आयपीएल साखळी सामना : केकेआरचा 7 गडी राखून एकतर्फी विजय, मुंबई इंडियन्सचा उर्वरित टप्प्यात सलग दुसरा पराभव


वृत्तसंस्था /अबु धाबी
नवोदित वेंकटेश अय्यर (30 चेंडूत 53) व राहुल त्रिपाठी (42 चेंडूत नाबाद 74) यांनी दुसऱया गडय़ासाठी 88 धावांची धडाकेबाज भागीदारी साकारल्यानंतर केकेआरने आयपीएल साखळी सामन्यात बलाढय़ मुंबई इंडियन्सचा तब्बल 7 गडी राखून धुव्वा उडवला. मुंबईचा हा उर्वरित टप्प्यातील सलग दुसरा पराभव आहे. मुंबईने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकात 6 बाद 155 धावा केल्या तर प्रत्युत्तरात केकेआरने 15.1 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
आपला केवळ दुसराच आयपीएल सामना खेळणाऱया अय्यरने मुंबईच्या कसलेल्या गोलंदाजांनाही चौफेर पिटाळले तर राहुल त्रिपाठीला रोखणे बुमराह-बोल्ट-मिल्नेसारख्या अव्वल गोलंदाजांना देखील शक्य झाले नाही. त्रिपाठी 42 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह 74 धावांवर नाबाद राहिला. डावाच्या प्रारंभी शुभमन गिल (13) व अय्यर यांचा 40 धावांचा फ्लाईंग स्टार्ट महत्त्वाचा ठरला.
केकेआरचा उत्तम मारा
प्रारंभी, क्विन्टॉनने दर्जेदार अर्धशतक झळकावल्यानंतरही केकेआरने मुंबईला 6 बाद 155 या माफक धावसंख्येवर रोखण्यात यश प्राप्त केले. कर्णधार रोहित शर्माने नेहमीच्या शैलीत आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत जलद 33 धावांचे योगदान दिले. पहिले षटक टाकणाऱया नितीश राणाला मिडऑफ सीमारेषेकडे चौकारासाठी पिटाळत त्याने दमदार सुरुवात केली. यापूर्वी, इंग्लंडमधील कसोटी मालिकेत उत्तम बहरात राहिलेल्या रोहितने चेन्नईविरुद्ध सलामीची लढत खेळली नव्हती.
रोहितने येथे गूढ फिरकीसाठी ओळखल्या जाणाऱया वरुण चक्रवर्तीच्या डावातील चौथ्या षटकात सलग दोन चौकार फटकावले. दुसरीकडे, डी कॉकही फारसा मागे अजिबात नव्हता. नंतर तर डी कॉकने रोहितपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी साकारली. त्याने लॉकी फर्ग्युसनला दमदार षटकार खेचला.
सहाव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या प्रसिद्ध कृष्णाची मुंबईच्या फलंदाजांनी चौफेर धुलाई केली. प्रसिद्धला पहिल्याच षटकात 16 धावा मोजाव्या लागल्या. डी कॉकने आंद्रे रसेलला सलग चौकार फटकावत आक्रमक इरादे स्पष्ट केले. मुंबईने दमदार सुरुवात केल्यानंतर मॉर्गनला डावातील 11 व्या षटकापर्यंत आपले ट्रम्प कार्ड असणाऱया चक्रवर्तीचा 4 षटकांचा कोटा वापरणे भाग पडले. चक्रवर्तीचे या सामन्यातील पृथक्करण 4 षटकात 0-22 असे राहिले.
डी कॉक पूर्ण आक्रमणावर भर देत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रोहितने त्याला पूरक फलंदाजीवर भर दिला. नंतर सुनील नरेनने रोहितला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. नरेनने रोहितला टी-20 मध्ये बाद करण्याची ही नववी वेळ ठरली. सुर्यकुमार यादव (5) कृष्णाच्या आऊटस्विंगरवर बाद झाला. दिनेश कार्तिकने त्याचा सोपा झेल टिपला. डी कॉकने पुढे 14 व्या षटकात फर्ग्युसनला एकेरी धावेसाठी फटकावत अर्धशतक साजरे केले.
