ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लॉकडाऊन 31 मेे पासून हळूहळू उठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिली.


ते म्हणाले, आम्ही दिल्लीची जनता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिल्लीतला लॉकडाऊन हळूहळू हटवणार आहोत. मात्र, यावेळी कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढणार तर नाही ना याची काळजी घेतली जाईल.
मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्लीतल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आता मोठी घट होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये बाधित आढळण्याचा दर 1.5 टक्क्यांवर आला आहे तर जवळपास 1100 रुग्ण बाधित आढळले आहेत. कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये दिल्लीवासियांची मेहनत फळाला येत आहे. दिल्लीतली परिस्थिती सुधारत चालली आहे. आणि म्हणूनच दिल्ली आता अनलॉकसाठी सज्ज आहे.


केजरीवाल म्हणाले, राज्यात जारी असलेले लॉकडाऊन सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर आम्ही अनलॉकची प्रक्रिया सुरु करणार आहोत. सोमवारपासून बांधकाम क्षेत्र आणि कारखाने सुरु करण्यात येतील.