Tarun Bharat

दिल्लीत समूह संसर्ग सुरू

राज्य सरकारचा दावा : 31 जुलैपर्यंत रुग्णसंख्या साडेपाच लाख होण्याची भीती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता राजधानी दिल्लीत समूह संसर्ग सुरू झाला असल्याची माहिती मंगळवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. मात्र केंद्र सरकार अद्याप समूह संसर्ग सुरू झाल्याचे मान्य करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 31 जुलैपर्यंत दिल्लीतील रुग्णसंख्या साडेपाच लाख होईल. 80 हजार बेडची गरज भासेल, असेही ते म्हणाले.

  दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये देशात 9 हजार 987 नवे रुग्ण आढळले. तर 331 जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण रूग्णसंख्या 2 लाख 66 हजार 598 झाली आहे. 1 लाख 29 हजार 917 जणांवर उपचार सुरू आहेत. 1 लाख 29 हजार 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 7 हजार 466 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

              समूह संसर्गावरून दिल्ली सरकार-केंद्र सरकारमध्ये मतभेद

मागील काही दिवसांमध्ये दिल्लीमधील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी बैठक घेतली. या बैठकीत समूह संसर्ग रोखण्यासंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते; पण असा निर्णय झाला नाही. केंद्र सरकारला अद्याप दिल्लीत समूह संसर्ग सुरू असल्याचे मान्य नाही, असे सिसोदिया यांनी सांगितले. 15 जूनपर्यंत 44 हजार तर 30 जूनपर्यंत दिल्लीत एक लाख रुग्ण होतील. 31 जुलैपर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर पोहोचेल. 80 हजार बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासेल, असेही ते म्हणाले. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, दिल्लीत समूह संसर्ग सुरू झाला आहे. रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली याची माहिती मिळत नाही, त्यावेळी समूह संसर्ग सुरू झाल्याचे मानले जाते. मात्र याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

                                             पुडुच्चेरीमध्ये दहावीची परीक्षा रद्द 

पुडुच्चेरीमधील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी मंगळवारी दिली. राज्यातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येईल. कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

                            हिमाचल प्रदेश पोलीस मुख्यालय सील

हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय पुंडू कोरोनाबाधिताच्या संपर्कात असल्याच्या शक्यतेवरून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच पोलीस मुख्यालय कार्यालयही सील केले आहे. नुकतेच पुंडू यांनी पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठय़ा संख्येने नागरिक आले. यातील एकजण कोरोनाबाधित होता. दोन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर कुंडू यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यालयातील 28 कर्मचाऱयांची कारोना चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 26 जण कोरोनाबाधित

राजस्थानमध्येही रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. राजधानी जयपूरमधील सुभाष चौक परिसरातील एकाच कुटुंबातील तब्बल 26 जणांना कोरानाची लागण झाली आहे. या कुटुंबातील एकाला सात दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते. तर कुटुंबातील 26 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.

एकूण रुग्णसंख्येपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण बरे

मंगळवारी सकाळपर्यंत देशात 1 लाख 29 हजार 345 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. तर 1 लाख 29 हजार 95 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची संख्याही लक्षणीय आहे. आतापर्यंतच्या रुग्ण संख्येएवढेच रुग्ण बरे झाल्याने कोरानाची धास्ती कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

आनंदी रहा, चिमुकल्याचा कोरोनाबाधितांना संदेश

Patil_p

नोएडात 78 टक्के कोरोना रुग्णांचे मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने

datta jadhav

अवैध कारखान्यातील स्फोटात 9 कामगार ठार

Patil_p

इंधनदराप्रकरणी दिलासा शक्य

Patil_p

केवळ भाजपच्या लोकांचे उत्पन्न वाढले, जनतेचे नाही: कपिल सिब्बल

Archana Banage

देशाच्या सुरक्षेवर कुठलीच तडजोड नाही!

Patil_p