Tarun Bharat

दहशतीची सावली…

13 वर्षानंतर देखील मुंबई आणि मुंबईकर दहशतीत : 26/11 नंतर तीन वेळा सत्ताबदल, मात्र मुंबई पोलिसांची परिस्थिती ‘जैसे थे’

अमोल राऊत /मुंबई

एकीकडे कोरोनाचे संकट… तर दुसरीकडे दहशतवादी संघटनांचे… कोरोनामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर देखील ते नव्या जोमाने अधिक प्रुरतेने हल्ले करण्यासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे शहर अशी ख्याती असलेल्या मुंबई शहरावर 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या महाभयंकर हल्ल्याला तेरा वर्षे पूर्ण झाली असताना देखील परिस्थितीत बदल झाला नसून मुंबई तसेच मुंबईकरावर अद्यापही दहशतीची सावली आहे. कोणत्यावेळी काय होईल? आणि कधी कोण बळी पडेल हे मुंबई पोलिसांना देखील सांगता येणार नाही अशी परिस्थिती शहरात आहे.

गेल्या तेरा वर्षात मुंबई पोलीस दलात तसेच राज्य सरकारमध्ये मोठे फेरबदल झाले. एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टीने पाहता राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची पूर्णतः भंबेरी उडाली असून सुरक्षेचा मोठा गाजावाजा करणाऱया मुंबई पोलिसांचे प्रत्येकवेळी पितळ उघडे पडले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून मुंबई पोलीस आरोपांच्या गर्तेत एवढे अडकले आहेत. कधी नाही ते क्राईम ब्रँचच्या एका कार्यालयात केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमार केल्याने, मुंबई पोलिसांची मोठी नामुष्की झाली आहे. ज्या मुंबई पोलिसांचा धसका देशात होता, तेच मुंबई पोलीस सध्या आरोपांच्या कठडय़ात उभे आहेत. तर दुसरीकडे राजकीय अनास्था आणि राजकीय व्यक्तींकडे बोट दाखविण्यापलीकडे उच्च पोलीस अधिकाऱयांच्या हातात काहीच नाही. तेही उघडपणे काहीच करू शकत नाहीत. कारण पाण्यात राहून माशांशी वैर कोण घेणार? एका बाजूने पाहिले गेले तर पोलीस दलाची देखील काही चूक नाही. राजकीय इच्छाशक्तीच नसेल तर या अधिकाऱयांनी डोकेफोड करून दगडाचे हृदय असलेल्यांना पाझर कुठून फुटणार?

26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला होण्याच्या दोन महिने आधी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल ताज तसेच गेटवे परिसरात देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. अशावेळी दीड महिना झाला तरी समोरून काहीच हालचाल होत नव्हती. नेमका या संधीचा फायदा उचलीत सरकारने पोलिसांना धारेवर धरले ते म्हणजे विनाकारण पोलीस विभाग ताजच्या सुरक्षेसाठी तैनात झाला आहे. अशाप्रकारचे आरोपच तत्कालिन सत्ताधाऱयांकडून झाल्याने पोलीस दल देखील हतबल झाले. यावेळी तत्कालिन पोलीस आयुक्त दिवंगत हसन गफूर यांनी हा बंदोबस्त हलविला. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच 26/11 हल्ल्याची नामुष्की ओढवली. पोलीस बंदोबस्त हटविला गेल्याची माहिती कराचीपर्यंत पोहचताच त्यानंतर ज्या वेगवान हालचाली झाल्या त्या म्हणजे 26/11 च्या हल्ल्यात.

