दापोलीत संस्था संचलित शाळेचा एक शिक्षक पॉझिटिव्ह
वार्ताहर / मौजे दापोली
शासनाकडून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना जारी केल्यानंतर शिक्षकांचे आरटीपीसीआर तपासणी करण्याचे काम सुरू झाले. त्यात काही शाळांचे अहवाल आले तर अद्याप काही शाळांचे अहवाल न आल्यामुळे अजूनही 44 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
त्यात दापोली तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गावातील संस्था संचलित शाळेच्या शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ती शाळा देखील बंद ठेवण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
दापोलीत 5 वी ते 8 वीचे वर्ग असलेल्या जि. प. व संस्थासंचलित अशा 288 शाळा आहेत. यातील 244 शाळांच्या शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या सुरू करण्यात आल्या. मात्र अजूनही काही शाळांच्या शिक्षकांचे अहवाल येणे बाकी राहील्याने त्या अद्याप सुरू झालेल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास काहीना काही कारणात्व 44 शाळा बंद असून त्या देखील येत्या दोन ते तीन दिवसात सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.