Tarun Bharat

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत चारीमुंडय़ा चीत!

Advertisements

स्टार खेळाडूंनी ठासून भरलेल्या भारताविरुद्ध यजमानांचा 2-1 फरकाने एकतर्फी मालिकाविजय

केपटाऊन / वृत्तसंस्था

सर्वात खडतर संक्रमणातून जात असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाची तिसऱया कसोटी सामन्यातही धुळधाण उडवली आणि 3 सामन्यांची ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत भारताला खऱया अर्थाने चारीमुंडय़ा चीत केले! 2 बाद 101 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात करत 212 धावांचे लक्ष्य गाठणे हा आफ्रिकन फलंदाजांसाठी केकवॉक ठरला. त्यांनी 63.3 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.

युवा धडाकेबाज फलंदाज कीगन पीटरसन (113 चेंडूत 10 चौकारांसह 82) व रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन (70 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 32) यांनी तिसऱया गडय़ासाठी 54 धावांची भागीदारी साकारली. त्यानंतर डय़ुसेनने बवूमाच्या साथीने विजयावर थाटात शिक्कामोर्तब करुन दिले. बवूमाने नाबाद 32 धावांचे योगदान दिले. त्याच्या 58 चेंडूतील खेळीत 5 चौकारांचा समावेश राहिला.

3 सामन्यांच्या या मालिकेतील शेवटच्या 2 कसोटी सामन्यात भारताने किंचीतही प्रतिकार केला नाही, ते अगदीच निराशाजनक होते, अशी टिपणी सुनील गावसकर यांनी केली, ते साहजिकच होते. ऍनरिच नोर्त्झेसारखा अव्वल खेळाडू दुखापतीमुळे मालिकेपूर्वीच बाहेर फेकला गेल्याने आणि क्विन्टॉन डी कॉकने मालिकेच्या मध्यातच निवृत्ती जाहीर केल्याने यजमान संघासमोर अडचणी होत्या. पण, तरीही ते भारताविरुद्ध दणकेबाज मालिकाविजय संपादन करण्यात कमालीचे यशस्वी ठरले, याचे श्रेय त्यांच्या चिवट खेळीला जाते.

गुरुवारी या सामन्याच्या तिसऱया दिवशी एल्गारला नाबाद ठरवले गेले, तेथेच जणू संघर्ष सोडून देणाऱया भारतीय खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी स्टम्प माईकचा आधार घेतला. पण, तितके प्रयत्न गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्यासाठी झाले का, हा प्रश्न अधिक सतावणारा ठरला. या निकालासह भारतीय संघ 3 दशकानंतरही द. आफ्रिकन भूमीत कसोटी मालिकाविजय संपादन करण्यापासून दूरच राहिल्याचे सुस्पष्ट झाले. द. आफ्रिकेत मालिका अनिर्णीत राखणारा महेंद्रसिंग धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे. त्याने 2010 मध्ये असा पराक्रम गाजवला होता. विराटला मात्र दक्षिण आफ्रिकन मालिकेत दुसऱयांदा कसोटी मालिका गमवावी लागली आहे.

भारतीय संघ कागदावर नेहमीच वाघ असतो. पण, या कागदी वाघांना धडा शिकवणारे अनेक दिग्गज झाले आहेत, त्यात या नवख्या खेळाडूंचा अधिक समावेश असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाचा समावेश झाला. भारतीय खेळाडूंनी काही प्रसंगी स्लेजिंग करुन पाहिले. पण, ती मात्रा देखील चालली नसल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. भारतीय गोलंदाजांनी मागील काही मालिकांमध्ये अव्वल कामगिरी साकारली होती. पण, येथे ते अपेक्षापूर्ती करु शकले नाहीत, ही वस्तुस्थिती पचवणे कठीण ठरले. जसप्रित बुमराह व शमीने प्रामाणिक प्रयत्न केले असले तरी मुळातच कमी धावसंख्या फलकावर असल्याने त्यांच्या प्रयत्नांवर मर्यादा राहिल्या.

बुमराहने अधिक काटेकोर मारा केला. मात्र, पुजाराने पीटरसनला जीवदान दिल्याने याचा फटका सोसावा लागला. पीटरसन त्यावेळी 59 धावांवर खेळत होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पुजाराने रॉस टेलरचा झेल सोडला होता, त्या आठवणीला येथे उजाळा मिळाला. योगायोग म्हणजे त्यावेळीही बुमराहच गोलंदाजी करत होता.

शुक्रवारी शार्दुलने अंतिमतः पीटरसनला बाद केले. पण, दक्षिण आफ्रिकन संघ मालिकाविजयावर थाटात शिक्कामोर्तब करु शकेल, याची तजवीज पीटरसनने त्यापूर्वीच करुन ठेवली होती. या मालिकेत चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे उपयुक्तता सिद्ध करु शकले नाहीत आणि पुढील मालिकेत त्यांना संघातील जागा कायम राखणे कष्टप्रद ठरले तर यात आश्चर्याचे कारण नसेल.