त्यानंतर एकमेव जिंवत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याच्याकडून सर्व वदवून घेतले असता, अखेर पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. त्यानंतर कसाबवर खटला चालवून अखेर त्याला 2013 साली फासावर लटकविण्यांत आले. कसाबचा खटला आणि त्याची फाशी यावर सर्व जगाचे लक्ष होते. त्यातूनही देखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच होत्या. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेsचे संपूर्ण पितळ उघडे पडले होते. या भ्याड हल्ल्यात रस्त्याच्या गल्लोगल्लीत वरिष्ठ अधिकारी हुतात्मा झाले. अशावेळी पोलीस दलाला अत्याधुनिक यंत्रणेने सक्षम करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीने रात्रीचा दिवस करून अभ्यासपूर्ण अहवाल राज्य सरकारला सादर केला. याचा परिणाम म्हणजे या अहवालाला केराच्या टोपलीत बंदिस्त करण्यात आले. अखेर हा अहवाल बाहेर पडला आणि सरकारवर सर्व बाजूने टीकेचा भडिमार सुरू झाला. सरकारने नमते घेऊन काही अटी प्रधान समितीच्या मान्य केल्या. तसेच बुलेटप्रूफ व्हॅन असलेल्या मार्क्स व्हॅन, बॉम्ब तसेच अमलीपदार्थांची अचूक माहिती देणारी मोबाईल स्पॅनर व्हेईकल, बॉम्बसूट, बुलेटप्रूफ जॅकेट, स्पीड बोटी, आणि अत्याधुनिक शस्त्रs यांची काही प्रमाणात पूर्तता करण्यास सुरुवात झाली. मात्र, या सर्व यंत्रणेची कंत्राटे देताना आणि त्यांचा दर्जा पडताळताना देखील मोठा घोळ झाल्याचे प्रकाशात आले. यामुळे सरकारने पोलीस दलातील काही अधिकाऱयांना हाताशी घेत पोलीस दलाला तर फसविले. मात्र, जनतेला देखील धोका दिला. ‘टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार’ सरकारने केला.

मुख्यमंत्री दरबारी 145 प्रस्ताव लालफितीत 

गेल्या तेरा वर्षात मुंबई पोलीस आणि राज्य पोलीस दलाने 145 हून अधिक प्रस्ताव गृहमंत्रालयाला पाठविले आहेत. त्यातील अठरा प्रस्तावांवर राज्य सरकारने विचारविमर्श करुन, ते निकाली काढण्यास सुरुवात केली आहे. तर इतर प्रस्तावांना अद्याप न्याय मिळालेला नाही. हे सर्व प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सरकारदरबारी लालफितीत अडकून पडले आहेत. यावर अद्याप कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. यामुळे मुंबई पोलीस दल अत्याधुनिक आणि सक्षम होणार तरी कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तेरा वर्षांची परिस्थिती पाहिली तर 26/11 सारख्या हल्ल्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली तर याला सक्षमपणे तोंड देण्यास मुंबई पोलीस सज्ज नसल्याचे धक्कादायक चित्र मुंबई पोलीस दलातील आधुनिकतेकडे पाहता लक्षात येते. त्याचप्रमाणे, कोरोनाच्या काळात अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तिसरी लाट आलीच तर पुन्हा याच पोलीस दलाला रस्त्यावर उभे रहावे लागणार आहे. यामुळे एकिकडे कोरोनाचा दहशतवाद तर दुसरीकडे नागरिकांच्या रक्ताला चटावलेल्या दहशतवादी संघटना अशा दुहेरी संकाटांचा सामना मुंबई पोलिसांना करावा लागत आहे.

बधवार पार्क यापूर्वी आणि अद्यापही भीतीच्या छायेत

दरम्यान, पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी ज्या बधवार पार्कमधून मुंबईच्या जमिनीवर पाय ठेवले. तो बधवार पार्क अद्यापही भीतीच्या छायेखाली आहे. केवळ नव्हेंबर महिना उजाडल्यानंतर येथे पोलीस बंदोबस्ताची तालीम सुरू होते. त्यानंतर या ठिकाणी सामसूम असते. अशावेली रात्री दहा वाजल्या आणि एखाद्या बोटीचा प्रकाश जरी दिसला तरी येथील नागरिकांच्या पोटांत गोळा येतो. यावेळी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन जातात. वर्षभरातील आकडेवारी पाहिली तर बधवार पार्क येथून संशयास्पद हालचाली संदर्भात अथवा बोट असल्यासंदर्भातील जवळपास 100 हून अधिक फोन कॉल्स मुंबई पोलिसांना मिळाले आहेत.

छाबडा हाऊसवरील सुरक्षा वाढविली, मात्र व्रण ताजेच

ज्यू नागरिकांचे वस्तीस्थान असलेल्या छाबडा हाऊसवर या दहशतवाद्यानी अंधाधुंद गोळीबार केला होता. यामुळे तेव्हापासून या छाबडा हाऊसच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. मात्र एवढे सर्व असताना देखील अद्यापही या हल्याचे व्रण छाबडा हाऊसवर ताजे आहेत. तो दिवस आठवला की, अंगावर शहारे येतात. असे या हाऊसच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे बाहेरील नागरिकांना शक्यतो प्रवेश वर्ज्य आहे.

