Tarun Bharat

‘त्या’ पाचहीजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

 पॉझिटिव्ह रुग्णासोबत केला होता प्रवास : जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची माहिती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी

कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आणखी सहा नमुने निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील त्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत कोच्चीवेली एक्स्प्रेसमधील रेल्वे डब्यातून प्रवास केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पाचही व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ावरील कोरोनाचे सावट दूर झाले आहे. आता फक्त कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या एका नमुन्याचा अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हय़ात आढळलेला पॉझिटिव्ह रुग्ण कोच्चीवेली एक्स्प्रेसने प्रवास केलेला होता. त्याच रेल्वेच्या डब्यातून सिंधुदुर्गातील पाच व्यक्तींनी प्रवास केला होता. त्यांचा शोध घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचे सावट निर्माण झाले होते. मात्र पाचही व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हे सावट दूर झाले आहे.

एकूण 61 अहवाल निगेटिव्ह

 जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले आणखी सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णासोबत कोचीवेल्ली एक्स्प्रेसमधून प्रवास केलेल्या त्या पाच व्यक्तींचेही अहवाल निगेटिव्ह आहे आहेत. रुग्णालयाने पाठवलेल्या 63 पैकी फक्त एका नमुन्याचा अहवाल बाकी असून इतर सर्व अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नव्याने एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही.

विलगीकरण कक्षामध्ये सध्या 22 व्यक्ती दाखल आहेत. तर 337 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये 53 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. विलगीकरणाचा कालावधी संपवलेल्या व्यक्तींची संख्या 80 आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत एकूण 2010 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

48 व्यक्तींचे समुपदेशन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडॉऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्हय़ात अनेक मजूर, कामगार, बेघर यांच्या राहण्याची व जेवणाची अडचण निर्माण झाली होती. या सर्वांच्या जेवणाची व निवासाची सोय व्हावी, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने 15 कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये सुमारे 550 मजूर, बेघर यांच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. पण, अडकून पडल्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येत आहे. त्यांचा हा मानसिक ताण कमी करण्यासाठी या लोकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

जिल्हय़ात आतापर्यंत महिला व बालविकास अधिकारी यांनी नेमणूक केलेल्या सहा समुपदेशकांनी 48 व्यक्तींचे समुपदेशन केले आहे. या समुपदेशनामध्ये वैयक्तिक संवाद साधून कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्याचे उपाय, घ्यायची काळजी, घरच्यांची वाटणारी चिंता, सकारात्मक वेळ कसा घालवावा, स्वच्छतेबाबतच्या सवयी, मास्क, साबण, हॅन्डवॉशचा वापर, वाचन करणे या विषयी समुपदेशन करण्यात आले. समुपदेशन करण्यात आलेल्या सर्वांची मानसिक स्थिती सध्या चांगली आहे. तसेच ज्यांना गरज भासत आहे, अशा लोकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हय़ात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱयांवर 18 गुन्हे दाखल करण्यात आले असून 16 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

.. तर ग्रुप ऍडमिनवर दाखल होणार गुन्हा

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाच्या घटनेनंतर सोशल मीडिया, व्हॉट्सऍप ग्रुपवर विविध प्रकारचे सांप्रदायिक भावना भडकवणारे संदेश प्रसारित होत आहेत. त्यामुळे जिल्हय़ात सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्मयता आहे. जिल्हय़ातील कायदा व सुव्यवस्था राखणे व अशा प्रकारच्या संदेशास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने 5 एप्रिल 2020 रोजीपासून जर व्हॉट्सऍप ग्रुपवर कोणीही धर्म, धर्मगुरू, धार्मिक स्थळांबाबत संदेश किंवा समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा असा कोणताही संदेश प्रसारित केल्यास संबंधित व्हॉट्सऍप ग्रुपचे ऍडमिन हे गुन्हय़ास पात्र राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1), (3) अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दिले आहेत.

घरीच अलगीकरण                     337

संस्थात्मक अलगीकरण   053

पाठविण्यात आलेले एकूण नमुने   063

अहवाल प्राप्त झालेले नमुने          062

पॉझिटिव्ह आलेले नमुने  001

निगेटिव्ह आलेले नमुने   061

अहवाल प्राप्त न झालेले नमुने       001

विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण   022

Related Stories

पणदुरात ‘एक गाव-एक वाण’ उपक्रम

NIKHIL_N

दस्तनोंदणीसाठी ‘तुकडेबंदी’चा अडथळा दूर करा!

NIKHIL_N

गणपतीपुळेतील वॉटर स्पोर्ट व्यवसायावर टांगती तलवार

Archana Banage

पन्हळे धरणाला गळती

Patil_p

ख्रिस्ती विकास परिषदेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विल्यम सालढाणा

Anuja Kudatarkar

कोरोनामुळे घडणार यावर्षी कमी उंचीच्या ‘गणेशमूर्ती’

Patil_p