Tarun Bharat

दहा दशकाची जुनी आणि समृद्ध अशी परंपरा लाभलेली खारेबांध येथील पालयेकर बंधूंची चिञशाळा

आतापर्यंत एक लाखाच्यावर चिकट मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचा पालयेकर बंधूना मान

पेडणे /  महादेव गवंडी

सर्व सणांचा राजा असलेला सण म्हणजे गणेश चतुर्थी. या सणाची तयारी जोमाने सध्या सुरु आहे. यापूर्वी कधीही या उत्सवावर न आलेले संकट हे  कोरोनाच्या रुपाने जगभरात आले आहे. या संकटावर विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने  निश्चितच मात करता येणार असल्याची गणेश भक्ताची भावना असून सर्व जणांना आता गणरायाच्या आगमनाची आस लागली आहे. अशी उपमा दे  गणेश हे दैवत सर्वार्थाने केवळ अलौकिक आहे. त्याचे सामर्थ्य अपार आहे.गणपतीबद्दल गोमंतकीय माणसांत नांदणारी श्रद्धा ही उपजतच असते. गोव्यामध्ये अनेक चित्रशाळा आहेत.तशाच प्रकारची एक खारेबांध पेडणे येथील ’पालयेकर बंधूं’ची, जवळजवळ दहा  दशके ही चित्रशाळा घरोघरच्या आणि सार्वजनिक गणेशमूर्तींना प्रेमाने घडवित आहे.  आता पर्यंत एक लाखाच्या वर चिकट मातीच्या  गणेश मूर्ती बनविणारी गोवा राज्यातील जुनी चिञ शाळेचा मान पालयेक बंधूना जातो.

     एकीकडे सर्वाचे हात चालूच होते.अंतिम टप्प्यातील ऐरणीवर आलेली कामं.रोज जागरणं,खाण्यापिण्याची शुद्ध हरपलेली,’येथे भान हरावे’ असं हे वातावरण. गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱया पेडणे येथील गणेशाची मूर्ती बनवणाऱया पालयेकर बंधूंची उत्सवपूर्व लगबग आणि परंपरा जाणून घेण्याचा हा प्रयत्न केला.

चिकट  मातीची परंपरा टिकवून ठेवणारे पालयेकर बंधू , एक लाखाच्या वर गणेश मूर्ती

 गेल्या चार पिढय़ाचा  पूर्वजांचा हा वारसा आज ही नवी पिढी खूप जोमाने चालवत आहे. कारण वैविध्यपूर्ण आणि सुबक मूर्ती या शाळेत तयार होतात. निव्वळ चिकट मातीपासून मूर्ती तयार करण्याची परंपरा ह्या शाळेने जपलेली आहे.  कारण आपल्या शेतातली माती गणपतीच्या रूपाने प्रत्येक घराघरातून पुजली जावी, अशी पर्यावरणपूरक भावना ह्या मूर्तिकलाकारांच्या मनात आहे.पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याची परंपरा आजही त्यांनी जोपासली आहे. रंगही पाण्यात विरघळणारे असतात. त्यामुळे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची   या मूर्ती हानी पोहोचवत नाहीत.

    गेल्या शंभर वर्षात आतापर्यंत एक लाखाच्या वर गणेशमूर्ती बानविण्यात आल्याची माहिती अरुण पालयेकर यांनी दिली.

 ड़ ही चित्रशाळा कै. रघुनाथ पालयेकर यांनी सुरू केली.  त्यानंतर प्रसिद्ध मूर्तिकार कृष्णा पालयेकर उर्फ बिल्ला यांच्याकडे या चित्र शाळेची जबाबदारी आली .  त्यांनी  आपले चुलते कृष्णा उर्फ बिल्ला पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पालयेकर घडले व ते ही परंपरा पुढे नेत आहेत.

मातीकलेमध्ये आज नावाजलेले नाव असलेले पेडण्याचे सुपुत्र अरुण पालयेकर ही चित्रशाळा आज चालवतात. विविध प्रकारचे गणपती लोकांच्या आवडी आणि मागणी प्रमाणे आम्ही बनवून देतो असे ते अभिमानाने सांगतात  .ते गणपती आम्हाला देवस्वरूपच असतात,आमच्या घरातली चित्रकृति दुसऱयांच्या घरात देव म्हणून पूजली जाते,ह्याचाच आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे अरुण पालयेकर म्हणाले.

 खारेबांध पेडणे येथील  एवढी मोठी इमारत असलेली चित्रशाळा गोव्यात कोणाचीच नसेल. या संबंधी जाणून घेतले असता  मूर्तिकार अरुण पालयेकर म्हणाले,आमचे आणि देशप्रभु कुटुंबाचे खुप सलोख्याचे संबंध आहेत.त्यांच्याच कृपेने गेली साठ-सत्तर वर्षे आम्ही हा ’लोज’ मधेच गणपती करत आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी रावराजे देशप्रभू यांचे सुपुत्र जितेंद्र आणि देवेंद्र देशप्रभू यांचेही आम्हाला खूपच सहकार्य आहे.

