Tarun Bharat

दिल्ली कॅपिटल्सची केकेआरवर मात

कुलदीपचे 4, खलीलचे 3 बळी,  शॉ-वॉर्नरची धडाकेबाज अर्धशतके

वृत्तसंस्था/ मुंबई

सलामीवीर पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांची बेधडक फलंदाजी व सामनावीर कुलदीप यादवच्या भेदक माऱयाच्या आधारे दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमधील साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 44 धावांनी पराभव करीत दुसरा विजय नोंदवला.

फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर कर्णधार श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय अंगलट आल्याचे दिसून आले. दिल्ली कॅपिटल्सने या संधीचा लाभ घेत निर्धारित 20 षटकांत 5 बाद 215 धावांचा डोंगर उभा केला. शॉ व वॉर्नर यांनी धडाकेबाज अर्धशतके नोंदवली. त्यानंतर केकेआरचा डाव 19.4 षटकांत 171 धावांत गुंडाळून दिल्लीने सफाईदार विजय साकार केला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना कुलदीप यादवने गाजविला. आव्हानाचा पाठलाग करताना धावगती वाढत गेल्याने केकेआरच्या फलंदाजांवर दडपण आल्यावर कुलदीपने भेदक फिरकी मारा करीत चार बळी मिळविले. त्यापैकी तीन बळी त्याने एकाच षटकात मिळवित दिल्लीच्या बाजूने सामना फिरविला. त्याने श्रेयस अय्यरला (33 चेंडूत 54) आपल्या गुगलीवर यष्टिचीत केले. अय्यरने त्याला पुढे सरसावत येत उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळला आणि पंतने आपले काम चोख बजावले. नंतर त्याने सोळाव्या षटकातील तिसऱया चेंडूवर पॅट कमिन्सला पायचीत केल्यानंतर पाचव्या चेंडूवर सुनील नरेनला आणि सहाव्या चेंडूवर उमेश यादवला बाद करीत केकेआरची स्थिती 8 बाद 143 अशी केली. खलीद अहमद (25 धावांत 3) व शार्दुल ठाकुर (2-30) यांनी कुलदीपला उत्तम साथ दिली. रसेलने अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी केली. पण धावगती आवाक्याबाहेर गेल्याने तोही फार काही करू शकला नाही. 21 चेंडूत 24 धावा करून तो बाद झाल्यानंतर याच षटकात ठाकुरने रसिख सलामला बाद करीत दिल्लीचा विजय साजरा केला.

शॉ-वॉर्नर, अक्षर-शार्दुलची फटकेबाजी

प्रारंभी, शॉ (29 चेंडूत 51) व वॉर्नर (45 चेंडूत 61) यांनी केकेआरच्या घातक जलद माऱयासमोर दिल्लीला 8.4 षटकांत 93 धावांची दणकेबाज सुरुवात करून दिली. मधल्या फळीची पडझड झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात शार्दुल ठाकुर (11 चेंडूत नाबाद 29) व अक्षर पटेल (14 चेंडूत 22) यांनी जोरदार फटकेबाजी करीत केवळ 3.2 षटकांत 49 धावांची भर घातल्यामुळे दिल्लीला दोनशेपारची मजल मारता आली. या आयपीएलमध्ये उमेश यादव पहिल्यांदाच महागडा ठरला. त्याने एका बळीसाठी 48 धावा दिल्या तर कमिन्सकडून 54 धावा वसूल केल्या गेल्या. दिल्लीने चार षटकांतच अर्धशतकी मजल मारली आणि पॉवरप्लेमध्ये एकूण 10 चौकार, 2 षटकार नोंदवले गेले. शॉने कमिन्सला षटकार मारल्यानंतर वॉर्नरने वरुण चक्रवर्तीला स्लॉग स्वीपचा षटकार मारला. याशिवाय सुनील नरेनला (2-21) रिव्हर्स स्वीपचे फटके लगावत चौकार वसूल केले.

चक्रवर्तीने शॉला बाद करून केकेआरला पहिले यश मिळवून दिले. पण बढतीवर आलेल्या रिषभ पंतने (14 चेंडूत 27) धावांचा ओघ कायम ठेवत वॉर्नरसोबत 4.1 षटकांत 55 धावांची भर घातली. पंतने स्पिनर्सना रिव्हर्स स्वीप मारले तर कमिन्सला सरळ षटकार खेचला. वॉर्नरने रसेलला षटकार ठोकत या मोसमातील पहिले अर्धशतक नोंदवले. मात्र रसेलनेच त्याची खेळी संपुष्टात आणली. सुनील नरेनने ललित यादव व रोवमन पॉवेल यांना झटपट गुंडाळल्यानंतर अक्षय व शार्दुल यांनी संघाला दोनशेच्या पुढे मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक ः दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 5 बाद 215 ः पृथ्वी शॉ 51 (29 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), वॉर्नर 61 (45 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), पंत 27 (14 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), ललित यादव 1, पॉवेल 8 (6 चेंडूत 1 षटकार), अक्षर पटेल नाबाद 22 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शार्दुल ठाकुर नाबाद 29 (11 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), अवांतर 16. गोलंदाजी ः सुनील नरेन 2-21, रसेल 1-16, चक्रवर्ती 1-44, उमेश यादव 1-48).

कोलकाता नाईट रायडर्स 19.4 षटकांत सर्व बाद 171 ः रहाणे 8 (14 चेंडूत 1 चौकार), वेंकटेश अय्यर 18 (8 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), श्रेयस अय्यर 54 (33 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), नितिश राणा 30 (20 चेंडूत 3 षटकार), रसेल 24 (21 चेंडूत 3 चौकार), बिलिंग्स 15 (9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कमिन्स 4, सुनील नरेन 4, उमेश यादव 0, रसिख सलाम 7, चक्रवर्ती नाबाद 1, अवांतर 6. गोलंदाजी ः कुलदीप यादव 4-35, खलील अहमद 3-25, शार्दुल ठाकुर 2-30, ललित यादव 1-8.

Related Stories

Ind vs Eng: इंग्लंडचा दारुण पराभव; भारताने ३-१ ने मालिका जिंकली

Archana Banage

निवड चाचणी ठरणार महाराष्ट्र केसरीची रंगीत तालीम!

datta jadhav

लक्ष्य सेन, श्रीकांत यांचे आव्हान समाप्त, त्रीसा-गायत्रीची आगेकूच

Patil_p

गॅरीन, नुरी विजयी, रुड पराभूत

Patil_p

भारताचा स्वप्नभंग, बेल्जियम अंतिम फेरीत

Patil_p

विदर्भ, कर्नाटक, मध्यप्रदेशचे आज सामने

Patil_p