धावफलक

भारत पहिला डाव : सर्वबाद 223

दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद 210.

भारत दुसरा डाव : सर्वबाद 198.

दक्षिण आफ्रिका दुसरा डाव (टार्गेट 212) ः एडन मॅरक्रम झे. राहुल, गो. शमी 16 (22 चेंडूत 4 चौकार), डीन एल्गार झे. पंत, गो. बुमराह 30 (96 चेंडूत 3 चौकार), किगन पीटरसन त्रि. गो. शार्दुल 82 (113 चेंडूत 10 चौकार), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन नाबाद 41 (95 चेंडूत 3 चौकार), तेम्बा बवूमा नाबाद 32 (58 चेंडूत 5 चौकार). अवांतर 11. एकूण 63.3 षटकात 3 बाद 212.

गडी बाद होण्याचा क्रम

1-23 (मॅरक्रम, 7.3), 2-101 (एल्गार, 29.4), 3-155 (किगन, 46.2).

गोलंदाजी

बुमराह 17-5-54-1, मोहम्मद शमी 15-3-41-1, उमेश यादव 9-0-36-0, शार्दुल ठाकुर 11-3-22-1, रविचंद्रन अश्विन 11.3-1-51-0.

आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिका

क्रमांक / संघ / सामने / विजय / पराभव / अनिर्णीत / निकाल नाही / गुण

1 / श्रीलंका / 2 / 2 / 0 / 0 / 0 / 24

2 / ऑस्ट्रेलिया / 4 / 3 / 0 / 1 / 0 / 40

3 / पाकिस्तान / 4/ 3 / 1 / 0 / 0 / 36

4 / भारत / 10 / 4 / 3 / 2 / 1 / 53

5 / द. आफ्रिका / 3/ 2 / 1 / 0 / 0 / 24

6 / न्यूझीलंड / 4/ 1 / 2 / 1 / 0 / 16

7 / बांगलादेश / 4 / 1 / 3 / 0 / 0 / 12

8 / विंडीज / 4 / 1 / 3 / 0 / 0 / 12

9 / इंग्लंड / 9 / 1 / 5 / 2 / 1 / 10.

गंभीर म्हणतो, अशा रितीने विराट कधीच रोल मॉडेल होऊ शकणार नाही!

स्टम्प माईकच्या जवळ जाऊन इतक्या वाईट पद्धतीने रिऍक्ट होणे अतिशय दुर्दैवी होते. एखाद्या आंतरराष्ट्रीय कर्णधाराकडून, भारतीय कर्णधाराकडून अशी अपेक्षा कोणीच करणार नाही. अशा रितीने विराट युवा खेळाडूंसाठी कधीच रोल मॉडेल होऊ शकणार नाही, असे माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर शुक्रवारी म्हणाला. विराटसह केएल राहुल, रविचंद्रन अश्विन यांनी स्टम्प माईकजवळ जात आपली नाराजी नोंदवली. त्या पार्श्वभूमीवर गौतम गंभीर म्हणत होता.

कोणतेही तंत्रज्ञान आपल्या हातात असत नाही आणि ज्या बाबी आपल्या हातात नाहीत, त्यावर अशा पद्धतीने रिऍक्ट होणे योग्य ठरत नाही. मयांक अगरवाल अपीलमध्येही अशीच परिस्थिती होती. ते उघडय़ा डोळय़ानेही दिसत होते. पण, त्यावेळी द. आफ्रिकन कर्णधार एल्गार असा रिऍक्ट झाला नव्हता, हे विराटने समजून घ्यावे, असे गंभीर पुढे म्हणाला.

कोट्स

निर्णय आपल्या बाजूने जाऊ शकतात, आपल्या विरोधातही जाऊ शकतात. विराट हा लिजेंड आहे. पण, या कसोटीत तो ज्या पद्धतीने रिऍक्ट झाला, ते त्याला अजिबात साजेसे नाही.

-माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन

रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने दाखवले गेले, त्याप्रमाणे चेंडू तितका उंच वर जाऊ शकला असता, असे मला वाटत नाही. तो चेंडू स्टम्पच्या रोखानेच होता. अगदी इरास्मूस यांची नाराजीही दिसून आली होती.

-माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न

विराट नेहमी आपल्याला रुचेल त्या पद्धतीने वागतो आणि भारत पॉवरहाऊस आहे, म्हणून हे खपवून घेतले जाते. मी व्यक्तिशः विराटचा चाहता आहे. पण, अशा वर्तणुकीला शिक्षा होणे आवश्यक आहे.