वेगळेपणा असलेली चिञशाळा

   या चित्रशाळेचे वैशिष्टय़ म्हणजे फिरणाऱया पृथ्वीवर किंवा शेषनागावर एका पायावर उभी असलेली गणपतीची भव्य मूर्ती तयार करणे तसेच पौराणिक कथानकावर गणपतीच्या भव्य मूर्ती व मातीची चित्रे साकारणे आहे . उत्तर गोवा, दक्षिण गोवा तसेच जवळच्या सिंधुदुर्ग जिह्यातही या चित्रे शाळेतून गणपतीच्या मूर्ती गणेश भक्त नेतात.चार वर्षांपूर्वी या चित्रशाळेतल्या मुंबईलाही गणपतीच्या मूर्ती नेण्यात आल्या होत्या.

या चित्रशाळेत मोठमोठय़ा सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात.त्याचप्रमाणे घरोघरी पूजल्या जाणाऱया असंख्य कुटुंबांच्या मूर्तीही इथं केल्या जातात.इथे रंगकामासबंधी खूपच सजक्ता आहे. गणपतीचा चेहरा देवतुल्य वाटला पाहिजे ही ह्या कलाकारांची खूप मोठी धारणा आहे आणि त्यासाठी पालयेकर घराण्यातीलच एक चित्रकलाकार पद्माकर पालयेकर हे मुंबईवरून खास गणपतीच्या डोळय़ाची रेखणी करण्यासाठी मुंबईवरून येत असतात.  पण यावषी कोरोनाच संकट ओढवल्यामुळे याच कलाकारांनी रेखणीचे काम केले आहे.

  मूर्तिकार अरुण पालयेकर यांनी मूर्तिकलेविषयी माहिती देताना सांगितले की,गणेशोत्सव आला की गणपती अकरा दिवस आपल्याकडे विसावतो परंतु आम्हा मूर्तिकाराच्या घरी मात्र महिनाभर वा वर्षभर असतं. या दैवताशी त्याचं सृजनात्मक नातं जडतं. यामुळेच प्रत्येक कलाकाराला आपली मूर्ती आपणच घडवावी असं वाटत असतं. गणपतीची मूर्ती साकारणे हा आम्हा कलावंतासाठीचा सोहळा असतो. गणपतीच्या मूर्ती घडविण्यापासून ते अगदी त्याच्या विसर्जनापर्यंत तो एक संपूर्ण सोहळाच असतो.आम्ही केलेला गणपती पुन्हा पाहताना तो आम्ही केलेला म्हणून मला तो दिसत नाही तो स्वयंभू असल्याचंच भासतोे. त्यावेळी हेच जाणवलं की, कलाकृती पूर्ण करेपर्यंत ती कलाकाराची असते पण ती एकदा पूर्ण झाली की ती स्वयंभू असते. ही जाणीव, ही शिकवण प्रत्येक कलाकाराला गणेशमूर्तीतून होते.प्रत्येक कलाकाराने हा अनुभव घेतला पाहिजे. गणेशमूर्ती साकारणं म्हणजे सृजनाशी तादात्म्य पावणे आहे. गणेशाचे हे रूप एक कलाकार म्हणून ती सहजता तुम्हाला बहाल करते.

अरुण पालयेकर यांच सुपुत्र कृष्णा पालयेकर याने सांगितले की,मूर्तीच्या रंगकामाबरोबर आखणीही (डोळे रंगवण्याचं काम) उत्तम करायला हवं.आखणी करताना डोळय़ातील बुबुळं काळजीपूर्वक मधोमध रेखाटावी लागतात . जेणेकरून देवापुढे हात जोडणाऱया प्रत्येक भक्ताला वाटायला हवं की, बाप्पा माझ्याकडेच बघतोय,माझं ऐकतोय.या गोष्टी ध्यानात ठेवूनच काम करावं लागतं.

या कामासाठी त्यांना मोहन पालयेकर, प्रकाश पालयेकर, विश्वास पालयेकर,विजय पालयेकर, प्रसाद  पालयेकर, यश पालयेकर, मुलगा कृष्णा पालयेकर, पत्नी सौ.अश्विनी पालयेकर व जवळचे मित्र त्रिंबक किनळेकर हे सहकार्य करतात. सध्या मूर्ती तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून रात्रीचेही काम जोरात सुरू आहे.

या मूर्तिकामामध्ये व त्याला अधिक देखणी करण्यासाठी होणाऱया रंगकामामध्ये पालयेकर बंधू आजही तासन् तास रमतात. त्यांच्या हातून घडलेल्या मूर्तींनी अनेक घरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांच्या हातून घडलेल्या मूर्तींचे डोळे अनेकांशी संवाद साधतात. गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी वाटलेला हा आनंद गणेश पूजेइतकाच पवित्र असेल, असेच त्यांच्याशी बोलताना जाणवत राहते.

Related Stories

गोवा टपाल खात्याकडून सुकन्या समृद्धी महोत्सवाचे आयोजन

Amit Kulkarni

त्या आमदारांनी राजीनामा देऊन पक्षांतर करावे पक्षांतर विरोधी समाजसेवकांची वास्कोत निदर्शने

Omkar B

मोप विमानतळ, इस्पितळाचे मोदींच्याहस्ते 11 रोजी लोकार्पण

Patil_p

लाँकडाऊन काळात बेळगावमार्गे गोव्यात एकुऊ 680 वाहनांंतून भाज्यांची वाहतूक.

Omkar B

आपच्या सात उमेदवारांचे अर्ज दाखल

Amit Kulkarni

कुळे जलशुद्धिकरण प्रकल्पाचा लवकरच शिलान्यास

Amit Kulkarni