Tarun Bharat

दरीत अडकलेल्या युवकाला अखेर जीवदान

तीनशे फूट खोल दरीत 18 तास युवक अडकला

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर खोल दरीत सुमारे तीनशे फुटांवर तब्बल अठरा तासांहून अधिक काळ अडकलेल्या एका युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी रविवारी सकाळी सुखरूप बाहेर काढले. या युवकाचे नाव अमृत रामचंद्र रांजणे (वय 35 रा. दिघी नवी मुंबई) असे असून त्याचे मूळ गाव रांजणी (ता.जावली) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमृत रांजणे हा युवक दिघी नवीमुंबई येथील एका कंपनीमध्ये कामाला आहे. तो महाड येथे आपल्या कंपनीच्या सहकायांसोबत गेली पाच दिवस कंपनीच्या कामानिमित्त आला होता. शनिवारी सुट्टी असल्याने दुपारी अमृत रांजणे हा त्याच्या मूळ गाव असलेल्या रांजणी येथे जाण्यासाठी महाड येथून पोलादपूर येथे आला. पोलादपूर येथून एका खासगी ट्रक्सने महाबळेश्वरकडे निघाला, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटरस्त्यावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी त्याने ट्रक्स थांबविण्यास सांगून तो ट्रक्समधून उतरला. मात्र हा युवक त्या ठिकाणी असलेल्या एका संरक्षक कठडय़ावर बराच वेळ बसून होता. दरीमध्ये वाकून बघण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरला व तो थेट झाडाझुडपातून सुमारे तीनशे फूट खोल दरीत घसरत गेला. रात्री घाटरस्त्यावर अंधार, धुक्क असल्याने आवाज देऊन देखील त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मात्र रविवारी सकाळी या ठिकाणी एक पर्यटक दांपत्य ‘सेल्फी’ घेत असताना त्यांना ओरडण्याचा आवाज दरीतून ऐकू आला. या दांपत्याने क्षणाचाही विलंब न करता महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेवून त्याला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. याआधी देखील या ठिकाणीच काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला जिवंत वाचविण्यात ट्रेकर्स जवानांना यश आले होते. याच ठिकाणी हा व्यक्ती पडल्याचा अंदाज ट्रेकर्सच्या जवानांनी बांधून दोरखंडाच्या साहायाने रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नगरसेवक कुमार शिंदे, संदीप जांभळे, जयवंत बिरामने, अमित कोळी धाडसाने खाली उतरुन एकतासांच्या अथक परिश्रमानंतर या युवकास सुमारे तीनशे फूट खोल दरीमधून सुखरूपवर काढण्यास  यश आले.  महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे, सुनीलबाबा भाटिया, सुनील वाडकर, दिनेश झाडे, नितीन वाडकर, अनिकेत वागदरे, मनीष झाडे आदींनी  मदतकार्यात महत्वाची भूमिका बजावली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, प्रताप लोखंडे, प्रशांत पवार, भुजंग काळे आदी उपस्थित होते. या युवकाची पोलिसांनी चौकशी केली असता याने आपण कसे, कोठून आलो, कुठे चाललो होतो याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असून सदर युवकाची मानसिक अवस्था ठीक नसल्याची प्राथमिक माहिती मिळत असून आहे. नक्की हा युवक घसरून दरीमध्ये पडला का ? त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला ? याबाबतचा तपास महाबळेश्वर पोलीस करीत आहेत.  

Related Stories

गोकुळ निवडणूक प्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Archana Banage

राजू शेट्टींच्या ‘जागर एफ.आर.पी’चा व आराधना शक्तीपीठांची’ यात्रेस सुरुवात

Archana Banage

वर्धा : उत्तम गलवा कंपनीत भीषण स्फोट; 30 पेक्षा अधिक मजूर जखमी

Tousif Mujawar

माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

Archana Banage

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बधितांचे शतक

Archana Banage

22 हजार हेक्टरपेक्षा अधिक कृषी क्षेत्र बाधित

Patil_p