Tarun Bharat

दमदार उमेदवारांचा भाव वधारला

नेत्यांचे वजन वाढणार : पक्षीय राजकारणाची मोट होणार घट्ट

संतोष पाटील

त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे कोल्हापूर शहरातील एका प्रभागाला आता तीन सेवक लाभतील. तीन पैकी एका प्रभागात किमान एकतरी ताकदवान उमेदवार असावा अशी व्युहरचना राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. नेत्यांकडून ताकदवान उमेदवारांचा शोधही सुरु असून आजूबाजूच्या प्रभागात वलय असणाऱया दमदार आणि कारभारी नगरसेवक उमेदवारांचा भाव वधारला आहे. सुमारे वीस हजार मतदारांच्या प्रभागात निभाव लागेल काय? याचे कोडे इच्छुकांना पडले आहे. पक्षाच्या वळचणीशिवाय निभाव लागणार नसल्याने इच्छूकांची ऐन उन्हाळ्यात गारठल्यासारखी स्थिती आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार असल्यामुळे भावी उमेदवारांसह नागरिकही संभ्रमात आहेत. राज्यातील अनेक महापालिकेत यापूर्वी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या आहेत. तेथील अनुभव पाहता, जिथे प्रभागातील नगरसेवकांमध्ये समन्वय आहे, त्याच प्रभागाचा विकास झाल्याचे चित्र आहे. अगदी लगतच्या प्रभागातील सीमारेषा ओलांडून प्रभाव असणाऱया नगरसेवकांची संख्याही हातावर मोजणारी आहे. महापौरांपासून स्थायी समिती सभापतीपर्यंत सर्वांनीच आतापर्यंत आपला प्रभाग हाच डोळ्यासमोर ठेऊन ‘विकास’ साधला. असे असले तरी सर्वच पक्षात प्रभागाच्या कक्षेबाहेर दृष्टी असणारे काहीजण आहेत. नव्या प्रभाग रचनेमुळे पक्षात अशा दमदार नगरसेवकांचे महत्व वाढले आहे.

नव्या प्रभाग रचनेमुळे भावी नगरसेवकांसह नागरिकांना देखील उत्सुकता लागली आहे. एका मतदाराला तीन नगरसेवकांना निवडून द्यावे लागणार असले तरी प्रभागातील तीन वॉर्डांना अ, ब, क अशी नावे असतील. त्यानुसार संबंधित नगरसेवकांचे भाग निश्चित होतील. मात्र, प्रभागातील विकास कामे करताना तीनही नगरसेवकांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. एखाद्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आल्यास तो प्रभाग टोलवाटोलवीच्या राजकारणामुळे भकास होऊ शकतो. सध्या शहरातील अनेक चौक, गल्ल्या, कॉलन्यातील मधले रस्ते, तिकटी आदी ठिकाणी भकासपणा दिसतो. आजूबाजूचे नगरसेवक प्रभागाची मध्यरेषा असल्याने त्याकडे दुर्लक्ष करतात, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेत तिनतिकाड निवडून आल्यास मोठा भाग निव्वळ राजकारणामुळे भकास होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे एकूणच नवी प्रभाग रचना, निवडणुका आणि निकाल त्यानंतर पाच वर्षे विकास कामांचे तुणतुणे यावरुन शहरातील राजकीय हवा मात्र तापलेली असणार आहे.

पंधरा दिवसात मोर्चेबांधणी वेगावणार
प्रमुख चार पक्ष असलेल्या कॉंग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. अपक्ष तसेच छोटय़ा पक्षांच्या उमेदवारांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत डोकेदुखी ठरू शकते. नव्या रचनेत दोन किंवा तीन पक्षांची एकी झाल्यास कुरघोडय़ांना संधी कमी राहील. स्वतंत्रपणे लढले तरी बंडखोरीची हवा प्रभागापुरती राहिल्याने दुसऱया दोन प्रभागात उणीव भरुन काढता येण्यासारखी असल्याने उमेदवारी देताना पक्षांना चॉईस राहणार आहे. इच्छुकांनी आतापर्यंत एक प्रभाग नजरेपुढे ठेवून संपर्क वाढवला आहे. आता कमी वेळेत तिप्पट आकाराच्या प्रभागात फिल्डींग लावणे इच्छुकाच्या शक्तीबाहेर आहे. राजकीय पक्षाच्या वळचळणीला गेल्यास विजयाचा मार्ग सोपा होवू शकतो. याचे आराखडे बांधूनच इच्छुकांनी तयारी ठेवली आहे. पुढील पंधरा दिवसात आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर पक्षांसह उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगावणार आहे.

Related Stories

कुंभोज येथे ‘माझी वसुंधरा’ अभियान शपथ विधी संपन्न

Archana Banage

कोल्हापूर : आणखी ३० हून अधिक एसटी कर्मचारी निलंबित; मध्यवर्ती बस स्थानकात गोंधळ

Archana Banage

कोल्हापूर : गांधीनगरमधून अकरा वर्षीय मुलाचे अपहरण

Archana Banage

जोतिबावरील विकास कामांसाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

देशात 17.93 लाख सक्रिय रुग्ण

datta jadhav

कोल्हापूर : राज्य विद्युत महावितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage
error: Content is protected !!