Tarun Bharat

दासबोधः व्यवस्थापनक्षेत्राचा आत्मा नसून पाया

संस्थेचे, संघटनेचे किंवा कुठल्याही औद्योगिक समूहाचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक औपचारिक आणि दुसरे अनौपचारिक! संस्थेच्या, संघटनेच्या आणि  उद्योगसमूहाच्या निर्मितीपासून किंवा अस्तित्वापासून कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त कार्य करण्यासाठी कुठल्या गोष्टींमुळे प्रेरित होत असेल ह्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न बऱयाच कालावधीपासून केला जातो आहे. ह्याविषयी बरेच संशोधनही करण्यात आलेले आहे. पाश्चिमात्य तज्ञाकडून ह्याबाबत काही पुस्तके, प्रबंध किंवा ग्रंथही प्रकाशित करण्यात आले आहेत. पश्चिमेच्या लेखकांनी, व्यवस्थापन तज्ञानी आणि संशोधकांनी जे तत्त्वज्ञान मांडले आहे ते उत्तम आहे.

 श्रीसमर्थांनी जे तत्त्वज्ञान दासबोधात व्यवस्थापनाबाबत मांडले आहे ते सर्वोत्तम आहे. ग्रंथराज दासबोध हा व्यवस्थापनक्षेत्राचा केवळ आत्मा नसून पाया आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म स्तरापासून ते अतिउच्च स्तरापर्यंत क्षणाक्षणाला घडणाऱया घटनांचे मार्गदर्शन श्रीसमर्थांनी दासबोधात मांडले आहे. तसेच ह्या घटनांमधून निर्माण होणाऱया प्रश्नांची समर्पक उत्तरे दासबोधात मिळतात. सातत्याने दासबोध वाचनाने हे जाणवते. व्यवस्थापन शास्त्रात अब्राहम मास्लो ह्यांच्या गरजांच्या श्रेणीचा सिद्धांत खूप लोकप्रिय आहे. आजही अनेक वेळा ह्या सिद्धांताचा उपयोग वेगवेगळय़ा उद्योगसमूहात केला जातो. त्यात प्रामुख्याने शारीरिक गरजा, सुरक्षात्मक गरजा, सामाजिक गरजा, सन्मानविषयक गरजा आणि आत्मविकासात्मक गरजांचा समावेश आहे. परंतु  मास्लोचा हाच सिद्धांत कुठेतरी अपुरा आहे असे जाणवते. कारण, त्यात आत्मविकासात्मक गरजानंतरचा पुढील प्रवास नेमका काय असू शकतो ह्याविषयी सांगण्यात आलेले नाही.

अब्राहम मास्लो शारीरिक गरजांविषयी व्यवस्थापन शास्त्रात असे सांगतात की, शारीरिक गरज ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि त्यात अन्न, वस्त्र, निवारा, झोप ह्यांचा समावेश असतो. ह्या गरजा पूर्ण झाल्यावरच मनुष्य खऱया अर्थाने स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतो. श्रीसमर्थांनी दासबोधात सुरुवातीलाच नरदेहस्तवन निरूपण समासात असे सांगितले आहे की,

धन्य धन्य हा नरदेह!

येथील अपूर्वता पाहो!

जो जो कीजे परमार्थलाहो!

तो तो पावे सिद्धीतें!!

या नरदेहाचेनि आधारें!

नाना साधनांचेनि द्वारें!

मुख्य सारासार विचारें!

बहुत सुटले!!

नरदेह पांगुळा असता!

तरी तो कार्यास न येतां!

अथवा थोंटा जरी असता!

तरी प्रोपकारास नये!!

01-18-28/10/01

ह्याचा अर्थ असा आहे की, हा नरदेह अत्यंत धन्य आहे. याची अपूर्वता अशी आहे की परमार्थ लाभावा ह्यासाठी जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो. नरदेहाच्या आधाराने असंख्य साधनांची वाट मोकळी होऊन अनेक साधने करणे शक्मय होते. विशेषकरून विचाराने पुष्कळजण मुक्त होतात. नरदेह जर पांगळा असेल तर त्याने कार्य करता येणार नाही आणि परोपकारही करता येणार नाही.

