अगरतळा / वृत्तसंस्था
त्रिपुरा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या विरोधात डावी आघाडी आणि काँगेस यांच्यात जागावाटप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तथापि, काही जागांवरुन या जागावाटपात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे डाव्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही घोषणा मंगळवारी होणार होती. काँगेसशी युती करण्याचे प्रयत्न पुन्हा होणार आहेत.
त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. डाव्या पक्षांनी ही निवडणूक लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करुन लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काँगेसशी बोलणी करण्यात येत आहेत. पण डाव्या पक्षांनी काही उमेदवारांची निवड परस्पर केल्याने युतीत अडथळे निर्माण झाले आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे, अशी घोषणा काँगेसचे प्रदेश अध्यक्ष बिरजित सिन्हा यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. तथापि, काही जागांवर वाद निर्माण झाला आहे. काँगेस 25 जानेवारीला, म्हणजेच उद्या बुधवारी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. कदाचित उद्याच डावे पक्षही त्यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
राज्यात 30 जानेवारीला उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची उमेदवार निश्चितीची धडपड सुरु आहे.