Tarun Bharat

दिल्लीची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल

पंजाबवर 17 धावांनी विजय, सामनावीर शार्दुल, अक्षर, कुलदीपचा भेदक मारा, मार्शचे अर्धशतक

वृत्तसंस्था/ नवी मुंबई

Advertisements

अर्शदीप सिंग व लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 3 बळी मिळवित पंजाब किंग्सने आयपीएलमधील साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 7 बाद 159 अशा माफक धावसंख्येवर रोखले तरी पंजाबला हे आव्हान पेलवले नाही. मिशेल मार्शचे अर्धशतक व नंतर सामनावीर शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्या भेदक माऱयामुळे दिल्लीने पंजाबवर 17 धावांनी मात करीत सातवा विजय नेंदवला. या विजयासह प्लेऑफ फेरी गाठण्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली असून 14 गुणांसह ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.

दिल्लीला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर डेव्हिड वॉर्नर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण मार्शने अर्धशतकी खेळी करताना सर्फराज खानसमवेत 51 धावांची व नंतर ललित यादवसमवेत 47 धावांची भागीदारी करून दिल्लीचा डाव सावरला. दिल्लीने प्रारंभी जलद धावा बनविल्या. त्यामुळे 5 षटकांतच त्यांचे अर्धशतक फलकावर लागले. सर्फराज खानने अल्पशी व वेगवान खेळी करताना 16 चेंडूत 5 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 32 धावा झोडपल्या. पण त्यांच्या मधल्या फळीतील तीन फलंदाज झटपट बाद झाल्याने 2 बाद 86 वरून 5 बाद 112 अशी त्यांची स्थिती झाली. मार्शने 17 व्या षटकात चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 19 व्या षटकांत बाद झाला. त्याने अक्षर पटेलसमवेतही 37 धावांची भर घातली. मार्शने 48 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 63 धावा फटकावल्या. ललित यादवने 21 चेंडूत 24, अक्षर पटेलने नाबाद 17 धावा जमविल्या. पंजाबतर्फे गोलंदाजीची सुरुवात करणाऱया लिव्हिंगस्टोनने 27 धावांत 3 तर अर्शदीप सिंगने 37 धावांत 3 बळी टिपले. रबाडाला एक बळी मिळविता आला.

160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने जलद प्रारंभ केला तरी दिल्लीच्या अचूक माऱयापुढे त्यांची स्थिती 1 बाद 38 वरून आठव्या षटकात 5 बाद 61 अशी झाली. यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. जितेश शर्माने सर्वाधिक 44 धावा जमवित थोडाफार प्रयत्न केला. पण इतरांची त्याला साथ मिळाली नाही. सुरुवातीला बेअरस्टोने 15 चेंडूत 28, शिखर धवनने 19 धावा काढल्या तर अखेरच्या टप्प्यात राहुल चहरने 24 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त इतरांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. 20 षटकांत त्यांनी 9 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारली. शार्दुलने 36 धावांत 4, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. पंजाब 12 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक ः दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 7 बाद 159 ः सर्फराज खान 32 (16 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), मिशेल मार्श 63 (48 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), ललित यादव 24 (21 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अक्षर पटेल नाबाद 17 (20 चेंडूत 2 चौकार), अवांतर 9. गोलंदाजी ः लिव्हिंगस्टोन 3-27, अर्शदीप सिंग 3-37, रबाडा 1-24.

पंजाब किंग्स 20 षटकांत 9 बाद 142 ः बेअरस्टो 28 (15 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), धवन 19 (16 चेंडूत 3 चौकार), जितेश शर्मा 44 (34 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), राहुल चहर नाबाद 25 (24 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 6. गोलंदाजी ः शार्दुल ठाकुर 4-36, अक्षर पटेल 2-14, कुलदीप यादव 2-14, नॉर्त्झे 1-29.

Related Stories

हॅलेप- मर्टन्स यांच्यात अंतिम लढत

Patil_p

दीपिका कुमारी पुन्हा ‘वर्ल्ड नंबर वन’

Patil_p

ओसाकाचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद

Patil_p

जोकोविच, केनिन-मुगुरुझा अंतिम फेरीत

Patil_p

जोकोविच, थिएम, ओसाका, सेरेनाची विजयी सलामी,

Patil_p

कृणाल पंडय़ाची विमानतळावर चौकशी

Patil_p
error: Content is protected !!