Tarun Bharat

दिल्ली दूर नही..!

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, 183 दिवसांतील हा नीचांक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. ही निश्चितच भारतासाठी दिलासादायक बाब म्हणता येईल. मागील 24 तासांत देशात 30 हजार 256 रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. तर सक्रिय रुग्णसंख्या तीन लाख 8 हजारापर्यंत खाली आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेबाबतची भीती व्यक्त होत असताना पहायला मिळणारे हे चित्र सुखावणारे आहे. मागील दीड वर्षापासून अवघे जग कोरोनाच्या महामारीशी लढते आहे. या कालावधीत अनेकांना आपल्या आप्तेष्टांना गमवावे लागले. शिवाय कित्येकांच्या नोकरी, व्यवसायावरही गंडांतर आले. सर्वार्थाने कसोटीचा ठरलेला हा काळ अजूनही पूर्णतः सरलेला आहे, असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. तरीदेखील हतबलतेचे, निराशेचे मळभ हळूहळू नक्कीच दूर होताना दिसते. देशातील महानगरे, नगरे व महत्त्वाच्या राज्यांतील रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होणे हे देशातून दुसरी लाट ओसरल्याचेच द्योतक होय. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंतची सर्वत्र रुग्णांचा आलेख घसरला असला, तरी साथ पूर्णपणे नाहीशी झाली, असे समजून चालणार नाही. अल्प प्रमाणात का होईना अद्याप रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे खबरदारी ही घ्यावीच लागेल. फिजिकल डिस्टंन्सिंग, मास्क, हात सॅनिटायझ करणे, हा आज जीवनशैलीचा भाग बनला आहे. त्यामुळे लाट ओसरली म्हणून त्याला मूठमाती देऊन चालणार नाही. ऑक्टोबरच्या मध्यात तिसरी लाट येऊ शकते. सणासुदीच्या काळातील गर्दी पाहता या लाटेचा धोका असल्याने आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत. स्वाभाविकच या आघाडीवर प्रत्येक राज्याने सजग राहिले पाहिजे. महाराष्ट्रासारख्या राज्यात तिसऱया लाटेचे संकेत नाहीत, असे विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. पहिल्या व दुसऱया लाटेचा महाराष्ट्रातील अनेक शहरांसह ग्रामीण भागालाही मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे तिसरी लाट येईल का?, आलीच, तर तिचा प्रभाव किती असेल, हे पहावे लागेल. अर्थात ती कमी-जास्त असली, तरी सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे नि रुग्णालये व आरोग्यसेवा तत्पर राखणे, ही जबाबदारी पेलावीच लागेल. कोरोनासोबतच नव्या स्वरुपातील डेंग्यूचा प्रभावही वाढत असून, महाराष्ट्र, कर्नाटकसह 11 राज्यांना खबरदारीच्या सूचना केंद्राकडून करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे भय दाटलेले असतानाच मागच्या काही दिवसांत पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, अमरावतीसह महाराष्ट्रातील काही शहरांत डेंग्यूचा प्रादुर्भाव पहायला मिळतो. राज्यात जवळपास सहा हजारांच्या आसपास या आजाराचे रुग्ण आढळले असून, 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारी सांगते. याशिवाय चिकुनगुनिया, मलेरिया, कॉलरा, काविळचेही रुग्ण वाढलेले दिसतात. महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. हे पाहता दुसऱया बाजूला या आजारांशीही लढावे लागेल. विशेषतः डेंग्यूचा नवा विषाणू हा अधिक धोकादायक असल्याने त्याबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे. त्या-त्या शतकात महामारीच्या संकटाला समाजाला तोंड द्यावे लागल्याचा इतिहास आहे. स्पॅनिश फ्लू, प्लेगची साथ ही त्याचीच उदाहरणे. कोरोनाचे आव्हानही असेच महाकाय. अर्थात लसीकरण जितक्या वेगाने होईल, तितक्याच वेगाने कोरोनाचा प्रभाव कमी करणे सोपे जाईल. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 17 सप्टेंबरला प्रस्थापित झालेला 2 कोटी 27 लाख 73 हजार लसमात्रांचा विक्रम आश्वासक मानता येईल. आत्तापर्यंत लसीकरणाचा आकडा 81 कोटींवर पोहोचला असून, अवघ्या 11 दिवसांत 10 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. किंबहुना, पुढच्या काळातही याच वेगाने लसीकरण व्हायला हवे. देशाची लोकसंख्या आज 130 कोटीच्या आसपास आहे. प्रत्येकाला दोन मात्रा द्यायच्या म्हटल्यास लसीकरण मोहीम बुलेट ट्रेनच्या वेगानेच पुढे न्यावी लागेल. लसीकरणात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील 2.10 कोटी लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. त्यानंतर यूपी 1.7, मध्य प्रदेश 1.27, गुजरात 1.69, राजस्थान 1.43, कर्नाटक 1.47, प. बंगाल 1.49 कोटी अशी आकडेवारी आहे. स्वाभाविकच आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याकरिता 17 सप्टेंबरच्या ‘बुलेट पॅटर्न’ वापरण्याशिवाय पर्याय नाही. पुढच्या काळात अधिकाधिक वेगात ही मोहीम तडीस नेली, तर कोरोनाला अटकाव करणे सहजसुलभ होऊ शकते. सप्टेंबरमध्ये भारतात लशींचे 23.5 कोटी, ऑक्टोबरमध्ये 30, तर त्यानंतर दर महिन्याला 100 कोटी लशींचे डोस उपलब्ध होणार आहेत. स्वाभाविकच पुढच्या काळात या अभियानाला गती मिळेल, अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. भारतातील लसीकरणाची गरज भागवून इतर देशांनाही लसमात्रा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लस उत्पादन वाढण्यासोबत देशातील नागरिकांना सहज लस उपलब्ध होत असेल, तर लशींची निर्यात करण्यात काहीही गैर नाही. कारण कुणी एकटा दुकटा देश नव्हे, तर सारे विश्व कोरोनामुक्त होणे, हे संपूर्ण जगाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. गणेशोत्सव उत्साहात पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी तोंडावर आहे. स्वाभाविकच या काळात खरेदी करण्यासाठी लोक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडू शकतात. त्यादृष्टीने पुढच्या काळातही काळजी घ्यावी लागेल. अर्थचक्र बंद पडल्यावर काय होते, हे साऱया जगाने अनुभवले आहे. पुन्हा असे होणे परवडणारे नाही. आत्तापासून सावधानता बाळगली, तर या संभाव्य लाटेपासून सुरक्षित राहता येईल. त्याकरिता प्रत्येकाने आपापल्या पातळीवर आचारसंहिता तयार करून तिचा अंमल करावा. अब दिल्ली दूर नही..!

Related Stories

मौजे आटपाट

Patil_p

देवरूप होऊ सगळे

Patil_p

नावामध्ये कै च्या कै

Patil_p

सावधान, ऑनलाईन शॉपिंग-फसवणुकीचा नवा धंदा

Patil_p

वास्तूपुरुषाचा सन्मान

Patil_p

प्रकाश आंबेडकरांचे अर्थविचार!

Patil_p