Tarun Bharat

दुसऱया सामन्यात स्पेनकडून भारताचा पराभव

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

येथील कलिंगा स्टेडियमवर रविवारी झालेल्या एफआयएच प्रो लीग हॉकीमधील दुसऱया सामन्यात यजमान भारताला स्पेनकडून 3-5 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.

या पराभवामुळे लीगच्या गुणतक्त्यात भारत दुसऱया स्थानावर आला असून  आघाडीवरील नेदरलँड्पेक्षा ते चार गुणांनी मागे आहेत. लीगमधील पहिला विजय मिळवित स्पेन आठव्या स्थानावर कायम आहे. भारताने सहा सामन्यात चार विजय मिळविले आहेत. रविवारी स्पेनच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी भारतावर विजय मिळविले. स्पेनचे गोल पॉ कनिल (14 व 24 वे मिनिट), जोआन टेरेस (14), पेपे कनिल (54) व कर्णधार मार्क मिरालेस (59) यांनी नोंदवले. भारताचे गोल अभिषेक (6 वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (27) व सुखजीत सिंग (51) यांनी नोंदवले.

अभिषेकने या सामन्यात भारताला पहिले यश मिळवून देताना सहाव्या मिनिटाला गोल नोंदवला. 14 व्या मिनिटाला पॉ कनिलने मिळविलेल्या पेनल्टी कॉर्नरवर जोआन टेरेसने रिव्हर्स फटका मारत स्पेनला बरोबरी साधून दिली. दुसऱया सत्रात पॉ कनिलने पीआर श्रीजेशला चकवा देत स्पेनचा दुसरा गोल नोंदवला. पण 27 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने भारताला पेनल्टी कॉर्नरवर बरोबरी साधून दिली. हरमनप्रीतचा हा यावर्षीचा दहावा गोल होता. हा टप्प गाठणारा तो यावर्षीचा पहिला खेळाडू बनला आहे. सुखजीत सिंगने वरिष्ठ स्तरावरील पदार्पणाच्या सामन्यात उत्तम ड्रिबलिंग करीत वेगाने आगेकूच करीत 51 व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवून भारताला 3-3 अशी बरोबरी साधून दिली.

पॉ कनिलचा भाऊ पेपे कनिलने 54 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारतावर 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. पेपेचा हा वरिष्ठ स्तरावरील पहिला आंतरराष्ट्रीय गोल होता. पिछाडीवर पडल्यानंतर सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना भारताने गोलरक्षकाला हटवून जादा खेळाडू घेतला. पण याचा लाभ घेत स्पेनने आक्रमणे वाढविली आणि त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळविण्यात यशही आले. 59 व्या मिनिटाला कर्णधार मिरालेसने त्यावर संघाचा शेवटचा गोल नेंदवत स्पेनला 5-3 असा विजय मिळवून दिला.

Related Stories

विश्व टेटे संघटनेचे कर्मचारी स्वतःहून कमी वेतन घेणार

Patil_p

कोल्हापुरात सोमवारपासून राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा

Amit Kulkarni

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे सराव सामने

Patil_p

माजी फुटबॉलपटू बोनेटी कालवश

Patil_p

निखत झरीन अंतिम फेरीत, नंदिनीला कांस्य

Patil_p

भारतीय मल्ल रविंद्रचे आव्हान समाप्त

Patil_p