Tarun Bharat

दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

मर्यादित प्रमाणात दारूकामाची आतषबाजी

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात दीड दिवसाच्या गणरायाला शनिवारी मोठय़ा भक्तीभावाने निरोप देण्यात आला. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातल्यामुळे गतवर्षीचा गणेशोत्सव भटजीविना ऑनलाईन पद्धतीने पूजाविधी करून तसेच विसर्जनही सर्व प्रकारची मार्गदर्शकतत्त्वे पाळून मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला होता.

यंदा ती परिस्थिती समाधानकारक नियंत्रणात आली असल्याने अनेक गावात चतुर्थीदिनी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी भटजींनी उपस्थिती लावली होती. तरीही लोकांच्या मनातील भीती कायम असल्यामुळे यंदाही एकमेकांच्या घरी जाण्याच्या प्रथेला ब्रेक लागल्याचे दिसून आले. तोच प्रकार काल विसर्जनाच्यावेळीही दिसून आला. प्रत्येकाने आपापल्या मूर्ती डोक्यावर घेत किंवा वाहनात घालून नदीकिनारी नेत विर्सजन केले. त्यावेळी एखाद् दुसऱयाने तुरळक प्रमाणात फटाके लावल्याचे दिसून आले.

राज्यात अनेक ठिकाणी चतुर्थी उत्सव पाच ते अकरा दिवसापर्यंत साजरा केला जातो. काही ठिकाणी 21 दिवसही गणशोत्सव साजरा होतो. परंतु गतवर्षीप्रमाणेच यंदाही अधिकाधिक गणपती दीड दिवसांनीच विसर्जित करण्यात आले. अनेक सार्वजनिक गणेशोत्सवही दीड दिवसात आटोपते घेण्यात आले.

उत्सवातील आनंद हरपला

गणेशोत्सव दीड दिवसाचा असो वा त्यापेक्षा जास्त, राज्यात या काळात सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण असते. अबालवृद्ध उत्सवात रममाण झालेला असतो. प्रत्येकाच्या घरी लोकांची ये-जा असते. घुमट आरती व सुमधूर भक्तिमय गीतांच्या आवाजाने प्रत्येक घराचे मंदिर झालेले असते. गणेशाची आरास, माटोळी सजावट, रांगोळी यांनी घर सजविलेले असते. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे यंदाही सगळेच नाममात्र झाल्याचे दिसून आले. अनेकांनी कुटुंबियांमध्ये राहूनच गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला.

मर्यादित स्वरुपात आतषबाजी

दरम्यान, राज्याच्या विविध भागात शनिवारी सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला. एरव्ही विसर्जन हा एक महासोहळा असतो. गणपती मिरवणूक, ठिकठिकाणी घुमट आरतींच्या बैठका, महिलांतर्फे फुगडय़ा, दिंडय़ा, युवावर्ग जोषपूर्ण नाच, गुलालाची उधळण आणि मोठय़ा प्रमाणात दारुकामाची आतषबाजी, असे एकूण चित्र असते. परंतु यंदा मात्र उत्सवातील आनंद हरपला होता. त्यामुळे मर्यादित स्वरुपात दारुकामाची आतषबाजी करून गणरायाला निरोप देण्यात आला. गर्दी न होता विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातही पोलीस उपस्थित होते. पालिका, पंचायती यांच्यातर्फे विसर्जन ठिकाणी उजेडाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री 10 पर्यंत हा सोहळा पार पडला.

Related Stories

मोपा लिंक रस्त्याचे भूसंपादन पोलीस संरक्षणात सर्व्हे

Amit Kulkarni

किनारे स्वच्छता कंत्राट हा घोटाळा असल्याचा काँग्रेसचा दावा पुन्हा खरा

Patil_p

शाळा सुखावल्या ‘चिमण्यां’च्या किलबिलाटाने!

Amit Kulkarni

गांवडोंगरीचे माजी सरपंच अशोक वेळीप ’टीएमसी’त

Patil_p

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करणे हे आपले प्रथम कर्तव्य

Amit Kulkarni

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या खोटेपणाचा पर्दाफाश

Amit Kulkarni