फोंडय़ातील सुरेंद्रने अनुभवलेला ‘आँखो देखा हाल’
सदानंद सतरकर / फोंडा
कोरोनाचा वाढता संसर्ग व लॉकडाऊनच्या काळात प्रसार माध्यमांचा प्रकाशझोत देशातील महानगरे व राज्यातील दैनंदिन घडमोडींवर अधिक केंद्रित झाला आहे. त्यात दादरा नगर हवेलीसारख्या केंद्रशासित प्रदेशात या काळात काय स्थिती आहे, याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. दादरामध्ये तब्बल 41 दिवस अडकून पडलेला सुरेंद्र बंगाळे हा तरुण नुकताच गोव्यात परतला. लॉकडाऊनच्या काळात तेथे काय स्थिती होती, तेथील प्रशासनाने ही परिस्थिती कशी हाताळली याचा ‘आँखों देखा हाल’ या तरुणांकडून ऐकायला मिळाला.
जेमतेम साडेतीन लाख लोकसंख्या असलेला दादरा नगर हवेली हा प्रदेश सध्या ग्रीन झोनमध्ये सुरक्षित आहे. मोठय़ाप्रमाणात उद्योगधंदे व पर्यटन असलेल्या या प्रदेशातून लॉकडाऊनच्या काळात परराज्यातून येणाऱया लोकांची संख्या तशी खूपच कमी आहे. मात्र उद्योगधंदे बंद असल्याने स्थलांतर मोठय़ाप्रमाणात सुरु आहे. सुरेंद्र हा दादरा नगर हवेलीमध्ये देशातील एका नामांकित खासगी कंपनीत कामाला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे लॉकडाऊन होण्याच्या अवघे चार महिने अगोदर तो याठिकणी कामावर रुजू झाला होता. 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ लागू झाला आणि 24 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत एकवीस दिवस लॉकडाऊनच्या पहिल्या पर्वाला सुरुवात झाली. त्यामुळे इतर राज्यातील कामगारांप्रमाणे सुरेंद्र हा त्याठिकाणी अडकून पडला.
लॉकडाऊनचे नियम अत्यंत कडक… पण..
दादरा हा केंद्रशासित प्रदेश असल्याने त्याठिकाणी सर्व प्रशासकीय कारभार केंद्र सरकारच्या माध्यमातून चालतो. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम अत्यंत कडक असल्याने पहिले काही दिवस परराज्यातील कामगारांच्या जेवणाखाणाचे बरेच हाल झाले. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याची कंपनीही बंद ठेवावी लागली. सुरेंद्र ज्या सिल्वासा भागातील नरोली गावात भाडय़ाच्या खोलीत राहत होता, तेथे वेळेवर जेवण मिळेल की नाही याची भ्रांती होती. 24 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत कंपनीच्या मेसमधून जेवणाच्या पार्सलची व्यवस्था झाली.
रुग्ण सापडल्याने परिस्थिती बदलली
मात्र 5 एप्रिल रोजी दादरा प्रदेशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यामुळे बंदी अधिकच कडक करण्यात आली. संपूर्ण प्रदेशात संचारबंदी लागू करण्यात आली. ज्या मेसमधून त्याची व इतर कंपनी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली होती, तेथून यापुढे जेवण मिळू शकणार नाही, असा निरोप आला. त्यामुळे एक दिवस बिस्किट खाऊन दिवस काढावा लागला. पुढचे दिवस कठिण होते. त्यातही कंपनीतील एका सहकाऱयाशी संपर्क साधून दिवसातून एकदा कसाबसा जेवणाचा डबा मिळेल एवढी व्यवस्था झाली. पण दुर्दैवाने या सहकाऱयाचा वडिल वारल्याने तो डबाही बंद झाला.