ताज, ओबेरॉय, ट्रायडंटमध्ये नोव्हेंबर महिन्यात कमी ग्राहक

हॉटेल ताजमध्ये सर्वात जास्त वेळ 26/11 हल्याचे ऑपरेशन सुरू होते. यामुळे जगभरात हॉटेल ताजला बऱयापैकी प्रसिद्धी मिळाली. त्याचप्रमाणे, ट्रायडंट आणि ओबेरॉयला देखील. मात्र जसा नोव्हेंबर महिना उजाडतो, तसे या हॉटेलमधील ग्राहकांची संख्या तसेच परदेशी पर्यटकांची संख्या घटत असल्याचे, या हॉटेल व्यवस्थापनांचे म्हणणे आहे. मात्र कोरोनामुळे हॉटेल व्यवसायाला पूर्ण नुकसान झाले असून कोरोना आणि त्यात मुंबई हल्ल्याच्या जखमा ताज्या असल्याने, याचा फटका आपसुकच त्यांना बसत आहे.

26/11 हल्याची ठिकाणे ठरतायत पर्यटनस्थळे

 दरम्यान एवढे सर्व असताना देखील 26 नोव्हेंबर 2008 साली ज्या ठिकाणी हल्ले झाले होते. त्या ठिकाणी अनेक नागरिकांची गर्दी होताना आढळून येत आहे. याठिकाणी फोटो सेशन करण्यात नागरकि व्यस्त असतात. हे सर्व बाहेरुन आलेले नागरिक असल्याने, नेमके या ठिकाणी त्यावेळी काय झाले ? त्याच्या जखमा आणि त्या आठवणी काय असतात ? याची कल्पना या पर्यटकांना नसल्याची खंत मुंबईकर व्यक्त करीत असतात.

अत्याधुनिक यंत्रणा धूळखात

सद्यपरिस्थिती पाहता पोलिसांनी या हल्ल्यानंतर काही अत्याधुनिक यंत्रणांची खरेदी केली. यामध्ये मरीन पोलिसांकरिता स्पिड बोटी, मोबाईल स्पॅनर व्हेईकल, मार्क्स व्हॅन यांचा समावेश आहे. मात्र, सध्या या दुरुस्तीविना आणि देखभालीविना धूळखात पडलेल्या आहेत. 26/11 सारखा हल्ला समुद्रीमार्गाने झाला आणि या दहशतवाद्यांना समुद्रातच रोखण्याची वेळ पोलिसांवर आली. तर स्पिड बोटीविना पोलिसांचा निभाव कसा लागणार? अशाप्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याचे सोयरसुतक पोलीस दल आणि सरकारला नाही. वेळोवेळी याची माहिती राज्य सरकारला कळविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. या हल्यानंतर राज्यात तीन वेळा सत्ता बदल झाला. मात्र राज्य सरकार चालले आहे तसेच चालू द्या अशाप्रकारे रहाटगाडा हाकत आहे. यामुळे भविष्यकाळांत याचा मोठा फटका राज्य सरकारला बसल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.

सागरी ‘रडार’ यंत्रणा दुरुस्तीविना दुर्लक्षित !

महाराष्ट्र-गुजरातच्या सागरी हद्दीत बसविलेली यंत्रणा कार्यान्वित असून नसल्यासारखीच

देशात कोरोनाने थैमान घातले असून, दुसऱया लाटेनंनतर फेब्रुवारीमध्ये तिसऱया लाटेचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे दहशतवादी नावाचा भस्मासूर देशात हल्ले करण्यासाठीच प्रयत्नशील असल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणा देत आहे. त्यातच मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे पूर्ण झाली असताना देखील अद्यापही मुंबईची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आढळून आले आहे. 2012 साली सागरी किनाऱयांवर रडार यंत्रणा बसविण्यात आल्या मात्र, ही रडार यंत्रणाच नादुरुस्त होऊन अडगळीत पडली असल्याची धक्कादायक मा]िहती समोर आली आहे. अशातच ही रडार यंत्रणा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने नौदलाला दिली आहे.

