प्रतिनिधी / दापोली
दापोली पंचायत समितीचे विद्यमान सभापती, राष्ट्रवादी व मच्छिमार नेते रउफ हजवानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य व उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. त्यांच्या राजिनाम्याने दापोली पंचायत समिती मधील राजकारणाला कलाटणी मिळणार असल्याने त्यांनी राजिनामामागे घ्यावा याकरीता अनेकजण पयत्न करत आहेत. घरच्या अडचणींमुळे व कामांच्या व्यापामुळे पक्षाचे काम करणे शक्य होणार नसल्याने राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य व तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे त्यांनी दिलेल्या राजीनाम्यात स्पष्ट केले आहे.
मात्र आपण पक्षातील चांडाळचौकडीमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी तरूण भारतशी बोलताना स्पष्ट केले. आपल्याला केवळ 8 महिन्यांकरीता सभापती पद देण्यात आले होते. यावेळी आपण सुचवलेल्या सदस्याला उपसभापती पद देण्यात आले नाही. मात्र आता ज्यांना उपसभापती पद देण्यात आले त्यांनाच पुन्हा सभापती पद देण्यात येणार आहे. यामुळे त्यांना 16 महिने पदावर रहायला मिळणार आहे. शिवाय आपण पक्षाकडून अन्य कसली ही अपेक्षा केलेली नाही. आपण पक्षाकरीता काही कार्यक्रम राबवायचा म्हटले की त्यात मोडता घालण्यात येते. आपले पाय मागे खेचले जातात. यामुळे आपले मनोधैर्य खचले आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्याबद्दल बोलताना त्यांनी आपल्याला खूप सांभाळून घेतले. मात्र या चांडाळचौकडीच्या पुढे त्यांचे देखील काही चालत नाही. याकरीता आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण आपल्या कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना विचारात घेवून आपण आपला निर्णय लवकरच जाहिर करणार आहोत. आपण यापुर्वी शिवसेनेत होतो. आपल्याला आपल्या जुन्या पक्षाची दारे सदैव खुली असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने व आपले मित्र देखील तिकडेच गेलेले असल्याचे ते म्हणाल्याने राष्ट्रवादीचे सभापती रउफ हजवानी हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. हजवानी हे माजी आमदार संजय कदम यांच्या खास मर्जीतील असल्याचे बोलले जात होते. हर्णैचा राष्ट्रवादीचा किल्ला हजवानी यांनी केली कित्येक वर्ष एकहाती लढवला. यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास हर्णै पंचकोशीत राष्ट्रवादी बॅकफुटला जाणार असे बोलले जात आहे.


previous post