Tarun Bharat

दक्षिण चीन समुद्रात भारतीय युद्धनौका तैनात

चीनला ठोस प्रत्युत्तर : ड्रगनचा विरोध झुगारला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात चिनी सैनिकांसोबत हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने अत्यंत मोठे पाऊल उचलत दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केली आहे. चीनने दोन्ही देशांदरम्यान झालेल्या चर्चेत या कृतीवर आक्षेप घेतला होता. दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या उपस्थितीवर चीन सातत्याने हरकत घेत आहे. या भागात चीनने सैन्य तसेच कृत्रिम बेटांचा वापर करत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे.

गलवान खोऱयातील हिंसक झटापटीनंतर भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केली आहे. अन्य कुठल्याही देशाच्या नौदलाच्या उपस्थितीवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदलाकडून आक्षेप घेतला जातो अशाच ठिकाणी भारताने एका अर्थाने पाय रोवले आहेत. दक्षिण चीन समुद्राचा बहुतांश हिस्सा आपल्या अधिकारक्षेत्रात असल्याचा चीनचा दावा आहे.

चीनकडून तक्रार

दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाची युद्धनौका तत्काळ तैनात करण्यात आल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. भारतासोबतच्या राजनयिक पातळीवरील चर्चेत चीनने युद्धनौकेच्या उपस्थितीविषयी तक्रार केली होती.

अत्यंत गुप्त मोहीम

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या नौदलाने स्वतःची विध्वंसिका आणि फ्रिगेट तैनात केल्या आहेत. भारतीय युद्धनौका सातत्याने अमेरिकेच्या नौदलाशी संपर्क ठेवून होत्या. दैनंदिन कार्यवाहीच्या स्वरुपात भारतीय युद्धनौकेला सातत्याने अन्य देशांच्या सैन्यजहाजांच्या वाहतुकीविषयी माहिती पुरविली जात होती. कुठल्याही प्रसिद्धीला टाळण्यासाठी पूर्ण मोहीम अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मलाक्का सामुद्रधूनीतही युद्धनौका

भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटसमुहानजीक मलाक्का सामुद्रधूनीत चिनी नौदलाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी स्वतःच्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. चिनी नौदल याच मार्गाने हिंदी महासागरात प्रवेश करते. याचबरोबर अनेक चिनी जहाजेही कच्चे तेल किंवा मालासह अन्य खंडांकरता याच मार्गाने जात असतात. भारतीय नौदल पूर्व किंवा पश्चिम आघाडीवर शत्रूच्या कुठल्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. मोहीम आधारित तैनात करण्यात आल्याने हिंदी महासागर क्षेत्र आणि त्याच्या लगत सातत्याने उदयास येणाऱया स्थितींना प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत मिळाली आहे.

चिनी नौदलावर करडी नजर

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या युद्धनौकांच्या मलाक्का सामुद्रधूनीपासून हिंदी महासागरात होणाऱया हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारतीय नौदल अंडरवॉटर नौका, अन्य मानवरहित यंत्रणा आणि सेन्सर्स त्वरित प्राप्त करून तैनात करण्याची योजना आखत आहे. याचबरोबर भारतीय नौदल जिबूतीनजीक असलेल्या चिनी नौकांवरही नजर ठेवून आहे. नौदलाने राष्ट्रीय हिताकरता आसपासच्या भागांमध्ये स्वतःच्या यंत्रणा तैनात केल्या आहेत.

मिग-29 के विमान तैनात

नौदलाने वायुदलाच्या एका महत्त्वपूर्ण तळावर स्वतःची मिग-29 के लढाऊ विमानेही तैनात केली आहेत. नौदल 10 नेव्हल शिपबॉर्न मानवरहित हवाईवाहनांच्या खरेदीसाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्यासाठी 1,245 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार होण्याची अपेक्षा आहे.

Related Stories

प्राचीन ग्रंथाचे धडे देणार आयआयटी इंदौर

Patil_p

कोरोना रूग्णांची संख्या 30 लाखांवर

Patil_p

CRPF बटालियन नेणाऱ्या रेल्वेत स्फोट; 6 जवान जखमी

datta jadhav

‘नीट-पीजी’ परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर

Amit Kulkarni

डिजिटल स्थानांतरणामुळे चित्रपट निर्मात्यांच्या मानसिकतेत बदल : आदित्य विक्रम सेनगुप्ता

Archana Banage

क्रिकेटमधील आधुनिक द्रोणाचार्य…

Patil_p