पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची 50 ते 60 टक्के उपस्थिती : फुलांचा वर्षाव, मिठाईचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत


प्रतिनिधी /बेळगाव
दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी पुन्हा एकदा प्राथमिक शाळांची घंटा वाजली. पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा उघडण्यात आल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची 50 ते 60 टक्के उपस्थिती दिसून आली. फुलांचा वर्षाव, मिठाईचे वाटप करत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. ऑनलाईन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी 19 महिन्यांनंतर वर्गांत जावून ऑफलाईन शिक्षण घेतले.
कोरोनामुळे मार्च 2020 मध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर महाविद्यालये, पदवीपूर्व, उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु प्राथमिक शाळा दीड वर्षे बंद होत्या. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर सोमवारपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना मास्क, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा वापर सक्तीचा केला होता. तसेच पालकांचे संमतीपत्रदेखील शाळांनी घेतले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची तारांबळ उडाली.
विद्यार्थ्यांच्या भेटीला डोनाल्ड डक-मिकिमाऊस
टिळकवाडी येथील केएलएस स्कूलने अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. डोनाल्ड डक- मिकिमाऊस यांचे वेश परिधान केलेल्या व्यक्ती शाळेच्या प्रवेशद्वारावर उभ्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही एक वेगळाच उत्साह दिसून आला. याचसोबत शाळांमध्ये प्रथमच दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी चढविला गणवेश
कोरोनामुळे मागील दीड वर्षे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. ऑनलाईन शिक्षण घेवून विद्यार्थीदेखील कंटाळले होते. केव्हा एकदा शाळा सुरू होते याची उत्सुकता त्यांना लागली होती. सोमवारी तब्बल 19 महिन्यांनंतर त्यांनी शाळेचा गणवेश चढविला. शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर चिंता दिसून आली तर काहीजण मात्र शाळेत आल्याने आनंदीत झाले होते.