Tarun Bharat

दुसऱ्या सामन्यात भारताची इंग्लंडवर मात

Advertisements

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

सामनावीर इशान किशनने पदापर्णात नोंदवलेले अर्धशतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर 7 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 3000 धावांचा टप्पाही पार केला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत अप्रतिम मारा केल्याने इंग्लंडला 20 षटकांत 6 बाद 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर जेसॉन रॉयने सर्वाधिक 46 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 17.5 षटकांत 3 बाद 166 धावा जमवित विजय साकार केला. तिसरा सामना मंगळवारी 16 रोजी याच ठिकाणी होणार आहे.

 केएल राहुल शून्यावर बाद झाला तरी पदार्पणवीर इशान किशन व कोहली यांनी दुसऱ्या गडय़ासाठी 94 धावांची भागीदारी करून भारतीय विजयाची पायाभरणी केली.  दहाव्या षटकाअखेर इशानला आदिल रशीदने पायचीत केले. त्याने 32 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा फटकावल्या. पदार्पणाच्या टी-20 मध्ये अर्धशतक झळकवणारा तो अजिंक्य रहाणेनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज आहे. कोहली 73 तर श्रेयस अय्यर 8 धावांवर नाबाद राहिले. त्याआधी पंतनेही आक्रमक फटकेबाजी करीत 13 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 26 धावा झोडपल्या आणि कोहलीसमवेत 22 चेंडूत 30 धावांची भागीदारी केली. कोहलीने जॉर्डनला षटकार ठोकत विजय साजरा केला. त्याने या प्रकारातील 3000 धावांचा टप्पाही गाठला. यासाठी त्याला 72 धावांची जरूरी होती. 49 चेंडूंच्या खेळीत त्याने 5 चौकार, 3 षटकार तडकावले.

याच ठिकाणी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मात्र बटलर शून्यावरच बाद झाल्याने त्यांना सुरुवातीलाच धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने सामन्यातील पहिल्या षटकाच्या तिसऱयाच चेंडूवर त्याला पायचीत केले. जेसॉन रॉय व डेव्हिड मलान यांनी मात्र 47 चेंडूत 63 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. भारतासाठी धोकादायक ठरू पाहणारी ही जोडी यजुवेंद्र चहलने फोडली. डावातील नवव्या षटकात त्याने मलानला पायचीत केले. यावेळी भारताने डीआरएस घेतला होता आणि त्यात भारताच्या बाजूने निकाल लागला.

रॉय आक्रमक फटकेबाजी करीत होता आणि तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच 12 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर डीप स्क्वेअरलेग क्षेत्रात भुवनेश्वरकरवी झेलबाद झाला. त्याने 35 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह 45 धावा काढल्या. इंग्लंडच्या डावातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. वॉशिंग्टनने आपल्या पुढल्या षटकातही बळी मिळविताना जॉनी बेअरस्टोला डीप स्क्वेअरलेग क्षेत्रात सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.

सूर्यकुमारला या सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. बेअरस्टोने 15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार मारत 20 धावा काढल्या.

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने मोठे फटके मारण्याच्या नादात आपली विकेट गमविली. शार्दुल ठाकुरच्या स्लोअरवनवर यष्टीमागे पंतने त्याचा झेल टिपला. मॉर्गनने 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 28 धावा फटकावल्या. 15 षटकांत इंग्लंडने 4 बाद 130 धावांपर्यंत मजल मारली होती, त्यावेळी दोनशेच्या जवळपास ते मजल मारतील असे वाटले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा केल्याने शेवटच्या पाच षटकांत इंग्लंडला केवळ 34 धावाच जमविता आल्याने 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतातर्फे सुंदरने 29 धावांत 2, शार्दुल ठाकुरनेही 29 धावांत 2 बळी टिपले. भुवनेश्वर व चहल यांना एकेक बळी
मिळाला.

भारताने या सामन्यात दोन बदल करताना शिखर धवन व अक्षर पटेल यांच्या जागी सूर्यकुमार यादव व इशान किशन यांना संधी दिली. रोहित शर्माला या सामन्यातही संघाबाहेर ठेवण्यात आले.

टी-20 विश्वचषक स्पर्धा याच वर्षी होत असल्याने विविध खेळाडूंना आजमावून पाहण्यासाठी हे प्रयोग केले जात आहेत. इंग्लंडनेही मार्क वुडच्या टॉम करनची निवड केली.

Related Stories

हॅलेप, सेरेना, जोकोविच, व्हेरेव्ह चौथ्या फेरीत

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली

datta jadhav

संदेश झिंगन, सुरेश यांना एआयएफएफ पुरस्कार

Patil_p

मुंबई-गोवा महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री रवींद्र चव्हाण

Abhijeet Shinde

निपाणी भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य

Patil_p

दुसऱया कसोटीतून शकीब अल हसन बाहेर

Patil_p
error: Content is protected !!