Tarun Bharat

दुसऱ्याच्या भूमीत घुसून अद्दल घडवण्यास सज्ज

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा

वेलिंग्टन (तामिळनाडू) / वृत्तसंस्था

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय आव्हानात्मक बनली आहे. या परिस्थितीमुळे अनेक देशांना आपली रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे आम्हाला आमची रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. आता भारत अफगाणिस्तानबाबतही पुनर्विचार करत असून नवीन रणनीती तयार करत आहे. गरज पडली तर आम्ही त्यांच्या भूमीवर जाऊन लष्करी कारवाई करू आणि दहशतवाद संपवण्यासाठी हातभार लावू असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी दिला. तामिळनाडूमधील वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात बोलताना त्यांनी याबाबत परखड भाष्य केले.

काही देश दहशतवादाचा अवलंब करत असले तरी भारत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. गरज पडल्यास आम्ही त्यांच्या भूमीवर जाऊन दहशतवाद संपवू, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी तालिबानबरोबरच पाकिस्तानलाही नाव न घेता फटकारले. संरक्षण मंत्रालय विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकात्मिक लढाई गटाच्या निर्मितीचा वेगवान मागोवा घेत आहे. युद्धाच्या वेळी वेगाने निर्णय घेणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने विविध लढाऊ तुकडय़ा तयार करण्यासाठी संरक्षण विभाग सक्रियपणे काम करत असल्याचा दावाही राजनाथ सिंह यांनी केला.

‘टूर ऑफ डय़ुटी’ बदलेल लष्कराचे भविष्य

भारतातील तरुणांनी सैनिकांप्रमाणे देशभक्ती आणि शिस्त शिकली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. यादृष्टीने युवकांचा सैन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रबळ करण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील. यासाठी संरक्षण मंत्रालय ‘टूर ऑफ डय़ुटी’चा गंभीरपणे विचार करत आहे. हा निर्णय आमच्यासाठी ‘गेमचेंजर’ सिद्ध होईल याची मला खात्री आहे. तसेच भारतीय सैन्याचे सरासरी वयदेखील कमी करेल, असे सिंह पुढे म्हणाले.

भारताच्या रोखठोक भूमिकेमुळे पाकिस्तान शांत

संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणावेळी पाकिस्तानवरही जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. दोन लढाया गमावल्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवादाचा अवलंब करण्यास सुरुवात केली. पाकिस्तान दहशतवाद्यांना शस्त्र आणि प्रशिक्षण या दोन्हीही बाबी पुरवितो. पाकिस्तानच्या रणनीतीमध्ये कोणताही बदल होत नसल्यामुळे आता भारतानेच आपली भूमिका बदललेली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता आहे. भारताने आपला बचावात्मक दृष्टिकोन सोडून प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केल्यापासून आता पाकिस्तानही सावध झाल्याचे ते म्हणाले. बालाकोट स्ट्राइकमधून भारताने आपली ताकद दाखवून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चीनच्या वादातही सैनिकांची क्षमता सिद्ध

चीनच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. जेव्हा चीनचे सैन्य भारतीय सीमेच्या दिशेने येत होते, तेव्हा परिस्थिती अतिशय आव्हानात्मक बनली होती. मी रात्री 11 वाजता लष्करप्रमुखांशी संवाद साधल्यानंतर आमच्या सैन्याने आपली ताकद दाखवून दिली. शत्रूंपासून देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी किती वचनबद्ध आहोत, हे आमच्या सैनिकांनी वेळोवेळी दाखवून दिल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

Related Stories

‘भारतीय’ आणि ‘हिंदू’ हे एकच

Patil_p

चीनवर भारी ‘मेक इन इंडिया’

Patil_p

भारतासोबतचे संबंध तोडल्याने पाकचे नुकसान

Amit Kulkarni

आंध्रप्रदेश सरकारने घेतला विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय

prashant_c

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार पार

prashant_c

आजपासून पैलवानी ‘दंगल’

datta jadhav