Tarun Bharat

दहशत माजवणारा बिबटय़ा जेरबंद

भक्षाच्या पाठलागावेळी कोसळला विहिरीत : परुळे बाजारपेठवासीयांकडून सुटकेचा निश्वास

  • 16 कुत्रे, 40 मांजरांचा पाडला होता फडशा
  • रात्री आठ वाजताच तेथील घराचे दरवाजे व्हायचे बंद
  • बिबटय़ाची रवानगी होणार नैसर्गिक अधिवासात

भूषण देसाई / परुळे:

परुळे बाजारालगतच्या भर वसाहतीत अनेक कुत्री, मांजरांचा राजरोसपणे फडशा पाडणाऱया व गावात दहशत निर्माण करणाऱया खतरनाक बिबटय़ावर अखेर शिकार करता-करता विहिरीत पडून स्वत:च ‘शिकार’ होण्याची वेळ आली. वन विभागाने तत्परता दाखवून त्याची विहिरीतून सुखरुपपणे सुटका केल्यामुळे अगदी थोडक्यात त्याचा जीव वाचला. या बिबटय़ास नैसर्गिक अधिवासात सोडत असताना त्याला जवळच्या जंगलात न सोडता दूरच्या जंगलात नेऊन सोडा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत या बिबटय़ाचा या बाजारपेठ परिसरात अगदी मुक्त संचार असायचा. बाजारपेठेमागील बाजूला ओढा असून पलीकडे जंगल आहे. या जंगलातून तो थेट लोकवस्तीत येत असे व बाजारपेठ परिसरात फिरणारी भटकी कुत्री तसेच घराच्या पडवीत बसलेली पाळीव कुत्री व मांजर देखील घेऊन जात असे. मागील चार ते पाच वर्षे त्याचा हा उपद्रव सुरू होता. त्याच्या या मुक्त संचाराने या परिसरातील रहिवासी सायंकाळी आठ वाजताच घरांना कडी-कुलप लावून घेत.

पहाटेच्या सुमारास कोसळला विहिरीत

मंगळवारी पहाटेच्या सुमारास हाच बिबटय़ा एका कुत्र्याचा पाठलाग करीत या परिसरात आला असता तो या बाजार परिसरातील गौरीशंकर मंदिरालगतच्या मनोहर सामंत यांच्या बागेमधील विहिरीत कोसळला. पहाटे तीन वाजल्यापासून तो या परिसरात उच्छाद मांडत होता. पहाटे सव्वापाच वाजता तो सामंत यांच्या मालकीच्या विहिरीत कोसळला. या ठिकाणी राहणारे सुनिल उर्फ विठ्ठल धुरी तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी अजित चव्हाण यांना पहाटे विहिरीत काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. त्यांनी मोठा धीर करून विहिरीकडे धाव घेतली व बॅटरीच्या प्रकाशात विहिरीत डोकावून पाहिले असता हा बिबटय़ा जीव वाचविण्यासाठी विहिरीतील पाण्याच्या पाईपला पकडून धडपडताना दिसला.

अवघ्या काही मिनिटांत फत्ते केले ऑपरेशन

दरम्यान श्री. धुरी यांनी तत्काळ पोलीस पाटील, वन विभाग कर्मचारी व निवती पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बिबटय़ा विहिरीत पडल्याची खबर गावात समजताच दशक्रोशीतून शेकडो लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर 9.30 वाजता वन विभागाचे कर्मचारी सदर बिबटय़ाला पकडण्याकरीता पिंजरा व तत्सम साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले. खरं तर त्यांनी सोबत आणलेला पिंजरा हा या बिबटय़ाप्रमाणे वेंगुर्ले शहरात दहशत माजवणाऱया एका माकडाला पकडण्यासाठी लावला होता. परंतु, सकाळी बिबटय़ा विहिरीत पडल्याची खबर मिळताच माकडाचा नाद सोडून तो पिंजरा घेऊन वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि अवघ्या 10 मिनिटात अत्यंत कुशलतेने त्या बिबटय़ाला सोबतच्या पिंजऱयात जेरबंद करीत ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी व नंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी अज्ञातस्थळी नेण्यात आले. या बचाव कार्यात उपवन संरक्षक एस. डी. नानरवर, सहाय्यक वनसंरक्षक जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल अ. पा. शिंदे, कणकवली वन क्षेत्रपाल रमेश कांबळे, साळुंखे, कोरगावकर, अण्णा चव्हाण, विष्णू नरळे, सावळा कांबळे, श्रीमती निलम बामणे आदींनी सहभाग घेतला. यावेळी परुळे सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच विजय घोलेकर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, प्रकाश राणे आदी उपस्थित होते.

बिबटय़ाच्या दहशतीने झालो होतो हैराण

दरम्यान या बिबटय़ाच्या दहशतीबाबत बोलताना या परिसरात राहणारे सुनील धुरी म्हणाले, या बिबटय़ाने आतापर्यंत आपले जवळपास 16 कुत्रे आणि 35 ते 40 पाळीव मांजरे फस्त केली आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्याने आपल्या एका कुत्र्यावर हल्ला केला होता. आपण आरडाओरड करीत बाहेर आल्याने त्याला सोडून तो जंगलात पळून गेला. या बाजारपेठ परिसरात फिरणारी बहुतांश भटक्या कुत्र्यांना आपण भूतदया दाखवून जेवण घालत असल्याने रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोरच मुक्कामाला थांबतात. आपल्या घरापाठीमागील भागात जंगल असल्यामुळे हा बिबटय़ा राजरोसपणे या ठिकाणी येऊन या कुत्र्यांवर हल्ला करायचा व जंगलात नेऊन त्यांचा फडशा पाडायचा. या बिबटय़ाच्या दहशतीमुळे आम्ही रात्री आठ वाजताच घराचे पुढचे व मागचे दरवाजे बंद करून घ्यायचो. आता हा बिबटय़ा पकडल्यामुळे त्याची ही दहशत संपेल, असे ते म्हणाले.

Related Stories

कोळेकर भगिनींच्या मदतीसाठी पुढे यावे- बबन साळगांवकर यांची सावंतवाडीकरांना हाक

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : उद्या ग्रामसेवकांचा एक दिवशीय संप

Archana Banage

रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

गोठणे-दोनिवडे येथील पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

Patil_p

पहिल्या दिवशी सर्व व्यापाऱयांची चाचणी निगेटिव्ह

Patil_p

शिवसेना नवरात्रौत्सव अध्यक्षपदी राजू शेटये सचिवपदी राजू राणे

NIKHIL_N