Tarun Bharat

दापोलीत तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू

वार्ताहर/ टाळसुरे

दापोली तालुक्यातील वणोशी-खोतवाडी येथे एकाच घरातील तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली. एकाच घरात, पण वेगवेगळ्य़ा खोल्यांमधे या तिघींचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले असले तरी तिन्ही महिलांच्या डोक्यातून रक्त वहात होते. यामुळे त्या जळून मरण पावल्या की घातपात, याचा पोलीस तपास करत आहेत. संक्रांतीच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण दापोली तालुका हादरून गेला आहे.

  सत्यवती पाटणे (75), पार्वती पाटणे (90) व इंदुबाई पाटणे (85) अशी मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत. दापोली-पालगड रस्त्यावरील वणौशी या गावांमध्ये खोतवाडीत सुमारे 35 घरे असली तरी बहुतांशी घरे बंद अवस्थेत आहेत. या गावातच एका घरामध्ये सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे या वृद्ध महिला रहात होत्या. त्या एकमेकींच्या सवती होत्या. त्यांच्या समोरच्या घरात त्यांचीच सख्खी जाऊ इंदुबाई पाटणे रहात होत्या. या सर्वजणी एकमेकीच्या आधाराने रहात होत्या. यापैकी पार्वती पाटणे कित्येक वर्षे आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या तर सत्यवती पाटणे या हात व पायाच्या आधाराने चालत असत. त्यांच्या सोबतीला समोरच्या घरातून इंदुबाई पाटणे येत असत. सध्या दापोलीत थंडी अधिक असल्याने त्या घराची दारे, खिडक्या बंद करूनच रहात असत.

  त्यांच्या घराच्या समोर त्यांचे कुलदैवत मंदिर असून त्याची किल्ली त्यांच्या घरात असते. तेथे पूजा करण्यासाठी विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात. त्यांना शुक्रवारी सकाळी या महिला उन्हामध्ये बसलेल्या दिसल्या नाहीत. शिवाय मंदिराची किल्ली घेण्यासाठी ते गेले. मात्र घरातून काहीच प्रतिसाद न आल्याने मागील बाजूस गेले असता मागील दरवाजा उघडा आढळला. त्यांना संशय आल्याने ग्रामस्थांना घेऊन खातरजमा केली असता घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी ही घटना त्यांच्या मुंबईतील नातेवाईकांना कळवली. हे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळी दापोलीत दाखल झाले. दापोलीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आपल्या अधिकाऱयांसमवेत शुक्रवारी दुपारी घटनास्थळी आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

  या महिला मृतावस्थेत आढळून आल्या त्या घराचा पुढील दरवाजा आतून बंद होता, मात्र मागील दरवाजा उघडा होता. त्यातील सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीजवळ मृतावस्थेत जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या सर्वांचे डोके फुटून त्यातून बरेच रक्त वाहून गेल्याचे दिसत होते. पार्वती पाटणे अनेक वर्षे जागेवरच असूनही त्या दुसऱया खोलीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या तर इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणाऱया त्यांच्या नातेवाईक हॉलमध्ये मृतावस्थेत आढळल्या. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

दोडामार्ग ते बांदा रस्ता पावसाळी डांबराने तर दोडामार्ग ते विजघर दुरुस्ती जांभ्या दगडाने दुरुस्ती

NIKHIL_N

किरीट सोमय्यांनी मिलिंद नार्वेकरांच्या पाडलेल्या बंगल्याची केली पहाणी

Archana Banage

गोव्यात नियमित जाणाऱयांना ओळखपत्रे द्या

NIKHIL_N

सीआरझेडमधील शासकीय इमारतींना लाभ होणार?

NIKHIL_N

आशा सेविका मानधन प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी

Patil_p

लोरे, नाडण येथे दोघे बुडाले

NIKHIL_N