Tarun Bharat

दापोलीत विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

Advertisements

सोवेली येथील घटना : सूबरोबरच्या किरकोळ वादात टोकाचे पाऊल : विहिरीत उडी मारून संपवले जीवन लहानग्यांच्या मृत्यूने हळहळ

वार्ताह / पालगड

सासू रागावल्याचे निमित्त होऊन रागाच्या भरात विवाहितेने आपल्या तीन व एक वर्षाच्या लहानग्यांसह विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याचा प्रकार दापोली तालुक्यातील सोवेली गावात घडला. या घटनेमुळे लाड कुटुंबियांसह सोवेली गावावर शोककळा पसरली आहे.

  दापोली तालुक्यातील सोवेली-चव्हाणवाडी येथे प्रथमेश लाड हे आपले आई-वडील, पत्नी सिद्धी व मुले प्रणित व स्मित यांच्यासह राहतात. कोरोना काळात मुंबईतील नोकरी गेल्याने ते गावातच आपल्या कुटुंबियांसमवेत शेती करतात. मंगळवारी रात्री सिद्धी आपल्या लहान मुलांना भरवत असताना त्यांच्या सासुबाई काहीतरी बोलल्या. या बोलण्याचा राग मनात धरून रात्री 8च्या सुमारास सिद्धी आपल्या दोन्ही लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. घराच्या आजूबाजूला त्या न सापडल्याने कुटुंबिय व ग्रामस्थांनी गावात इतरत्र त्यांचा शोध सुरु केला. दहा वाजण्याच्या सुमारास जंगलातील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत त्यांना प्रणित व स्मित यांचे मृतदेह आढळले. मात्र सिद्धी यांचा शोध लागला नव्हता.

 माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांनी ही घटना दापोली पोलिसांना कळवली. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र मोठय़ा प्रमाणातील धुके व जंगलमय भाग यामुळे सकाळी हे मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रणित व स्मित त्यांचे मृतदेह डालग्याने बाहेर काढण्यात आले. यानंतर मोठे गळ टाकून प्रयत्न केले असता सिध्दी यांचा मृतदेहही त्याच विहिरीत पाईपजवळ अडकलेल्या स्थितीत आढळला. सर्व मृतदेह उत्तर तपासणीसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

  या घटनेमुळे सोवेली-चव्हाणवाडीवर शोककळा पसरली आहे. दापोली पोलीस स्थानकात या बाबत भादंवि कलम 174 अन्वये नोंद करण्यात आली आहे.   अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी पूजा हिरेमठ करत आहेत.

Related Stories

कातकरी वस्तीला जीवनावश्यक साहित्य

NIKHIL_N

रत्नागिरीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे जंगी स्वागत

Archana Banage

चोरवणे – जखमेचीवाडीतील पाणीटंचाई अखेर संपुष्टात

Archana Banage

आचरा कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत सुयश

Anuja Kudatarkar

आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

NIKHIL_N

गणेशोत्सव साजरा करण्यावरुन दोन गटात मारहाण

Patil_p
error: Content is protected !!