ज्या भाडय़ाच्या खोलीत तो राहत होता, तिचा घरमालकही वयस्क असल्याने तेथूनही काही सोय होणे अवघड होते. संपूर्ण बाजारपेठ तर बंदच होती. जीवनावश्यक वस्तु पुरविणारी किराणा दुकाने खुली असली तरी, तेथून ग्राहक थेट खरेदी करू शकत नव्हते. कारण सरकारी आदेशानुसार सामानाची फोनवर आगाऊ ऑर्डर दिलेल्या लोकांनाच ते घरपोच मिळे. सुरेंद्र यांच्याकडे जेवण करण्याची भांडी व साहित्य नसल्याने तेही शक्य नव्हते. त्याची ही बिकट परिस्थिती कंपनीतील काही सहकाऱयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कंपनीच्या वाहनचालकामार्फत जेवणाचा डबा पाठवण्याची व्यवस्था केली. रात्री पोलीसांकडून जेवणाचे पार्सल मिळे. अशा कठिण परिस्थिती उगवणारा प्रत्येक दिवस कुठले नवीन संकट घेऊन येईल याची भिती अधिक होती.
गुजरात व महाराष्ट्रातून संसर्ग वाढण्याचा धोका
दादरानगर हवेली या प्रदेशाला गुजरात राज्य व महाराष्ट्र राज्याच्या सिमा टेकून असल्याने रुग्ण संख्या वाढण्याचा धोका अधिक होता. रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन अजून कडक होण्याची भिती होती. त्यामुळे अशा प्रकारे किती दिवस काढायचे या विचाराने मन अधिक चलबिचल होई.
गोव्यात परतण्याचा मार्ग सुकर झाला
5 एप्रिल रोजी या प्रदेशात जो पहिला रुग्ण सापडला त्याची तातडीने मुंबईतील इस्पितळात रवानगी करण्यात आली. अंतर्गत संचारबंदी तर कडक होतीच. 3 मे नंतर परिस्थिती सुधारल्याने बंदी शिथिल करण्यात आली व ग्रीन झोन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सुरेंद्रला थोडासा दिलासा मिळाला. यापुढे नोकरीची पर्वा न करता कुठल्याही परिस्थितीत गोव्यात कुटुंबीयांकडे परतायचे यासाठी त्याची धडपड सुरु झाली. गोव्यात प्रा. भूषण भावे यांच्यामार्फत माजी खासदार व एनआरआय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने गोव्यात येणारी कदंबची वॉल्वो बस उपलब्ध झाली. तेथील प्रशासनाचा परवानाही आयत्यावेळी मिळावावा लागला. 8 मे रोजी पहाटे दादराहून व्हाया मुंबई-पुणे असा प्रवास करीत ही बस गोव्यात यायला निघाली. बसमध्ये काही मोजकेच प्रवासी होते. दादरा नगर सोडताना वाटेत एक विदारक दृष्य पाहायला मिळाले. रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा संख्येने मजूरांचे जथ्थे पायी चालत घरच्या ओढीने निघाले होते.
वाहन सेनेटायझर्सची एक चांगली व्यवस्था
परतीच्या प्रवासात दादरा नगर हवेलीच्या प्रवेशद्वारात एक चांगली व्यवस्था पाहायला मिळाली. याठिकाणी परराज्यातून येणाऱया सर्व वाहनांना थांबवून स्वयंचलीत जंतूनाशक फवारणीची व्यवस्था केली होती. एका मिनिटासाठी प्रत्येक वाहन थांबवून त्यावर ही फवारणी केली जायची. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या प्रदेशाने जी पावले उचलली व ज्या कडक उपाययोजना आखल्या त्या जाचक असल्या तरी, त्यामुळे संसर्ग व रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश आले. सध्या दादरामध्ये दोन रुग्ण आहेत व प्रदेश ग्रीन झोनमध्ये सुरक्षित आहे. गोव्यात परतल्यानंतर सुरेंद्रच्या सर्व चाचण्या झाल्या. त्या निगेटिव्ह आल्याने 14 दिवस होम कोरंटाईन होण्याचा कालावधीही संपुष्टात आल्याने त्याने सुटकेचा निश्वास सोडला.