Tarun Bharat

दापोलीत महाआघाडी, मंडणगडात सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती!

Advertisements

प्रतिनिधी/ दापोली, मंडणगड

दापोली नगर पंचायतीच्या चार प्रभागातील 17 जागांसाठी बुधवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी व शिवसेना युतीच्या उमेदवारांनी स्पष्ट बहुमत मिळवत युतीचे 17 पैकी तब्बल 14 उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीच्या 8 व शिवसेनेच्या 6 उमेदवारांनी बाजी मारली. सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ‘शिट्टी’ केवळ दोनच ठिकाणी वाजली. तर भाजपने एका जागेच्या बळावर नगर पंचायतीत चंचूप्रवेश मिळवला. तर मंडणगड नगर पंचायतीच्या चार प्रभागातील 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग नाकारत सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती दिल्या. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महाआघाडीचे 7 तर आमदार योगेश कदम यांच्या पाठिंब्याने शिवसेना बंडखोर गटाच्या शहर विकास आघाडीच्या 7 उमेदवारांसह 3 अपक्ष उमेदवार विजयी झाले. मूळ शिवसेनेचे चारही अधिकृत उमेदवार या निवडणुकीत मात्र पराभूत झाले.

  शिवसेना व काँग्रेस आघाडीला सोपी वाटणारी दापोली नगर पंचायतीची निवडणूक नंतर कठीण बनली. या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्याकडील निवडणुकीतील हक्क काढून घेऊन ते माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आले. यामुळे नाराज योगेश कदम गटाच्या उमेदवारांनी शिट्टी ही निशाणी घेऊन अपक्ष निवडणूक लढवली. मात्र हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणारे दोनच उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेसने नाराज शिवसेना बंडखोरांबरोबर अघोषित युती केली. मात्र त्यांना खातेही खोलता आलेले नाही. मनसेचेही इंजिन पुन्हा यार्डातच लागले. परंतु भाजपच्या विद्यमान नगरसेविका जया साळवी यांना मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली. भाजपचे गेल्यावेळी 2 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 8 व सेनेच्या 6 उमेदवारांनी विजयी मिळवत युतीचे वर्चस्व राखले.

  दापोलीत सूर्यकांत दळवी गटाची पकड घट्ट

या निवडणूक निकालामुळे दापोलीवरील माजी आमदार सूर्यकांत दळवी गटाची पकड घट्ट होत असल्याचे दिसत आहे. तर राष्ट्रवादी हा दापोलीत पुन्हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

 राष्ट्रवादीने मिळवली तब्बल 2440 मते

या निवडणुकीतील 11848 मतदारांपैकी 8023 जणांनी मतदान केले होते. यापैकी राष्ट्रवादीने निवडणुकीत तब्बल 2440 मते मिळवली. त्याच्या खालोखाल शिवसेनेतील बंडखोर उमेदवारांनी शिट्टी या निशाणीवर 2002 मते मिळवली. तर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी 1403 मते मिळवत तिसऱया क्रमांकावर स्थान मिळवले. तर भाजपच्या सर्व उमेदवारांना मिळून केवळ 1023 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची मिळून केवळ 421 व मनसेच्या उमेदवारांनी 238 मते मिळवली. तर बसपच्या हत्तीने 57 मतांवर शिक्कामोर्तब केले.

 मंडणगडात शहर विकास आघाडीची जोरदार मुसंडी

मंडणगड नगर पंचायतीच्या 4 प्रभागातील 17 जागांसाठी झालेल्या निवडणूक निकालात सत्ताकारणाची चावी अपक्षांच्या हातात गेलेली असताना निवडणुकांच्या तोंडावर केलेला महाआघाडीचा प्रयोग शहरातील सुमारे 50 टक्के मतदारांनी नाकारल्याचा दिसला. शहरातील मूळ शिवसेनेचे चारही अधिकृत उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्याने अधिकृत शिवसेनेचा शहरातील पत्ता साफ झालेला दिसला. तसेच आमदार योगेश कदम यांच्या पांठिब्याने शिवसेनेच्या बंडखोर शहर विकास आघाडीने निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेली दिसली.

  मंडणगड शहरातील चोखंदळ मतदार यावेळी संभ्रमात असल्याची साक्ष निकालाने दिली. प्रचलित आघाडय़ांसह अपक्षांनीही आपले महत्त्व निवडणूक निकालानंतर अधोरेखित केल्याने निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालेले असताना गेल्या निवडणुकीतील एकाच पक्षाच्या हाती सत्ता देण्याची गेल्यावेळेस येथील मतदारांनी केलेली चूक मतदारांनी यावेळी सुधारलेली दिसून आली आहे. यावेळी जोड-तोडचे राजकारण, दावे-प्रतिदावे यानंतरही सत्ताकारणात प्रबळ विरोधी पक्ष पुढील 5 वर्षे काम करताना दिसून येईल. यंदाची निवडणूक ही आमदार योगेश कदम यांच्या बंडखोर अपक्ष उमेदवारांमुळे गाजली. निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदारांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न व त्यांच्या गटाची झालेली हकालपट्टी सेनेच्या चांगलीच अंगाशी आली असून राष्ट्रवादीची खेळी त्यांच्याच अंगाशी आल्याचे सिध्द झाले आहे.

Related Stories

विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबत विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय!

NIKHIL_N

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही

NIKHIL_N

लंडन : ‘साहेबा’ने गिरवला भारताचा कित्ता

NIKHIL_N

दापोली पंचायत समितीचे माजी सभापती श्रीपत पवार यांचे निधन

Abhijeet Shinde

वायरी येथे रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

Ganeshprasad Gogate

साडेचौदा हजार नागरिकांचा आरोग्य सर्व्हे

NIKHIL_N
error: Content is protected !!