इस्लामपूर / प्रतिनिधी
वृध्द वडिलांचा खून करणाऱ्या लक्ष्मण हरी पाटील- वाघमारे( ३०, रा.चिकुर्डे, टाकळी वसाहत) याला पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून दि. १९ जुलै २०१९ रोजी लक्ष्मण याने वडील हरि कोंडीबा पाटील-वाघमारे(८१) यांचा खून करून पवित्र नात्याला काळीमा फासला होता.
मृत हरी पाटील हे पत्नी तागाबाई, मुलगा लक्ष्मण व सून सोनाली व नातवंडासह राहत होते. दोन वर्षापूर्वी हरी पाटील यांना अर्धांगवायू झाल्याने ते घरीच राहत होते. तर लक्ष्मण काही कामधंदा करीत नव्हता. दारुसाठी पैसे मागून तो वारंवार आई वडीलां बरोबर भांडण करीत होता. त्यामुळे त्याची पत्नी सोनल ही मुलांसह माहेरी गेली होती. दि. १९ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी लक्ष्मण याने म्हैस विकून आलेल्या पैशातील दोन हजार रुपयांची मागणी आई तागाबाईकडे केली. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे ‘तु पैसे दिले नाहीस तर तुझं आणि पप्पांच काही खरं नाही. मी परत येई पर्यंत पैसे तयार ठेव’ असा दम देवून घरातून निघून गेला. त्यानंतर तागाबाई या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतात गेल्या.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री साडे नऊ वाजण्यापूर्वी लक्ष्मण याने झोपलेल्या हरी पाटील यांच्यावर लाकडी दांडक्याने डोक्यात, तोंडावर व पाठीवर मारहाण हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

