Tarun Bharat

‘त्या’ रोमांचक लढतीत स्टोक्सने घेतला होता ‘सिगारेट ब्रेक’!

2019 आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेतील फायनलच्या आठवणींना उजाळा

लंडन / वृत्तसंस्था

मागील वर्षातील 14 जुलैचा दिवस….लॉर्ड्सचे खचाखच भरलेले मैदान….आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाची निर्णायक लढत…..अन् यजमान इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील काटय़ाची टक्कर…….50 षटकांची लढत रोमहर्षकरित्या टाय झाली आणि सामना सुपरओव्हरमध्ये पोहोचला……ज्या बेन स्टोक्सने त्या दिवशी इंग्लंडला क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा पहिलावहिला विश्वचषक जिंकून दिला, ‘त्याच्या जगात’ मात्र त्या दिवशी वेगळेच चाललेले….कारण, सुपरओव्हरची काटय़ाची लढत सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा हा पठ्ठय़ा स्वतःला ‘कूल’ ठेवण्यासाठी अटेंडंटच्या छोटय़ा ऑफिसमधील बाथरुममध्ये शिरला आणि तेथेच छोटा शॉवर व सिगारेट ब्रेक घेत त्याने सुपरओव्हरची तयारी केली…..अन् पुढे जो घडला तो इतिहास आहे!

प्रतिष्ठेच्या लॉर्ड्सवरील हा सामना ज्यांनी पाहिला, त्यांचे काळजाचे ठोके चुकल्याशिवाय राहिले नाहीत आणि मंगळवारी प्रकाशित झालेल्या इंग्लंडच्या त्या विश्वचषक विजयश्रीवर आधारित नव्या पुस्तकात हीच बाब अधोरेखित केली गेली आहे. ‘Morgan’s men: the Inside story of England’s rise from cricket world cup humiliation to glory’ असे या पुस्तकाचे शीर्षक आहे.

50 षटकांची ती लढत टाय तर झालीच. पण, सुपरओव्हरही टाय झाली. त्यानंतर चौकार-षटकारांच्या संख्येनुसार इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आले होते. वर्ल्डकप इतिहासातील हा आजवरचा सर्वात रोमांचक अंतिम सामना म्हणून ओळखला जातो. या लढतीचे पहिले वर्ष साजरे करताना निक हाऊल्ट व स्टीव्ह जेम्स यांच्या पुस्तकातून स्टोक्सच्या या आठवणीला प्रामुख्याने उजाळा देण्यात आला आहे.

‘27 हजार प्रेक्षकांनी भरलेले स्टेडियम, चाहत्यांचा गलका, मैदानावरील प्रत्यक्ष लढतीची शिगेस पोहोचलेली उत्कंठा आणि लाँग रुम, ड्रेसिंगरुमच्या स्टेअर्सवरुन येणारे खेळाडू….पण, बेन स्टोक्सच्या मनात वेगळे होते. तो लॉर्ड्सवर त्यापूर्वी कित्येकदा खेळला होता. त्याला मैदानाची, तेथील परिस्थितीची उत्तम जाणीव होती. प्रत्येक खाचाखोचा त्याला माहित होत्या. इऑन मॉर्गन आपल्या सहकाऱयांना दडपण न घेता नैसर्गिक खेळ साकारण्याची सूचना करत होता आणि तिकडे स्टोक्सच्या मनात वेगळीच घालमेल सुरु होती….2 तास 27 मिनिटे मैदानावर लढून आल्यानंतर पुन्हा त्याच्या खांद्यावरच लढाईची मुख्य भिस्त होती. अशा वेळी स्टोक्सने काय केले असेल? तो थेट ऑफिस अटेंडंटच्या छोटय़ा ऑफिसमध्ये शिरला आणि शॉवर्स घेतल्यानंतर सिगारेट पेटवत त्याने स्वतःला सुपरओव्हरसाठी तयार केले’, असे हाऊल्ट व स्टीव्ह जेम्स यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले.

29 वर्षीय स्टोक्सने त्या रोमांचक लढतीत नाबाद 84 धावा फटकावल्या. शिवाय, नंतर सुपरओव्हरमध्ये 8 धावा जमवत इंग्लंडला जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

Related Stories

यजमान इंग्लंडची पाकिस्तानवर 5 गडय़ांनी मात

Patil_p

मँचेस्टर सिटीचा बर्नलीवर मोठा विजय

Patil_p

एटीपी मानांकनात फेडरर टॉप-10 मधून बाहेर

Patil_p

महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा विजेत्याच्या बक्षिसात भक्कम वाढ

Patil_p

मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का

Patil_p

कोलंबो स्टार्सचा 58 धावांनी विजय

Patil_p