     मग परोपकार करणे तर दूरच

व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने श्रीसमर्थांनी सांगितलेल्या ह्या ओव्यांचा विचार केल्यास असे जाणवते की, नरदेहातच मनुष्याला व्यवस्थापनशास्त्र म्हणजे काय हे समजते, अनेक विद्या, अनेक गोष्टींचे ज्ञान होते. अन्न, वस्त्र, निवारा आणि निद्रा ह्यांचे महत्त्व प्राप्त होते. ह्याच मूलभूत गरजांवर आधारित किंवा अवलंबून असलेला मनुष्य स्वतःच्या इच्छेनुसार जे निर्माण करता येईल ते करू शकतो आणि सर्वार्थाने ह्यातून मुक्त होऊ शकतो. मनुष्य जर बौद्धिक किंवा शारीरिकरित्या कमकुवत असेल तर मात्र तो स्वतःची प्राथमिक गरजही भागवू शकणार नाही मग इतरांवर परोपकार करणे तर दूरच राहिले.

  समर्पक आणि समाधानकारक वर्णन

अब्राहम मास्लो ह्यांनी सांगितलेल्या सिद्धांताचे समर्पक आणि समाधानकारक वर्णन श्रीसमर्थांनी दासबोधात केले आहे. नरदेहस्तवन समासातील ह्या तीन ओवींमध्येच मास्लो ह्यांनी सांगितलेल्या गरजांचे वर्णन करण्यात आलेले आहे. आत्मविकासात्मक गरज म्हणजेच परमार्थाची पहिली पायरी होय आणि मनुष्य ही गरज कशाप्रकारे भागवू शकतो हेही नरदेहस्तवन निरूपण समासाच्या शेवटच्या ओवींमध्ये श्रीसमर्थांनी असे म्हटले आहे की,

परमार्थ तापसांसी थार!

परमार्थ साधकांसी आधार!

परमार्थ दाखवी पार!

भवसागराचा!!

परमार्थी तो राज्यधारी!

परमार्थ नाही तो भिकारी!

या परमार्थाची सरी!

कोणास द्यावी!!

अनंत जन्मीचें पुण्य जोडे!

तरीच परमार्थ घडे!

मुख्य परमात्मा आतुडे!

अनुभवासी!!

22-23-24/10/01

ह्याचा अर्थ असा आहे की, परमार्थ तापसांना आश्रय देतो आणि साधकांना आधार देतो.  परमार्थ भवसागरातून पार पाडतो. ज्याला परमार्थ समजला तोच खरा राजा आहे. पण, जो परमार्थ करीत नाही तो भिक्षेकरी समजावा. कुठलीही गोष्ट ही परमार्थाची बरोबरी करू शकत नाही. अनेक जन्मांचे पुण्य असल्याशिवाय परमार्थ घडत नाही. परमार्थ घडल्यावर आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो.

व्यवस्थापनशास्त्रात जसे जसे अधिकार आणि पदोन्नती होते तसे तसे व्यवस्थापनशास्त्राची प्रचिती प्राप्त होऊन त्याचा साक्षात्कार घडायला लागतो. ह्या साक्षात्कार आणि प्रचितीची प्राप्ती ज्यांना करवून घ्यायची असेल त्यांनी संतसाहित्याचा आणि श्रीसमर्थांच्या दासबोधाचा सातत्याने अभ्यास करावा.

माधव किल्लेदार

Related Stories

लढवय्या राष्ट्राध्यक्ष

Patil_p

आरमार अवश्यमेव करावे!

Patil_p

वाचाल तर वाचाल

Patil_p

नराचा नारायण

Patil_p

डॉक्टर मी होणार

Patil_p

लघुउद्योगांना लाभली तंत्रज्ञानाची साथ

Patil_p