बेंगळुर / ऑनलाईन टीम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांचे निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक पार पडली. दत्तात्रय होसबळे यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी ते संघात सह सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते.
गेल्या दोन दिवसांपासून बेंगळुरमध्ये संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक सुरू आहे. सरकार्यवाह निवडण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदाच नागपूरबाहेर ही सभा झाली.
कोण आहेत दत्तात्रय होसबळे
दत्तात्रय होसबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह सरकार्यवाह होते. त्यांची नुकतीच सरकार्यवाह म्हणून निवड झाली आहे. तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याचे प्रसिद्ध विचारक देखील आहेत. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ ला कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील सोराबा तालुक्यात झाला. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे १९६८ ला संघात प्रवेश करून संघाचे स्वयंसेवक बनले.