेत झाल्यानंतर जीएसएस महाविद्यालयातून पदवीपूर्ण शिक्षण घेतले. यानंतर जीआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड कम्युनिकेशनमध्ये बीई पूर्ण झाल्यानंतर त्याला फ्रान्समधील लेमान्स युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रो एकोस्टिक (ध्वनिसंबंधी) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. मागील वर्षाच्या ऑगस्टपासून अभ्यासक्रमाला सुरुवात झाली असून एकूण दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. कौशिकशी आपण दर रविवारी संपर्क साधत असून काळजी घेण्याबाबत सांगत आहोत. त्याच्याकडून परिस्थितीची माहिती घेत आहोत. सध्या कौशिक हॉस्टेलमध्येच सुरक्षित असून स्वत:चे जेवण बनवून घेतो. दररोज ऑनलाईनद्वारेच लेक्चर (तास) सुरू असल्याचे त्याने कळविले आहे. यामुळे थोडे धैर्य आल्याचे रामचंद्र गौंडळकर यांनी सांगितले.

Related Stories

माळी गल्लीतर्फे झोपडपट्टीतील गरिबांना अन्नपाकिटे

Amit Kulkarni

मध्य रेल्वेच्या पॅसेंजर, धावताहेत कर्नाटकात

Patil_p

ऑस्ट्रेलियात जुलैपासून क्रीडा स्पर्धांना परवानगी

Patil_p

नंदगड गाव आजपासून पूर्णतः सीलडाऊन

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 900 जण क्वारंटाईनमध्ये

Patil_p

• जिल्हय़ात 4,89,264 शेतकऱयांना ‘किसान सन्मान’चा लाभ

Patil_p