Tarun Bharat

दापोलीत परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घरावर हल्ला

Advertisements

वार्ताहर/ टाळसुरे

दापोली तालुक्यातील देगाव-बौद्धवाडी येथील एका भंगार व्यावसायिकाच्या घरावर संतप्त सुमारे 40 ग्रामस्थांच्या जमावाने हल्ला करून त्याला गावातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याच्या राहत्या घरासह टेम्पोची तोडफोड केली. जमीन वादातून शनिवारी दुपारी 2 वाजता घडलेल्या या प्रकारामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

 दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, भंगार व्यावसायिक गंगासागर शुक्ला यांनी जुलै 2021 मध्ये देगाव येथे जमीन खरेदी केली असून या जमिनीत घराचे बांधकाम सुरू केले आहे. शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास गावातील सुमारे 40जणांचा जमाव बांधकाम केलेल्या भागात नासधूस करत असल्याचे सुजल मंडपे याने फोन करून सांगितले. यामुळे शुक्ला हे पाहण्यासाठी तत्काळ आपल्या जागेकडे गेले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या दिनेश महाळुंगकर व रवींद्र भोसले या दोघांनी सांगितले की, हाच तो भैय्या असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. याचवेळी शुक्ला यांच्यासह त्याची पत्नी आणि घरमालक मुकुंद मंडपे यांना प्रदीप भोसले, रमाकांत शिंदे, गुरुनाथ मांडवकर, रवींद्र भोसले, रुपेश बामणे, सुरेश करंजकर, विकास बाईत यांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी प्रभाकर गोलांबडे, गंगाराम बाईत, नागेश जाधव, दिलीप जाधव, अनंत जाधव, अनुराधा भोसले, शानू पाथरकर, सुनील सभीगण, अशोक कदम, चंद्रकांत बामणे व अन्य सुमारे 20जण (सर्व रा. देगाव) घटनास्थळी जमा झाले व त्यांनीही काठय़ा व हाताच्या सहाय्याने शुक्ला यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम 452, 435, 143, 147, 148, 149, 352, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.

परप्रांतीय असल्यामुळेच हुसकावून लावण्याचा प्रयत्न

या घटनेबाबत गंगासागर शुक्ला म्हणाले की, सुमारे 12 वर्षांपासून आपण देगाव येथे भंगार गोळा करणे, सुकी मच्छी विकणे, सुक्या काजू बी, काळी मिरी अशी उत्पादने विकत घेणे अशा प्रकारचा व्यवसाय करीत आहोत. देगाव येथे यापूर्वीही आपण घर विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपण उत्तर प्रदेशचा असल्याने काहींनी विरोध करून व्यवहार पूर्ण होऊ दिला नाही. जुलै 2021 मध्ये आपण देगाव येथे जागा खरेदी केली व सातबाराही नावाने झाला आहे. आपण गावातीलच मुकुंद मंडपे यांच्या वाडय़ात पत्नी माधुरी व 7 वर्षाचा मुलगा शिवांश असे तिघेजण भाडय़ाने राहत असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. वाडा उघडा असल्याने चारही बाजूंना पुठ्ठे व फायबरचे आडोसे लावले आहेत. मंडपे यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेत घर बांधण्याचे काम आपण सुरू केले होते, परंतु परप्रांतीय असल्यामुळे काही लोकांनी त्रास दिल्याचे त्यांनी सांगितले. या जमावाने माझ्या टेम्पोची काच फोडली व गाडी ढकलून एका बाजूला पलटी केली आणि गाडीचे नुकसान केले. तसेचे खरेदी केलेली सुमारे 400 किलो सुकी काजू बी, 20 किलो काळीमिरी तसेच घरातील अंथरूण-पांघरूण व इतर साहित्य डिझेल टाकून पेटवले व घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. खरेदी केलेल्या जागेत जोत्याचे बांधकाम पूर्ण केले होते व ते बांधकामही या जमावाने तोडून टाकले. यावेळी जमावाने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण पत्नी व मुलाला घेऊन तेथून पळ काढला आणि घर मालक मंडपे यांच्या घरात लपून बसलो होतो. आपल्याला योग्य न्याय मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांपर्यंत कैफियत घेऊन जाणार आहोत. सुमारे बारा वर्षापेक्षाही अधिक काळ दापोली येथे वास्तव्य आहे. तसेच भंगार, काजू बी खरेदासाठी घरात ठेवलेली सुमारे चार लाख रुपयांची रोकड गायब झाल्याचेही त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

..तर जमावाने पतीला ठार मारले असते!

या बाबत शुक्ला यांची पत्नी माधुरी म्हणाल्या की, आपला पती या जमावाला न सापडल्याने मला पकडून ठेवले. जर माझा पती लपून बसला नसता तर जमावाने त्याला ठार मारले असते, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Related Stories

दापोलीतील परबांचे रिसॉर्ट पाडताना स्वतः हजर राहणार

Archana Banage

रत्नागिरीत लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी, वृध्दांना चक्कर

Archana Banage

जागा मिळाली, तरच आडाळीच वनस्पती संशोधन केंद्र!

NIKHIL_N

सिंधुदुर्गात माकडतापाचे तीन बळी

NIKHIL_N

आता कोणीही, कितीही विरोध केला तरी रिफायनरी होणार!

Patil_p

जिल्हय़ातून व्यापाऱयांचा विरोध..काहींचा पाठिंबा!

Patil_p
error: Content is protected !!