Tarun Bharat

दिल्लीविरुद्ध पराभवाची परतफेड करण्याची राजस्थानला संधी

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

बेन स्टोक्सच्या आगमनामुळे संघात थोडा भक्कमपणा आला असल्याने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱया आयपीएलमधील परतीच्या सामन्यात आघाडी फळीकडून चांगले प्रदर्शन होण्याची अपेक्षा राजस्थान रॉयल्स करीत आहे. सायंकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने गेल्या आठवडय़ात या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात 46 धावांनी विजय मिळविला होता. त्यामुळे राजस्थानचा कर्णधार स्मिथ या परतीच्या सामन्यात त्या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक झाला असून संघसहकाऱयांकडून सुधारित कामगिरीची त्याने अपेक्षा केली आहे. मागील लढतीवेळी राजस्थान संघात स्टोक्स नव्हता. क्वारंटाईन संपल्यानंतर तो संघात दाखल झाल्यानंतर पहिल्या सामन्यात तो चमकू शकला नाही. मात्र त्याच्या उपस्थितीमुळे प्रेरित झालेल्या संघाने चार सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करण्यात यश मिळविले. सनरायजर्स हैदराबादवर त्यांनी पाच गडय़ांनी शानदार विजय मिळविला. ‘स्टोक्स संघात दाखल झाल्याने संघ समतोल झाला असून हैदराबादविरुद्ध त्याने फक्त एकच षटक गोलंदाजी केली. तो लॉकडाऊनमधून नुकताच बाहेर आला असल्याने त्याला स्थिरावण्यास थोडा कालावधी लागणार आहे,’ असे स्मिथ म्हणाला.

स्टोक्स हा आरआरसाठी महत्त्वाचा घटक असला तरी गेल्या पाच सामन्यात चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी फळीतील त्रुटीवर त्यांना तोडगा काढावा लागणार आहे. आघाडी फळी अपयशी ठरल्याने तळाच्या फलंदाजांवर मोठे दडपण येत आहे. पहिल्या दोन सामन्यात शारजा स्टेडियमवर स्मिथ व संजू सॅमसन यांनी स्फोटक फलंदाजी केली होती. पण त्यानंतर ते दोघेही विषेश चमक दाखवू शकलेले नाहीत. मुंबई इंडियन्सविरुद्ध जोस बटलरने 44 चेंडूत 70 धावांची खेळी केली होती. पण गेल्या दोन सामन्यात त्याला चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करता आलेली नाही. राहुल तेवातियाने चमक दाखवली नसती तर राजस्थानची स्थिती याहून कठीण होऊन बसली असती. अष्टपैलू तेवातियाने पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एका षटकात 5 षटकार ठोकले होते. त्याने सनराजर्सविरुद्धही 28 चेंडूत 45 धावा फटकावत संघाला पुन्हा एकदा सावरत यश मिळवून दिले होते.

याउलट भक्कम प्रदर्शन करणाऱया दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात पराभवाचा धक्का देत जमिनीवर आणले. हा धक्का बाजूला सारत श्रेयस अय्यरचा दिल्ली संघ पुन्हा विजयपथावर येत आघाडीचे स्थान मिळविण्याचा प्रयत्न करेल. या संघात स्फोटक फलंदाजांचा ताफा असून त्यांची गोलंदाजीही भक्कम आहे. रबाडाने तर आतापर्यंत 17 बळी मिळवित या मोसमातील सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळविला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऍन्रिच नॉर्त्जे (8 बळी) व हर्षल पटेल यांनी त्याला चांगली साथ दिली आहे. आर. अश्विननेही अक्षर पटेलसमवेत पॉवरप्लेमध्ये उत्तम मारा केला आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवण्यात त्याने मोलाचे काम केले आहे. मात्र अष्टपैलू स्टोईनिस याआधीचा सामन्यात पूर्णतः निष्प्रभ ठरल्याने आरआरला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कर्णधार स्मिथ त्याची तोड स्टोक्समध्ये पाहत आहे.

गोलंदाजीत आर्चरने स्पिनर्स तेवातिया व श्रेयस गोपाल यांच्यासह प्रभावी प्रदर्शन  केले असल्याने त्यांना संघात कायम स्थान मिळाले आहे. याशिवाय धवनला फॉर्म गवसल्याने दिल्लीला दिलासा मिळाला आहे. पंत जखमी झाल्याने दिल्लीला हेतमेयरला संघाबाहेर ठेवून यष्टिरक्षक कॅरेला संघात घेणे भाग पडले आहे. तसेच अजिंक्य रहाणेलाही या मोसमात पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती.

संघ : दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, मिश्रा, पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछने, कीमो पॉल, सॅम्स, मोहित शर्मा, नॉर्त्जे, कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.

राजस्थान रॉयल्स : स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, त्यागी, राजपूत, एस.गोपाल, तेवातिया, उनादकट, मयांक मार्कंडे, लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

‘आठवे’ आश्चर्य नव्हे, पण नेपाळ सर्वबाद 8!

Patil_p

बेल्जियमची अमेरिकेवर मात

Patil_p

यष्टीकडे जाणाऱया चेंडूवर फलंदाजाला ‘आऊट’ द्यावे

Patil_p

IPL मध्ये कोरोना : विराटच्या टीममधील आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोनाबाधित

Patil_p

राष्ट्रकुल हॉकीतून भारताची माघार

Patil_p
error: Content is protected !!