Tarun Bharat

दबंग दिल्ली प्रथमच प्रो कबड्डीचे चॅम्पियन्स!

शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या रोमांचक अंतिम लढतीत पाटणा पायरेट्सवर अवघ्या एका गुणाने मात

बेंगळूर / वृत्तसंस्था

अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या रोमांचक फायनल लढतीत दिल्ली दबंग केसी संघाने पाटणा पायरेट्सला 37-36 अशा निसटत्या फरकाने मात देत प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे जेतेपद काबीज केले. निर्णायक फायनलमध्ये संयम व आक्रमण याचा उत्तम मिलाफ साधत दिल्लीने पहिल्यांदाच विजयावर शिक्कामोर्तब केले. पाटणाच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक डाव-प्रतिडाव टाकले. मात्र, दिल्लीच्या दबंगवीरांनी यश खेचून आणत पाटणाचे सर्व मनसुबे अक्षरशः धुळीस मिळवले.

दिल्लीने जेतेपदावर शिक्कामोर्तब करताच त्यांचे प्रशिक्षक कृष्णन हुडा यांनी नवीनकुमारला आलिंगन देत आपला आनंद व्यक्त केला. खेळाडूंचा खराब फॉर्म, दुखापती अशा कित्येक अडचणींवर मात करत त्यांनी संघाला मिळवून दिलेले हे पहिले जेतेपद विशेष लक्षवेधी ठरले.

दिल्लीच्या विजयात नवीनकुमार व विजय यांनी सुपर-10 गुणांसह सिंहाचा वाटा उचलला. दिल्ली संघाने यंदाच्या हंगामातील दोन्ही साखळी सामन्यात पाटणा पायरेट्सला धूळ चारली होती. तोच कित्ता येथेही गिरवत त्यांनी अगदी थाटात जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. आठव्या आवृत्तीचे जेतेपद जिंकल्यानंतर दिल्लीच्या गोटात उत्साह संचारणे साहजिकच होते. पाटणाचे चौथ्या जेतेपदाचे स्वप्न मात्र येथे या निकालामुळे चक्काचूर झाले.

या स्पर्धेत पाटणा पायरेट्सने गुणतालिकेत अव्वलस्थानी राहत उपांत्य फेरीसाठी स्थान मिळवले तर यूपी योद्धाला 38-27 अशा फरकाने मात देत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते. दुसरीकडे, दिल्लीने दुसऱया स्थानी राहत सेमी फायनलचे तिकीट मिळवले आणि बेंगळूर बुल्सला 40-35 अशा फरकाने मात देत फायनलमध्ये धडक मारली होती.

शुक्रवारी रंगलेल्या अंतिम फेरीतील पहिल्या सत्रात उभय संघात बरीच झटापट रंगत राहिली आणि सामन्याचा कल सातत्याने या संघाकडून त्या संघाकडे झुकत राहिला. पहिल्या 3 मिनिटानंतर उभय संघात 3-3 अशी बरोबरी होती आणि काही मिनिटांच्या खेळानंतर पाटणाने दिल्लीला ऑलआऊट करत थोडीशी झलक दाखवली होती. मात्र, नंतर ते हाच धडाका कायम राखू शकले नाहीत. उलटपक्षी, दिल्लीने मजल-दरमजल प्रवासावर भर देत एक-दोन गुणांवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि यामुळे पाटणावर दडपण वाढत राहिले.

या स्पर्धेतील अन्य लढतीत पाटणाने सांघिक खेळाच्या बळावर यश खेचून आणले होते. येथे निर्णायक फायनलमध्ये मात्र त्यांची हीच बाजू बरीच तोकडी पडली. दिल्लीचा बचाव प्रारंभी बराच फ्लॉप ठरला असला तरी त्यांनी सामन्यात अंतिमक्षणी मुसंडी मारण्याची रणनीती यशस्वी करण्याच्या दृष्टीने भर दिला आणि यात यश देखील संपादन केले. पहिल्या ब्रेकनंतर 17-15 अशी निसटती आघाडी मिळवणाऱया पाटणाला दुसऱया सत्रात बऱयाच दडपणाचा सामना करावा लागला आणि दिल्ली संघाने एकेक गुण मिळवत अंतिमतः बाजी मारण्यात यश संपादन केले.

मध्यंतराला पाटणाकडे आघाडी

या निर्णायक फायनलमध्ये मध्यंतराला पाटणाने 17-15 अशी दोन गुणांची किरकोळ आघाडी घेतली होती. यापूर्वी, पहिल्या उपांत्य लढतीत पाटणाने यूपी योद्धाचा सहज फडशा पाडला होता. येथे मात्र पहिल्या सत्रात दिल्लीने त्यांना अगदी एकेक गुणासाठी झगडणे भाग पाडले. काहीवेळा तर पहिल्या टप्प्यात दिल्लीचा संघ देखील आघाडीवर राहिला. दिल्लीतर्फे नवीन कुमारने रेडमध्ये 7 गुण संपादन केले आणि या बळावर दिल्लीने पाटणाला सातत्याने झुंजवत ठेवले होते.

पाटणा संघाने यापूर्वी फायनलमध्ये एकदाही पराभव पत्करलेला नव्हता. त्यामुळे, या लढतीत देखील ते हीच घोडदौड कायम राखू शकणार का, याची उत्सुकता होती. मात्र, ती फोल ठरली.

ती शेवटची 2 मिनिटे आणि दिल्लीची रोमांचक बाजी!

शेवटची 2 मिनिटे बाकी असताना दिल्लीचा संघ 36-33 फरकाने आघाडीवर होता. त्यानंतर दिल्लीने एकीकडे आपली आघाडी कायम राखण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तर दुसरीकडे, पाटणाला शक्य तितके गुण खेचून आणण्यावरच भर द्यावा लागेल, हे निश्चित होते. पाटणाने शेवटच्या 2 मिनिटात 3 गुण मिळवत त्यादृष्टीने वाटचालही केली. पण, दिल्लीने या 2 मिनिटात मिळवलेला आणखी एक गुण निर्णायक ठरला आणि याच बळावर ते प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या आठव्या हंगामाचे विजेते ठरले.

पाटणाने फायनलमध्ये पराभव पत्करण्याची पहिलीच वेळ

पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी तीनवेळा फायनलमध्ये धडक मारली आणि त्या तिन्ही वेळा विजयश्री संपादन केली होती. शुक्रवारी चौथ्यांदा फायनलमध्ये खेळत असताना तोच विजयी धडाका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न दिल्लीने मात्र यशस्वी होऊ दिला नाही. या निकालामुळे पाटणा संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे निश्चित झाले.

Related Stories

शेवटच्या सामन्यात लंकन महिला विजयी

Patil_p

भारत-श्रीलंका दिवस-रात्र कसोटी आजपासून

Patil_p

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 118 धावांनी विजय

Patil_p

सिमोना हॅलेपची विम्बल्डन स्पर्धेतून माघार

Amit Kulkarni

माजी हॉकी प्रशिक्षक एम. के. कौशिक यांचे निधन

Patil_p

सुरक्षितता असेल तर लाळ वापरावर बंदी नसावी

Patil_p