Tarun Bharat

दाबोळी विमानतळावर देशी पर्यटकांचा ओघ

संख्या आणखी वाढण्याची शक्यता

प्रतिनिधी/ वास्को

नाताळ आणि नववर्षाच्या माहोलात गोव्यात हवाईमार्गे उतरणाऱया प्रवाशांच्या संख्येत मोठय़ा प्रमणात वाढ झालेली आहे. मागच्या आठ दिवसांपासून दाबोळी विमानतळावर देशी प्रवाशांची वर्दळ वाढलेली असून दिवसा सुमारे अकरा हजार देशी प्रवाशांचे आगमन व उड्डाण होत आहे. पुढील दोन दिवसांत प्रवाशांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

दाबोळी विमानतळ प्राधिकरणाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेले नऊ महिने शांतता अनुभवलेल्या दाबोळी विमानतळावर गेल्या आठ दिवसांत हवाई प्रवाशांमध्ये सतत वाढ होऊ लागलेली आहे. देशी पर्यटकांनी नाताळ आणि नववर्षाच्या माहोलाचा आनंद लुटण्यासाठी गोव्यालाच अधिक पसंती दिल्याचे दिसत आहे.

प्रतिदिन अकरा हजार प्रवाशांचे आगमन

दर दिवशी इंडिगो ऍअरलाईन्स, विस्तारा एअर लाईन्स, स्पाईस जेट, एअर इंडिया, गो एअर अशा हवाई कंपन्यांची सत्तर ते पंचाहत्तर विमाने दाबोळी विमानतळावर दाखल होत असून या हवाई फेऱयांमधून दर दिवशी अकरा हजाराहून अधिक प्रवासी गोव्यात पाऊल ठेवीत आहेत. जेवढी विमाने दाबोळीत दाखल होतात तीच विमाने परतीच्या प्रवासाला तेवढय़ाच संख्येने प्रवाशांना घेऊन उड्डाण करतात.

प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता

मुंबई, दिल्ली, बेंगळूर, हैदराबाद, लखनऊ, चेन्नई, चंदीगड अशा शहरांमधून हे प्रवासी हवाईमार्गे गोव्यात दाखल होत आहेत. या वाढत्या हवाई फेऱया व प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे तुर्तास दाबोळी विमानतळावर उत्साह वाढलेला आहे. पुढील दोन तीन दिवसांत प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दाबोळीत उतरणाऱया हवाई प्रवाशांची कोरोनाच्या धास्तीमुळे केवळ थर्मल स्कॅनिंग करण्यात येते.

आठ दिवसांपूर्वी दाबोळी विमानतळावर ठराविक आणि विशेष आंतरराष्ट्रीय विमाने दाखल होत होती. मात्र, लंडनमध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या नवीन धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला पुन्हा खिळ बसलेली आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या मंगळवारी दाबोळीहून एक विमान शारजाला रवाना झाले होते. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी एक विशेष विमान 150 प्रवाशांना घेऊन दुबईला उड्डाण करणार आहे. उद्या बुधवारी हेच विमान जवळपास शंभर प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावर दाखल होणार आहे. सध्या विमानतळाचा सारा भार देशी प्रवाशांवरच आहे.

उपलब्ध माहितीनुसार रविवारी मध्यरात्रीपर्यंत 72 विमाने देशातील विविध शहरातून दाबोळीत दाखल झाली होती. तर काल सोमवारी रात्री आठपर्यंत 50 विमानांचे आगमन झाले होते. तर अन्य अठरा विमाने मध्यरात्रीपर्यंत दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होती.

कोरोना काळात दाबोळीशी देशातील अनेक शहरेही जोडली गेली  : गगन मलिक

दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दाबोळीत देशी पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट करून अजूनही प्रवासी गोव्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले. गेले दोन दिवस सतत अकरा हजाराहून अधिक देशी प्रवासी गोव्यात दाखल झालेले आहेत. नववर्षाच्या उत्साहामुळे या पर्यटकांचे गोव्यात आगमन होत असून त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना विमानतळावर करण्यात आलेली आहे. विमानांच्या फेऱयांमध्ये वाढ होत आहे. कोरोना संसर्गामुळे काही वाईट गोष्टी घडलेल्या असल्या तरी काही चांगल्या गोष्टीही घडलेल्या आहेत. पूर्वी जी शहरे हवाईमार्गे गोव्याला जोडली गेली नव्हती, अशी काही शहरे या कोरोना काळात जोडली गेलेली आहेत. लवकरच कर्नाटकातील हुबळी दाबोळीशी हवाई मार्गे जोडले जाईल, अशी माहिती गगन मलिक यांनी दिली. हवाईमार्गे प्रवाशांची वाढती संख्या आर्थिक दृष्टय़ा गोव्याला लाभदायक ठरणार आहे. राज्य सरकारही या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

दिलीप परुळेकरांचे बंड झाले थंड!

Amit Kulkarni

मंत्र्यांचेच समुपदेशन करण्याची भाजपवर वेळ

Omkar B

शैक्षणिक वर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस देखरेख

Amit Kulkarni

नेसाय येथे आज रेल्वेमार्गाच्या सीमांकनाच्या विरोधात निदर्शने

Omkar B

हेडगेवारची सलग 14 व्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा

Omkar B

स्थिर सरकारमुळे भाजपात सध्या अन्य दोघां आमदारांची गरज नाही- मंत्री

Patil_p