Tarun Bharat

दख्खनचा राजा ज्योतिबा लवकरच येणार भेटीला

मनोरंजन विश्वात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. लवकरच ज्योतिबाचं महात्म्य सांगणारी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होत आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात.

कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱया दख्खनचा राजा ज्योतिबा या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मालिकेच्या रुपात ज्योतिबा भेटीला येणं हा शुभसंकेतच म्हणायला हवा. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन्सने हे नवं आव्हान स्वीकारलं असून दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका 23 ऑक्टोबरपासून सायंकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे.

या मालिकेच्या भव्यतेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ’स्टार प्रवाह प्रस्तुत दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका अभ्यासपूर्वक बनवली जात आहे. आपल्या रसिकांपर्यंत प्रामाणिक मनोरंजनाद्वारे त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहित असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येणार आहेत. भाविक आवर्जून ही मालिका बघतील, आणि त्यांना आपल्या लाडक्या ज्योतिबाची मालिका आणि त्यांचा महिमा घरबसल्या पहाता येईल. निर्माते महेश कोठारे म्हणाले, ’या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरु आहे. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हेदेखिल आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे. यासाठी लागणार्या बर्याच गोष्टी मुंबईहून ट्रान्सपोर्ट कराव्या लागल्या. यासोबत निलीमा कोठारे आणि नीता खांडके यांच्या एन क्रिएशन्सचं सुद्धा कौतुक ज्यांनी खूप रिसर्च करुन मालिकेसाठी पोशाख आणि दागिने तयार केले आहेत. हे करताना अनेक पोथ्यांचे दाखले घेण्यात आले आहेत. मालिकेला या सगळ्या गोष्टी वेगळ्या उंचीवर नेतील याची खात्री आहे.‘

डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे हे या मालिकेचे तज्ञ सल्लागार आहेत. त्यांची मराठी विषयात पीएचडी  (विद्यावचस्पती) झालेली आहे. संशोधक आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात ते परिचित आहेत. महाराष्ट्रातील लोकदैवते हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे. ज्योतिबा देवावरचे त्यांचे संशोधन पुस्तकरूपाने लवकरच प्रसिद्ध होत आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव (राज्य मंत्री दर्जा) कोल्हापूर यांचं देखील या मालिकेसाठी मार्गदर्शन लाभत आहे. मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे असून अविनाश वाघमारे दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

Related Stories

…म्हणून दीपिकाने दिला नकार

tarunbharat

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानीविरोधात गुन्हा दाखल

Tousif Mujawar

दीपिका पादुकोणने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

Archana Banage

देशात पहिल्यांदाच खेळण्यांचा मेळा

Amit Kulkarni

सिद्धार्थच्या ‘योद्धा’मध्ये दिशा अन् राशिची एंट्री

Patil_p

हार्दिक म्हणतो… मला आलं दडपण

Patil_p
error: Content is protected !!