Tarun Bharat

दापोलीत ठाकरे-शिंदे गटात राडा

ठाकरे गटाकडून रामदास कदमांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न

वार्ताहर /  टाळसुरे     

दापोली शहरातील शिवसेना शाखेसमोर माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरून मंगळवारी शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात राडा झाला. पोलिसांना यावेळी बळाचा वापर करावा लागला. रात्री उशिरापर्यंत दापोली पोलीस स्थानकात दोन्ही बाजूंनी तक्रारी देण्याचे काम सुरू होते. या राडय़ामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा पार पडली. याला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाची उत्तर सभा पार पडली. या सभेमध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. यामुळे त्यांनी मंगळवारी दापोली शिवसेना शाखेसमोर रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे सर्व घडत असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. अखेर शिंदे गटाकडून हा पुतळा हिसकावण्यात आला. मात्र पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन तो पोलीस स्थानकात आणला. यानंतर प्रकरण शांत होईल, असे वाटत असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे व शिंदे गट यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शाखेतून बाहेर काढले.

  शिवसेना शाखेची काच फोडली

यावेळी कोणीतरी शिवसेना शाखेची काच फोडली. यामुळे आक्रमक झालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेवर आपला अधिकार असून तेथे बसलेल्या सर्वांना बाहेर काढेपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. यावर ठाकरे गटाकडून शिवसेना शाखा आपलीच असून आपल्याच जागेत आपण बसल्याचा दावा करत येथून हलणार नाही, असे निक्षून सांगितले. यामुळे तणाव वाढला.

  यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. दळवी गट व ठाकरे गटाच्या प्रत्येकी पाच पदाधिकाऱयांनी दापोली पोलीस स्थानकात यावे व आपली भूमिका मांडावी, अशी सूचना त्यांनी मांडली. मात्र शिंदे गटाकडून शिवसेना शाखेतील सर्वांना आधी बाहेर काढा; तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. त्याचवेळी ठाकरे गटाकडून येथे जमलेल्या सर्वांना त्यांच्या कोकम्बआळी येथील कार्यालयात जावे, तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली.

  अखेर पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चौकातून बाजूला केल्यावर ठाकरे गटाचे पाच प्रतिनिधी पोलीस स्थानकात दाखल झाले. मात्र त्याचवेळी शिवसेना शाखेतून बाहेर पडणाऱया कार्यकर्त्याबरोबर शिंदे गटाची झटापट झाली. यामुळे अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून तेथे जमलेल्या सर्वांना पांगवले. यानंतर सर्व दापोली पोलीस स्थानकात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंच्या तक्रारी घेण्याचे काम सुरू होते.

पोलीस बंदोबस्तात वाढ

या राडय़ामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनीही सुरक्षेचा उपाय म्हणून बंदोबस्तात वाढ केली आहे. या राजकीय गोंधळामुळे दापोली बाजारपेठेत आलेले नागरिक, शाळेतून परतणारे विद्यार्थी व पालकांना त्रासाला समोर जावे लागले. 

Related Stories

जि. प. मार्फत 425 पीपीटी किटस्

NIKHIL_N

सांबर शिंगांच्या तस्करी प्रकरणी रेडीतील दोघांना अटक

Patil_p

सावंतवाडीत विज्ञान प्रदर्शन

NIKHIL_N

महिलेला लुबाडत झुडपात फेकले

Patil_p

‘ऍप’साठी शाळांचा पालकांवर दबाव

NIKHIL_N

‘सॅनिटेशन डोम’ फवारणीला शात्रीय आधार नाही!

NIKHIL_N