Tarun Bharat

थिएटर जानेवारीपर्यंत राहणार बंद

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमावलींचे पालन करण्यात अडचणी येत असल्याने राज्यातील सर्व थिएटर चालकांनी जानेवारी 2021 पर्यंत थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक चित्रपट वितरण महासंघाने हा निर्णय सर्वसंमतीने घेतला आहे.

सरकारने 5 ते 6 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर थिएटर उघडण्यास परवानगी दिली. मात्र, त्याचवेळी काही नियमांचे पालन बंधनकारक केले. तथापि, कोरोनाची भीती अद्याप असल्याने थिएटरना गर्दी होणार नाही हे एक महत्त्वाचे कारण लक्षात घेऊन महासंघाने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सरकारच्या नियमावलीचे पालन करणे तांत्रिकदृष्टय़ा कठीण होणार आहे, असेही स्पष्ट केले.

चित्रपट निर्मात्यांनी कोणत्याही नवीन चित्रपटाचे प्रदर्शन जानेवारी उजाडेपर्यंत करायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वितरक महासंघानेसुद्धा जानेवारीपर्यंत थिएटरचे दरवाजे उघडायचे नाहीत, असे ठरविले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून थिएटर चालकांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. दुसरीकडे महासंघाने सरकारकडे केलेल्या मागण्यांबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याने थिएटर चालक सरकारवर नाराज आहेत.

राज्य सरकारने थिएटर चालकांसाठी परवाना नूतनीकरणाच्या शुल्कामध्ये भरमसाट वाढ केली आहे. जुन्या दरानुसार 100 स्क्वे. मीटरसाठी 1 हजार शुल्क आकारले जात होते. यामध्ये दुप्पटीने नव्हे तर तिप्पटीने वाढ झाली असून सध्या 4 हजार 500 रुपये शुल्क देण्याची सक्ती करण्यात आली आहे. सरकार चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देते. मात्र, उद्योगांना मिळणाऱया सुविधा थिएटर चालकांना देण्यास नाकारते.

वातानुकूलित व बिनवातानुकूलित थिएटरसाठीचा सेवा कर वाढविण्यात आला आहे. एकूणच सरकारचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला न्याय देण्याजोगा नाही. सरकारच्या सापत्नभावाबद्दल आम्ही नाराज असून जानेवारीपर्यंत तरी आम्ही थिएटर उघडणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 

Related Stories

आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या!

Amit Kulkarni

राष्ट्रीय स्पर्धेत कंप्लीट कराटे संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

रामलिंग खिंड गल्लीत घराची भिंत कोसळली

Amit Kulkarni

ममदापुरात दीपोत्सव भक्तिमय वातावरणात

Amit Kulkarni

सफाई कर्मचाऱयांना मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन

Patil_p

‘लोकमान्य’कडून सामाजिक बांधिलकीचीही जपवणूक

Amit Kulkarni