केकेआरने 10 ते 15 व्या षटकात केवळ 26 धावा देत 2 बळी घेतले आणि मुंबईच्या मोमेंटमला येथे खरा ब्रेक बसला. शेवटच्या 5 षटकात फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱया पोलार्डने उत्तम फटकेबाजी केली व यामुळे कृष्णाला एका षटकात 18 धावा मोजाव्या लागल्या. फर्ग्युसनने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करताना धोकादायक पोलार्ड व कृणाल पंडय़ा यांना अवघ्या 6 धावात तंबूत धाडले. मुंबईने डावातील शेवटच्या 5 षटकात 49 तर शेवटच्या 10 षटकात 75 धावा जमवल्या.
रोहितचे पुनरागमन, हार्दिकबाबत संभ्रम कायम
यापूर्वी चेन्नईविरुद्ध लढतीत खेळू न शकलेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात संघात परतला आणि त्याने दमदार फटकेबाजी केली. स्टार अष्टपैलू हार्दिक पंडय़ा मात्र येथेही खेळू शकला नसून यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रोहितला वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून विश्रांती दिली होती, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. मात्र, हार्दिक पंडय़ाबाबत काहीही खुलासा देण्यात आला नाही.
धावफलक
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. शुभमन, गो. नरेन 33 (30 चेंडूत 4 चौकार), क्विन्टॉन डी कॉक झे. नरेन, गो. प्रसिद्ध कृष्णा 55 (42 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), सुर्यकुमार यादव झे. कार्तिक, गो. प्रसिद्ध कृष्णा 5 (10 चेंडू), इशान किशन झे. रसेल, गो. फर्ग्युसन 14 (13 चेंडूत 1 षटकार), केरॉन पोलार्ड धावचीत (मॉर्गन-फर्ग्युसन) 21 (15 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), कृणाल पंडय़ा झे. अय्यर, गो. फर्ग्युसन 12 (9 चेंडूत 1 षटकार), सौरभ तिवारी नाबाद 5 (2 चेंडूत 1 चौकार), ऍडम मिल्ने नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 9 (लेगबाय 1, नोबॉल 2, वाईड 6). एकूण 20 षटकात 6 बाद 155.
गडी बाद होण्याचा क्रम
1-78 (रोहित, 9.2), 2-89 (सुर्यकुमार, 12.1), 3-106 (डी कॉक, 14.5), 4-119 (इशान, 16.2), 5-149 (पोलार्ड, 19.2), 6-149 (कृणाल, 19.3).
गोलंदाजी
नितीश राणा 1-0-5-0, वरुण चक्रवर्ती 4-0-22-0, सुनील नरेन 4-0-20-1, लॉकी फर्ग्युसन 4-0-27-2, प्रसिद्ध कृष्णा 4-0-43-2, आंद्रे रसेल 3-0-37-0.
केकेआर : शुभमन गिल त्रि. गो. बुमराह 13 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वेंकटेश अय्यर त्रि. गो. बुमराह 53 (30 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), राहुल त्रिपाठी नाबाद 74 (42 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार), इयॉन मॉर्गन झे. बोल्ट, गो. बुमराह 7 (8 चेंडू), नितीश राणा नाबाद 5 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 7 (लेगबाय 1, वाईड 6). एकूण 15.1 षटकात 3 बाद 153.
गडी बाद होण्याचा क्रम
1-40 (शुभमन, 2.6), 2-128 (वेंकटेश अय्यर, 11.4), 3-147 (मॉर्गन, 14.1).
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 2-0-23-0, ऍडम मिल्ने 3-0-29-0, जसप्रित बुमराह 4-0-43-3, कृणाल पंडय़ा 3-0-25-0, राहुल चहर 3-0-34-0, रोहित शर्मा 0.1-0-4-0.