प्रतिनिधी /बेळगाव


गेल्या दोन आठवडय़ांपासून थंडीने बेळगावकर हैराण झाले आहेत. अति थंडीमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. ज्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झालेली आहे किंवा जे हृदयरोगाने पीडित आहेत, अशा लोकांनी अतिशय काळजी घेणे जरुरी आहे, असा सल्ला केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे मुख्य हृदय शल्यविशारद डॉ. रिचर्ड सालढाणा यांनी बेळगावकरांना दिला आहे.
थंडीच्या दिवसात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. आकुंचित पावलेल्या रक्तवाहिन्यांमुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यास हृदयावर खूप ताण पडतो. परिणामी रक्तदाब व हृदयगती वाढते. या कारणाने अति थंडीत हृदयाचा त्रास असणाऱयांना व ज्येष्ठ नागरिकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.
खालील गोष्टींचे पालन केल्यास
- हिवाळा सुखावह पहाटे चालायला जाणे टाळावे. थंडीपासून स्वतःला वाचविण्यासाठी स्वेटर, हातमोजे, पायमोजे घालून, टोपी किंवा स्कार्फने डोके व कान झाकून सकाळी कोवळ्या उन्हात चालण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.
- योगासने, प्राणायाम, चालणे असे व्यायाम करून स्वतःला गरम ठेवणे. कठीण व तणावपूर्ण व्यायाम करू नयेत.
- घरीच बनविलेले ताजे अन्न खावे व पाणी पण गरमच प्यावे. आरोग्यदायी भाज्यांचे सूप सेवन करावे, तळलेले व मसालेदार पदार्थ टाळावेत.
- छातीत दुखत असेल किंवा खूप घाम येत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. दररोजची औषधे न चुकता घ्या व नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कार्यक्रमास हजर राहण्याचे, तसेच रात्री प्रवास करण्याचे टाळावे.
- प्रकृती नाजूक असेल व ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही लसीचा बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे.
वरील नियमांचे काटेकोर पालन केल्यास आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते व हिवाळ्यात होणाऱया विविध आजारांपासून आपण दूर राहू शकतो, असे डॉ. सालढाणा यांनी स्पष्ट केले आहे.