113व्या दिंडी महोत्सवाला प्रारंभ
प्रतिनिधी /मडगाव
दिंडी महोत्सव हे मडगावचे भूषण असून कोविड महामारी नंतर होत असलेला यंदाचा श्री हरिमंदिर देवस्थानचा दिंडी महोत्सव भव्य स्वरूपात होईल व त्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभणार असल्याचा विश्वास मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केला. मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानच्या 113व्या दिंडी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ात श्री. कामत बोलत होते.
उद्घाटन सोहळय़ाला उद्योगपती प्रवास नायक, कीर्तनकार ह. भ. प. विवेकबुवा जोशी, देवस्थानचे अध्यक्ष सुहास कामत, खजिनदार नेवगी सरचिटणीस मनोहर बोरकर, देवस्थान समितीचे निलेश कांदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळय़ापूर्वी मंदिरात संध्याकाळी 5 वा. राम रक्षा मंडळ, मडगावच्या साधका तर्फे सुहास भट यांच्या नेतृत्वाखाली राम रक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी पुढे बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, मडगावच्या दिंडी महोत्सवात काणकोण पासून पेडणे पर्यंतचे लोक सहभागी होत असतात. पूर्वी लोक दिंडी महोत्सवात पहाटे 3 ते 6 यावेळी आवर्जुन चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघत होते. दिंडी महोत्सवाच्या वेळी कडाक्यची थंडी असायची. शहरात भाविकांची प्रचंड गर्दी असायची. दिंडी महोत्सवाची खासियत होती. आत्ता यात बदल झाला आहे. दिंडी महोत्सवाला भाविक लवकर येतात व देवाचे दर्शन घेतात व गायनाचा आस्वाद घेऊन घरी जातात.
गोव्यात सुहास बुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल कीर्तनकार तयार होत आहे. गोव्यात कीर्तन महाविद्यालय सुरू करण्यासाठी बोरी गावात कोमुनिदादची जागा पहावी, सरकारकडून त्यांना पाठिंबा दिला जाईल असे श्री. कामत यावेळी म्हणाले.
गोव्यात कीर्तनाला प्रोत्साहन देण्याची गरज
या प्रसंगी बोलताना उद्योपती प्रवास नायक म्हणाले की, श्री हरिमंदिर देवाच्या कृपेने व सर्वाच्या सहकार्याने पूर्ण झाले. 1958 मध्ये या दिंडी महोत्सवात निजामपूरकर बुवा यांची कीर्तने होत असे. ते अत्यंत उत्कृष्टरित्या कीर्तन सादर करयाचे. आम्ही त्यावेळी त्यांची कीर्तने आवर्जुन ऐकत होतो. त्याचा जबरदस्त प्रभाव आपल्यावर झाला होता. पण, आज कीर्तने दुर्मिळ होत आहे. गोव्यात नवीन कीर्तनकार तयार होण्याची गरज आहे. नवीन कीर्तनकार होण्याची अनेकांची तयारी आहे. त्यासाठी सरकारने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.