ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधून दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी 12 लाख रुपये मिळाल्याची कबुली जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांनी दिली आहे.
रविवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चेकिंग सुरू असताना हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्मयांसोबत देविंदर सिंह आढळले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांच्या घरात छापे टाकून पोलिसांनी 5 ग्रेनेड आणि 3 एके 47 हस्तगत केल्या होत्या.
देविंदर सिंह जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहेत. अटक केल्यानंतर तपासादरम्यान, हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांशी देवेंद्र सिंह याचे संबंध असल्याचे उघड झाले. तसेच दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधून दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी 12 लाख रुपये घेतल्याची कबुली त्यांनी तपासादम्यान दिली. तर संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अफजल गुरुसोबतही देवेंद्र सिंह यांचे संबंध होते अशी माहिती समोर आली आहे.