Tarun Bharat

’थर्टीफर्स्ट’च्या चांदण्याला ‘ओमिक्रोन’चे ग्रहण!

प्रतिक तुपे/ दापोली

कोरोना शिथिलतेनंतर मिनी महाबळेश्वर म्हणून गणल्या जाणाऱया दापोलीतील पर्यटन क्षेत्रे पुन्हा बहरू लागली होती. त्या निमित्ताने नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली तालुक्यातील रिसॉर्ट हाऊसफुल्ल आरक्षणाच्या दिशेने वाटचाल करत होती. मात्र आता नव्या ओमिक्रोन महामारीच्या इशाऱयानंतर संभाव्य लॉकडाऊनमुळे आरक्षण रद्द झाली तर पैसे परत मिळतील ना, असे उलट दूरध्वनी करण्यास पर्यटकांनी सुरूवात केली आहे. 

 कोरोनानंतर सर्वच उद्योग व्यवसायांची आर्थिक चाके रूळावर येत असतानाच कोरोनाच्या ओमिक्रोन नावाच्या व्हेरिएंटने आता डोके वर काढले आहे. या विषाणूमुळे सगळय़ाच क्षेत्रांना ब्रेक लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बाबत सावधगिरी म्हणून शासनाने नवीन कडक नियमावलीही जारी केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने दिलासा मिळालेले दापोलीचे पर्यटन क्षेत्र पुन्हा चिंतेत पडले आहे. या तालुक्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्रातील उलाढालीचा मोठा वाटा असतो. साहजिकच गेल्या लॉकडाऊनमुळे या उद्योगाशी संबंधित व्यावसायिक, कामगारांची मोठी आर्थिक हानी झाली होती. यंदा मात्र दिवाळीनंतर कोरोनाबाबतची शिथिलता वाढल्याने पर्टकांनी पुन्हा ‘मिनी महाबळेश्वर’ची वाट पकडण्यास सुरूवात केली.

  यंदा नोव्हेंबरचे विकेंड फूल गेलेच, पण 31 डिसेंबरपर्यंतचे आरक्षण वेगाने सुरू होते. 31 डिसेंबरचा आठवडा महत्वाचा असला तरी संपूर्ण डिसेंबर महिन्यातील सर्वच विकेंड नववर्ष स्वागतासाठीचा आनंद अनुभवण्यासाठी पर्यटकांकडून आरक्षित केले जातात, पण ओमिक्रोनची माहिती होऊन 2 दिवस होतात न होतात तोच सरकारने नवीन नियमावली जारी केल्याने पर्यटन व्यावसायिक चिंतेत पडले आहेतच, पण पर्यटकांच्या आनंदावरही विरजण पडले आहे. त्यामुळे जर येण्यास जमले नाही तर आरक्षणाचे पैसे परत द्याल ना, असे प्रश्न आता पर्यटक फोन करून रिसॉर्ट व्यावसायिकांना विचारत आहेत. त्यामुळे या विषाणूचा परिणाम आता कुठे आताच फुलत असलेल्या पर्यटन व्यवसायावर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

  इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी अर्थात थर्टीफस्टसाठी मुंबई, पुणे व आदी मोठय़ा शहरांमधून पर्यटक दापोलीत हजेरी लावतात. मात्र काही वर्षे थर्टीफस्ट काही ना काही कारणात्व शांततेत गेला. दोन वर्षे तर कोरोनामुळे अडचण आली तर आता थर्टीफस्ट आनंदात जाईल, जोमात साजरा होईल, असे असतानाच नवीन विषाणूचे   ग्रहण या पर्यटन क्षेत्राला लागले आहे. या ग्रहणाचा परिणामही पर्यटनक्षेत्राला रविवारपासून जाणवू लागल्याचे समोर आले. त्यामुळे यावर्षीचा थर्टीफस्ट वाया जाण्याची शक्यताही पर्यटनक्षेत्रामधून व्यक्त होत आहे. 

आधीच पर्यटक कमी त्यात संकट 

शुक्रवार, शनिवार व रविवार मुरूडकडे पर्यटक कमी आले होते. नवीन विषाणूचा    प्रभाव असू शकतो. लोकांच्या मनात पण किंतू सुरू आहे. जर निर्बंध लागले तर मात्र रिसॉर्ट व्यवसायावर संक्रांतच येईल. आता कुठे हॉटेल, रिसॉर्ट व्यवसाय सुरू झाला आहे. 2 वर्षात मोठी संकटे समुद्रालगत असलेल्या नागरिकांनी सोसली आहेत. तोच पुन्हा संकट आले तर सगळेच मोठय़ा महासंकटात पडतील व रिसॉर्ट-हॉटेल व्यवसायावर हे मोठे संकटच असेल. त्यामुळे आधीच कमी पर्यटक असून त्यात संकट आल्यामुळे हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांमध्ये चिंता वाढत आहे.    

-विराज खोत 

मुरूड, युवा हॉटेल व्यावसायिक 

परिणाम जाणवेल   ओमिक्रोन व्हेरिएंट या विषाणूबाबत पर्यटकांमध्येही परिणाम जाणवत आहेत. पर्यटकांनाही हुरहूर लागली आहे. अनेकजण चिंताही व्यक्त करत आहेत. जर याचा धोका निर्माण झाला, शासनाने निर्बंध अधिक कडक घातले तर मात्र हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायावर परिणाम होईल. अनेक हॉटेल्सचे पर्यटकांनी आगावू आरक्षण केले आहे. शासनाने हॉटेल व्यवसायाबाबत अथवा सार्वजनिक घटकांवर निर्बंध जारी केल्यास आरक्षण रद्ददेखील होऊ शकते आणि थर्टीफर्स्टवरही परिणाम होईल. 

Related Stories

केंद्राकडूनही मदतीसाठी प्रयत्नशील

Patil_p

जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जेरोन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना प्रदान

Anuja Kudatarkar

वेंगुर्लेतील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचाचा 2 रोजी जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

Anuja Kudatarkar

रत्नागिरीत पुन्हा येण्याचे दिदींचे स्वप्न राहिले अधुरे!

Patil_p

रेडी गावात ग्राम विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

Anuja Kudatarkar

जिल्हय़ात ‘वादळी पावसा’ची शक्यता

NIKHIL_N