-माजी द. आफ्रिकन फलंदाज डॅरेल कलिनन

कसोटी मालिकेचा लेखाजोखा

लढत / ठिकाण / सामन्याचा निकाल

पहिली कसोटी / सेंच्युरियन / भारत 113 धावांनी विजयी

दुसरी कसोटी / जोहान्सबर्ग / द. आफ्रिका 7 गडय़ांनी विजयी

तिसरी कसोटी / केपटाऊन / द. आफ्रिका 7 गडय़ांनी विजयी

मालिकेत दोन्ही संघांतर्फे सर्वाधिक धावा  (किमान 100 धावा)

खेळाडू / सामने / डाव / नाबाद / धावा / सर्वोच्च / सरासरी / शतके / अर्धशतके

किगन पीटरसन / 3 / 6 / 0 / 276 / 82 / 46.00 / 0 / 3

डीन एल्गार / 3 / 6 / 1 / 235 / 96* / 47.00 / 0 / 2

केएल राहुल / 3 / 6 / 0 / 226 / 123 / 37.66 / 1 / 1

तेम्बा बवूमा / 3 / 6 / 3 / 221 / 52 / 73.66 / 0 / 2

रिषभ पंत / 3 / 6 / 1 / 186 / 100* / 37.20 / 1 / 0

विराट कोहली / 2 / 4 / 0 / 161 / 79 / 40.25 / 0 / 1

अजिंक्य रहाणे / 3 / 6 / 0 / 136 / 58 / 22.66 / 0 / 1

मयांक अगरवाल / 3 / 6 / 0 / 135 / 60 / 22.50 / 0 / 1

चेतेश्वर पुजारा / 3 / 6 / 0 / 124 / 53 / 20.66 / 0 / 1

रॅस्सी डय़ुसेन / 3 / 6 / 1 / 117 / 41* /23.40 / 0/ 0

बॉक्स

मालिकेत दोन्ही संघातर्फे सर्वाधिक बळी (किमान 10 बळी)

खेळाडू / सामने / डाव / षटके / धावा / बळी / डावात सर्वोत्तम

कॅगिसो रबाडा / 3 / 6 / 119.1 / 381 / 20 / 4-42

मार्को जान्सन / 3 / 6 / 103.3 / 313 / 19 / 4-31

लुंगी एन्गिडी / 3 / 6 / 83.4 / 225 / 15 / 6-71

मोहम्मद शमी / 3 / 6 / 102.0 / 294 / 14 / 5-44

शार्दुल ठाकुर / 3 / 6 / 72.5 / 229 / 12 / 7-61

जसप्रित बुमराह / 3 / 6 / 104.5 / 281 / 12 / 5-42

कोट्स

आम्ही मालिकेत उत्तम सुरुवात केली. पण, द. आफ्रिकन संघ मुसंडी मारण्यात यशस्वी ठरला. स्टम्प माईकबाबत मी काहीही मतप्रदर्शन करु इच्छित नाही. मैदानावर जे घडले, ते मैदानाबाहेरील लोकांना माहीत नाही, इतकेच सांगता येईल. आम्ही 3 बळी लवकर घेऊ शकलो असतो तर वेगळे चित्र दिसून आले असते.

-भारतीय कर्णधार विराट कोहली

पहिली कसोटी गमवावी लागल्यानंतर देखील आम्ही मालिकाविजय संपादन करु शकलो, याचा सार्थ अभिमान आहे. पहिल्या पराभवानंतर मी माझ्या सहकाऱयांना मालिकाविजय खेचून आणण्याचे आवाहन केले आणि त्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळेच हा मालिकाविजय शक्य झाला.

-दक्षिण आफ्रिकन कर्णधार डीन एल्गार

भारतातर्फे मालिकेत 2 शतके, आफ्रिकेकडून एकही नाही, तरीही आफ्रिकेचा मालिकाविजय!

उभय संघातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकूण 2 शतके झळकावली गेली आणि ती दोन्ही शतके भारतीय फलंदाजांनी झळकावली. ते फलंदाज होते केएल राहुल व रिषभ पंत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला शतक साजरे करता आले नाही. तरीही दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला. द. आफ्रिकेतर्फे एल्गारची नाबाद 96 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठरली.

Related Stories

फॉलोऑननंतर पाकिस्तानची सावध सुरुवात

Patil_p

भारताची न्यूझीलंडवर मात

Patil_p

बेंगळूर एफसीची विजयाने सांगता

Patil_p

रवि दाहियाला सुवर्ण, दीपक पुनिया अंतिम फेरीत

Patil_p

भारत अ संघाचा इंग्लंड दौरा रद्द, मात्र कसोटीसाठी जंबो संघ

Patil_p

एचएस प्रणॉयची बॅडमिंटन संघटनेकडे क्षमायाचना

Patil_p
error: Content is protected !!