मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा अल्टीमेटम
वृत्तसंस्था/ लखनौ
भाजपने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीकरता रविवारपासून सामाजिक प्रतिनिधी संमेलनाचा प्रारंभ केला आहे. भाजपने 15 दिवसांमध्ये 27 संमेलनांच्या आयोजनाचा कार्यक्रम आखला आहे. लखनौमध्ये रविवारी पहिल्या संमेलनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभार आणि प्रजापति समुदायाच्या प्रतिनिधींना संबोधित केले. यावेळी बोलताना योगींनी मागील 4 वर्षांमध्ये कुठलीच दंगल झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच दंगलखोरांना दंगल कराल तर 6 पिढय़ा भरपाई करत राहतील असा स्पष्ट संदेश दिल्याचे विधान केले आहे.
भाजप हा राष्ट्रीय विचारसरणीचा पक्ष आहे. सर्वांच्या सुखाची कामना करण्यासह सबका साथ, सबका विश्वास तसेच सबका विकास भाजप इच्छितो. साडेचार वर्षांपेक्षा अधिकच्या कार्यकाळात आमच्या सरकारने सर्व सण शांततेत पार पडतील याची खबरदारी घेतली आहे. पूर्वी सणांवेळी संचारबंदी लागू व्हायची. आम्ही राज्यात कुठेच धर्म, जात, पंथाच्या नावावर दंगल घडू दिलेली नाही. दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱयांना असा धडा शिकविला की त्यांचे पूर्वज देखील ही गोष्ट आठवणीत ठेवतील. पूर्वी सरकारांची वृत्तीची दंगलीची होती. ते दंगलखोरांना बळ पुरविण्याचे काम करायचे असे म्हणत योगींनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले आहे.
समाजातील एखादा घटक दुर्बल असल्यास समाज तंदुरुस्त होऊ शकत नाही. राज्यात पूर्वी वीजपुरवठय़ात भेदभाव व्हायचा. पूर्वी 75 जिल्हय़ांपैकी केवळ 4 जिल्हय़ांमध्ये पूर्णवेळ वीज उपलब्ध व्हायची. आज कोळशाच्या कमतरतेमुळे सरकार 22 रुपये युनिट दराने वीज खरेदी करतेय, पण आम्ही एक समान वीज देतोय असे उद्गार योगींनी म्हटले आहे.