ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील कोरोना रुगांचा ग्राफ कमी होताना दिसत आहे. पण यांचा अर्थ आपण काळजी घ्यायची नाही किंवा सतर्क राहायचे नाही असा होत नाही.


पुढे ते म्हणाले, रुग्ण संख्या कमी झाली असली तरी लसीचा तुटवडा हे एक मोठे संकट राजधानीवर आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने आज पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या लसी संपल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील अनेक लसीकरण केंद्रे देखील बंद करण्यात आली आहेत.
पुढे ते म्हणाले काही डोस शिल्लक आहेत, ते आज संध्याकाळ पर्यंत संपतील. त्यामुळे उद्यापासून तरुणांसाठी देखील लसीकरण बंद करावे लागेल. आम्ही केंद्राकडे लसीची मागणी केली आहे. ज्यावेळी आमच्याकडे डोस उपलब्ध होतील त्यावेळी पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. पुढे ते म्हणाले, दिल्लीत प्रत्येक महिन्याला 80 लाख लसीची आवश्यकता आहे. मात्र, मे महिन्यात आम्हाला केवळ 16 लस उपलब्ध झाल्या. तर जून महिन्यासाठी केंद्राने ही संख्या कमी केली असून आम्हाला केवळ 8 लाख लस मिळणार आहेत. आता पर्यंत आम्ही 50 लाख नागरिकांना लस दिली आहे.
दिल्लीतील युवा पिढीसाठी आम्हाला अडीच कोटी लसींची गरज आहे आणि अशीच परिस्तिथी राहिल्यास युवा पिढीला लस देण्यासाठी 30 महिने लागतील. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला लस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहेे.