Tarun Bharat

दातृत्वाचे हात सरसावले… पाणी टंचाईतही `वडणगे पॅटर्न’

गल्लोगल्ली टँकरने पाणीपुरवठा; बोअरही झाले खुले

प्रतिनिधी / वडणगे

पाणी योजनेचे जॅकवेल महापुराच्या पाण्यात अडकल्याने जवळजवळ दोन आठवडे वडणगे गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पण कोणत्याही लढाईत एकजुट दाखवणार्‍या वडणगेकरांचे दातृत्व यावेळीही पुढे आले आणि पिण्याच्या पाण्यासह दररोजच्या खर्चासाठी लागणार्‍या पाण्यासाठी होणारी पळापळ मोठ्या प्रमाणात थांबली. पाणीपुरवठा अजुनही सुरळीत झाला नाही, पण पाणीटंचाईतील `वडणगे पॅटर्न’ मात्र सर्वांसाठी सुखद ठरत आहे.

महापुरामुळे पाणीउपसा पंप पाण्याखाली असल्याने गावचा पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामपंचायत प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. दुसरीकडे दोन आठवड्यांपासून लोकांना पाण्याची प्रतिक्षा आहे. पाण्यासाठी पळापळ करावी लागल्याने सुरूवातीला ग्रामस्थ अस्वस्थ होते. मिळेल तसे व मिळेल तिथे पाणी मिळविण्यासाठी धडपडत होते. ग्रामपंचायत प्रशासनही आपल्या पातळीवर पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते.

ग्रामस्थांची ही धडपड पाहून मदतीसाठी अनेक दातृत्वाचे हातही पुढे आले. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्यावतीने 12 हजार लिटरचे पिण्याच्या पाण्यासह 14 टँकर वडणगेला दिले. सरपंच चौगले व त्यांचे सहकारी सदस्य मिळेल तिथून पाणी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या प्रयत्नांना मोठया प्रमाणात यश येत आहे. त्याचप्रमाणे गोकुळ, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, समाज कल्याण समिती सभापती कोमल मिसाळ, सरदार मिसाळ, युवा नेते रविंद्र पाटील, युवा नेते बाजीराव पाटील, मास्तर पार्टी, शिवसेना, बी. एच. दादा युवक मंच यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आपापल्या ताकदीवर टँकर पुरवून पाणी टंचाईत ग्रामस्थांना आधार दिला.

ग्रामपंचायत सदस्य उत्तम साखळकर, सतिश पाटील, माणिक जाधव, सुरज पाटील यांच्यासह अनेक सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पाणी वाटपासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत. शिवाजी व्हरगे, सागर चौगले, प्रविण चौगले, चंद्रकांत शिंदे, दिलीप एकशिंगे, संजय जाधव, दिनकर पाटील यांच्यासह अनेक लोकांनी स्वतःच्या बोअरचे पाणी लोकांसाठी खुले केले. त्यामुळे पाणीटंचाईची झळ वडणगेकरांना काही प्रमाणात कमी बसली. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंटरच्या वतीने गावात ठिकठिकाणी बोअरवेल मधील पाणी शुध्दीकरण युनिटमध्ये सोडून पिण्याचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले. बर्ची मिसाळ सारखे अनेक कार्यकर्ते जाग्यावर जाऊन पाणी वाटपाचे काम करत आहेत.

टँकर, कार्यकर्ते अन् गर्दी

अनेक दानशूर संस्था आणि लोकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टँकर गावात आले आहेत. त्याद्वारे गल्लोगल्ली पाणी वाटपाचे काम सुरू असून त्यामुळे गल्लोगल्ली टँकर, पाणी वाटणारे कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी असे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनाकाळातही एकजुटीचा `वडणगे पॅटर्न’ असाच राबला आहे.

Related Stories

कोल्हापूर : शिरोळ उद्यापासून पूर्ववत सुरू होणार

Archana Banage

कबनूरमध्ये मोबाईल टावरला शॉर्टसर्किटने आग, अनर्थ टाळला

Archana Banage

लसीकरणात अडथळा आणल्याबद्दल ग्रामपंचायत शिपायावर गुन्हा दाखल

Archana Banage

जिल्ह्यात पावसाचे थैमान

Archana Banage

कोडोली ग्रामपंचायतीच्या शववाहिकेचे आमदार कोरे यांच्या हस्ते लोकार्पण

Archana Banage

शाहूवाडीत कोरोनाचा धोका वाढला; रात्री उशिरा ९ जण पॉझिटिव्ह

Archana Banage