नेमक्या याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कोस्टगार्ड आणि नौदलाच्या मदतीने सागरी किनारपट्टीच्या हद्दीत तैनात असलेल्या रडार यंत्रणाभोवती कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच या रडार यंत्रणेसाठी आवश्यक तो निधी पुरवठा तत्काळ करण्यात यावा याकरिता, यापूर्वी 20 सप्टेंबर 2016 रोजी राज्य तसेच केंद्र सरकारला राज्य पोलीस कोस्टगार्ड आणि नौदलाने प्रस्ताव पाठवून साकडे घातले आहे. 2014 आणि 25 ऑक्टोबर 2015 रोजी देखील असाच प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तारापूर, देवगड, टोळकेश्वर आणि गिरगाव या ठिकाणी 2012 साली सागरी सुरक्षेकरिता रडार यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या रडार यंत्रणेचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत या रडारमधील एकही यंत्रणा कार्यरत नसल्याची माहिती तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. तसेच तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी यांच्या हस्ते देशातील 38 ठिकाणी बसविण्यात आलेल्या रडार यंत्रणांचा 25 ऑगस्ट 2012 साली शुभारंभ करण्यात आला होता. त्यावेळी गुजरात, दीव-दमण येथे रडार यंत्रणा बसविण्यात आली होती.

पॅराशुटच्या साहाय्याने ‘रडार यंत्रणा’ उद्ध्वस्त करण्याचा कट

खोल समुद्रात शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांचे संदेश पकडण्यासाठी ही रडार यंत्रणा काम करणार होती. यासाठी या यंत्रणेत नेटवर्क पाम्प्रेझिंग स्टॅटीक रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टीक सेन्सॉरचे 84 नियंत्रण कक्ष स्थापन केले होते. मात्र, यातील एकही रडार यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यातच नेहमीप्रमाणे पॅराशुटच्या सहाय्यानेच ही रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा घातकी कट आखल्याची माहिती नौदल, मुंबई पोलीस आणि तटरक्षक दलाला मिळाल्याने या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 2012 च्या सुरुवातीला मुंबई आणि रत्नागिरी येथील किनाऱयावर जवळपास तीन मोठी जहाजे भरकटत आली असताना देखील याचा तपास ‘ना या रडार यंत्रणांना लागला ना सागरी पोलिसांना’. तसेच गुजरात येथील अदानी बंदरावर संशयास्पद बोटीतून कोटींचे ड्रग्ज आल्याची देखील कल्पना या रडार यंत्रणाना लागली नाही. यामुळे सागरी सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या रडारांच्या क्षमतेत अधिक प्रमाणात कमतरता असल्याचे आढळून आले आहे.

सागरी रडार कशाप्रकारे करते काम ?

सागरी किनाऱयाच्या सुरक्षेसाठी आणि शत्रुच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने रडार यंत्रणा कार्यान्वित केली. ही यंत्रणा शत्रूचे सांकेतिक संदेश पकडून त्यांची माहिती तटरक्षक दलाला देतात. त्यानुसार तटरक्षक दल सांकेतिक भाषांमध्ये पकडलेले संदेशहेर मुंबई पोलीस आणि पश्चिम विभागीय नौदलाकडे पाठविण्याचे काम करतात. यामुळे शत्रू आणि दहशतवादी यांच्या हालचाली समजण्यास मदत होते. तसेच, एखाद्या मशिनवर या रडारच्या लहरी जरी आदळल्या तरी त्याचा धोका या रडारमध्ये असलेल्या नेटवर्क कॉम्प्रेझिंग सेन्सॉरच्या माध्यमातून समजतो. मात्र,  या रडारच्या स्थापनेपासून शत्रूच्या हालचाली तर सोडाच. भरकटलेल्या जहाजांची माहितीदेखील ही रडार यंत्रणा देऊ शकली नाही. त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी तैनात केलेली रडार यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Stories

त्यांच्या डोळय़ात पाहून तरी बघा

Patil_p

देशाच्या सरहद्दीवरील जवानांसाठी पुणेकरांकडून तिळगूळ

prashant_c

कामाशिवायच घेतले पाच वर्षे वेतन

Patil_p

मकरसंक्रांतीनिमित्त दत्तमहाराजांना 101 किलो तिळगूळ आणि हलव्याचे दागिने

Tousif Mujawar

पिरॅमिडमधला बोगदा इतिहासातील रहस्य उलगडणार

Patil_p

कोल्हापुरातील रामाचा पार सार्वजनिक व्यासपीठ, भरायच्या जंगी सभा

Archana Banage