Tarun Bharat

दापोलीत अतिवृष्टीमुळे कोटीचे नुकसान

वार्ताहर/ मौजेदापोली

दापोलीत मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीचा शहरासह जालगाव भागात मोठा फटका बसला. यामध्ये घरातील साहित्याचे सुमारे 64 लाख 74 हजार, 45 वाहनांचे 34 लाख 66 हजार तर सात दुकानांचे 4.44 लाख असे 1 कोटीहून अधिक  रूपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारीही पावसाचा जोर कायम होता. मात्र पाणी ओसरू लागल्याने ग्रामस्थांनी निःश्वास टाकला.

  कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दापोलीत मंगळवारी एका दिवसात 336.6 तर बुधवारी 137.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये तालुक्यातील कळंबट येथील दोन घरांचे 51 हजार 700, गोठय़ाचे 21 हजार 500 रूपयांचे नुकसान झाले. शहर व जालगाव येथील सात दुकानांचे 4 लाख 44 हजार, तर 96 घरातील भांडी व इतर साहित्याचे 64 लाख 74 हजार आणि 45 गाडय़ांचे 34 लाख 66 हजार रूपयांचे नुकसान झाले.

  अतिवृष्टीमुळे लाडघर मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. सारंग येथे रस्ता खचला होता. हा मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र ताडील रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. शहरालगत व जालगाव-खलाटी भागातही मोठय़ा प्रमाणात पाणी भरून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. 

तातडीने मदतकार्य

या बाबत सरपंच श्रुती गोलांबडे म्हणाल्या, अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली. पाणी भरल्याचे समजताच जालगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांनी तातडीने मदतकार्य केले.

नाला साफ नसल्याने पाणी शहरात

शहरात दरवर्षी नदीची पाणीपातळी वाढते, पण पाणी रस्त्यावर येत नाही. अशी घटना फार वर्षांपूर्वी नाल्याजवळ लाकडाचे ओंडके आल्याने घडली होती. त्यानंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे. शिवस्मारक येथील नाला साफ न केल्याने हे घडल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष संदीप केळस्कर यांनी सांगितले.

आमदार योगेश कदम यांच्याकडून मदत

जालगाव येथे नुकसान झालेल्या नागरिकांना आमदार योगेश कदम यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावले, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम उर्फ भाऊ इदाते, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील केळुस्कर यांच्यासह सदस्य, कर्मचारी, महसूलच्या अधिकाऱयांनी आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली. तहसीलदार वैशाली पाटील यांनीही पाहणी केली व पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. 

शेतीच्या नुकसानीची चाचपणी 

अतिवृष्टीमुळे शेतीचे अधिक नुकसान झाले नसल्याचे समोर येत आहे. मात्र नदीकिनारी असलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 रस्ता खचल्याने ताडील बस बंद

अतिवृष्टीत ताडील येथील मार्ग खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. दापोली-ताडील बस सारंगपर्यंत सोडली जात असल्याने ताडील ग्रामस्थांना पायी वारी करावी लागत आहे. आसूद बाग-सातारकर वाडी येथे दरड कोसळून बंद झालेला रस्ता ग्रामस्थांनी मोकळा केला आहे.

 2008 च्या आठवणी जाग्या

जालगावमध्ये 2 दिवस पूरसदृश स्थिती होती. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. जालगावमध्ये 2008 झाली अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी नागरिकांना खांद्यावरून बाहेर काढावे लागले होते. त्या आठवणी यानिमित्ताने जाग्या झाल्या.

जिल्हय़ात 12 सप्टेंबरपर्यंत मुसळधारचा इशारा

गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्य़ात सुरू असलेल्या वादळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबईकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीत जिल्हय़ात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोसाटय़ाच्या वाऱयासह पडणाऱया पावसाचा जोर कमी झालेला नाही. जिह्यात बुधवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात सरासरी 107 मिमी तर एकूण 965.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड 46.90 मिमी, दापोली 146.90 मिमी, खेड 61.90, गुहागर 202.40 मिमी, चिपळूण 78.80 मिमी, संगमेश्वर 158.60 मिमी, रत्नागिरी 136.40 मिमी, राजापूर 58.50 मिमी,लांजा 74.80 मिमी. इतकी नोंद करण्यात आली आहे.

हर्णेत बोट भरकटून दोन लाखाचे नुकसान

अतिमुसळधार व वेगवान वाऱयामुळे हर्णे बंदरात नांगरून ठेवलेल्या बोटीचा दोर तुटून सोमवारी रात्री गंगेश्वरी नौका भरकटली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे बोट वाचवण्यास यश आले तरी बोट खडकावर आदळून 2 लाख 16 हजारांचे नुकसान झाले आहे.

 शासनाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने कोळी बांधवांनी आपल्या नौका सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ नांगरून ठेवल्या होत्या. परंतु सोमवारी रात्री जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱयामुळे गोवर्धन पावसे यांच्या मालकीच्या नौकेचा दोर तुटून नौका प्रवाहात भरकटत असल्याचे मच्छीमारांच्या निदर्शनात आले. यानंतर तातडीने मच्छीमारांनी बोटीवर जाऊन जड सामान बाहेर काढून व बोट हलकी केली व सुरक्षितस्थळी आणली.

आंजर्लेतील ‘ती’ बोट नष्टच

आंजर्ले येथे जलसमाधी घेतलेली बोट अद्याप काढण्यात आलेली नाही. जोरदार लाटांमुळे ही बोट जवळपास नष्टच झाली असून ती काढणेही कठीण असल्याचे समोर आले आहे. यामुळे बोटमालकाला मोठय़ा नुकसानीस समोर जावे लागले आहे. खाडीतील गाळ काढला जात नसल्याने मच्छीमारांना अनेक अडचणी व नुकसानीला समोर जावे लागत आहे.

Related Stories

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका जाहीर, साताऱ्यातील ५ पालिकांसाठी १८ ऑगष्ट मतदान

Rahul Gadkar

रत्नागिरी : मिरकरवाडा परिसराला वादळी पावसाचा तडाखा

Archana Banage

भजनकार दीप्तेश मेस्त्री यांचे “संगीत अलंकार” परीक्षेत यश

Anuja Kudatarkar

आचऱ्याची सुकन्या प्राची पांगेचा लोकमान्य शाखेकडून सन्मान

Anuja Kudatarkar

आज सात वर्षांनी मी हिम्मत दाखवू शकले…

NIKHIL_N

एक नातं, शब्दांपलिकडचं!

NIKHIL_N